प्रेमातले थांबे!

जोडीदारात कायदेशीर आशिक मिळणं कठीण होत जात असावं. जबाबदारी आणि सोबत राहून सगळं करण्याच्या नादात हळूहळू दोघे प्रेमाला बाजूला ठेवून देतात.

काळजी आधी की प्रेम?

हा शंभर करोडाचा प्रश्न त्यांच्यात फक्त काळजीला जागा देतो. प्रेम कसं हळुवार करायचं असतं, मग ते नंतर करू, आता वेळ नव्हता, प्रायोरिटी वेगळ्या आहे, आपलं मिशन वेगळं आहे, अस म्हणत म्हणत हळूहळू प्रेमातून काळजी वाहू लागते. पण प्रेम माणसाला गारवा देतो, काळजी खूप झाली तर ओझं वाढत जातं. काळजी रोजची झाली तर तिचं महत्त्व कमी होत जातं.
मग मध्यरात्री, दुपारच्या मधल्या प्रहरी, नाहीतर सायंकाळच्या धुंद लहरींच्या वेळी गरज भासू लागते, त्या डिजायर आशिकची… ज्याला आपल्या पर्सनल आयुष्याशी संबंध लागेबांधे सांगायचे नसतात.
प्रेम होतं, तेव्हा सुद्धा हेच तर होत असतं. आपल्या प्रियकर/ प्रेयसीसाठी अनोळखी जीव असतो आपण. ते आकर्षण अनोळखी आणि अलिप्त असल्याचं असतं. मग त्या अनोळखीला ओळखीत बदलायच म्हणजे रसरशीत आंबा पाहिल्यानंतर त्याच्याशी आपला काही संबंध नसल्यामुळे संबंध निर्माण करण्यासाठी त्याच्या जवळ जावून त्याला आपलंसं करण्याचा प्रवास तेवढा गारवा. नंतर सुरू होते दोघांचीही वणवण!
इथे वाचवावं लागतं नात्याला. या दरीत कोसळलेले असंख्य जीव आहे. प्रेम काय असतं यावर निबंध लिहिणारा आपलाच प्रियकर/ प्रेयसी इतके प्रॅक्टिकल आहे? यावर प्रश्नचिन्ह न उभे राहता, उत्तरं समोर येतात. याचा त्रास होऊन सुटत जातो ताबा. मग शोधू लागतं मन, भावनिक ऑर्गाजमच्या शोधात! तोच शोध काही वर्षांपूर्वी थांबवला होता दोघांनी, शेजारी असलेल्या प्रियकर/ प्रेयसीच्या येण्याने.
पुन्हा तिथूनच सुरुवात. माहिती असणारे, शेवट पुन्हा इथेच आहे… तरीही ही तहान आहे की भूक, याचा विचार करण्यासाठीही न थांबता नवा थांबा शोधायला मन सैरभैर होऊ लागतं. पक्ष्यांच्या प्रियकर प्रेयसीला हीच भीती नसेल ना? येता येता उडत येताना आपला जोडीदार कुणाच्या घरट्यात शिरला तर?
पक्ष्यापेक्षा माणूस बरं म्हणूनही भागत नाही. कारण पक्ष्यांची उडान थांबवता येत नाही, माणसांची थांबवता येत असली तरी अशा गोष्टीत ती थांबवणं योग्य नसतं. गुंतूनच राहायचं म्हटलं तर शर्टाचं बटण सुद्धा स्वत:ची जागा तयार करतो. नात्यातली ओढाताण दोघांपैकी एकच नुकसान करूनच जात असते. जसं एकाला वाटलं नवीन थांबा शोधावा तसा दुसऱ्यालाही वाटला असणारच, पण कितपत अधीन व्हावं ?


शेवटी कितीही अधीन होऊन वाहवत जा, प्रत्येक थांब्यावर प्रश्न तसाच असतो,
काळजी आधी की प्रेम?
प्रेम शोधण्याचा प्रवास अनंत काळ चालू राहतो, प्रेम झाल्यावर, संसार प्रपंच बसवल्यावर आणि एक प्रेम असताना दुसरं कुणी भेटल्यावरही… माणूस तहानलेला असतो, भुकेला असतो, तो प्रत्येक टप्प्यावर!

सायंकाळच्याबाता 🌼

Please follow and like us:
error

1 thought on “प्रेमातले थांबे!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *