गुलदस्त्यातलं प्रेम …

  • by

जुन्या पेटीत ‘ती’ चिठ्ठी सापडली.
यांना जाऊन जवळजवळ ५ वर्षे झाली.
आता तर काळ्या टिकलीचीही सवय झाली.
मग या अचानक सापडलेल्या तोफ्याचं प्रयोजन काय म्हणायचं ?
पण ती चिठ्ठी ….
हो ती यांच्याच अक्षरातली होती.

मला ते गुलदस्त्यातले दिवस आठवले …
पन्नास वर्षांपूर्वी यांनी लिहिलेली अस्ताव्यस्त ‘माझी’ चिठ्ठी आठवली ….
त्या चिठ्ठीला ‘प्रेमपत्र’ म्हणणं मुद्दामच टाळलं. कारण ती ‘किराणामालाची’ यादी होती.
संताप माझाही तासभर झालाच होता.
कारण, दुसऱ्यासाठी लिहिलेलं माझं प्रेमपत्र तिसऱ्यालाच गेलं होतं..
हो … माझं प्रेमपत्र यांच्याकडे गेलं आणि यांची किराणामालाची यादी माझ्याकडे आली….
नशीब ! पत्रावर ठळक लिहिलेल्या फोन नंबरमुळे तासाभरात यांचा फोन तरी आला…
ज्याला पत्र लिहिलं तो बाजूला राहिला, पण त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना भेटलो…
आणि भेटलो ते आयुष्यभरासाठी…. 😍😍

“कसं असतं ना… आपली एखादी चूकही आपल्याला आयुष्यभराची आनंदाची शिदोरी देऊन जाते… ”

आता मात्र पानावलेल्या डोळ्यांतुन अश्रू पडून चिठ्ठीतील अक्षरे पुसण्याआधी मी ती चिठ्ठी भराभरा उघडली….
काळ्या अक्षरात मजकूर होता,
“मी गेलो तरी लाल टिकली लावत जा सरकार (नानांच्या आवाजात).
आपल्यावर शोभून दिसते…
समाजाची चिंता कशाला करता..?
काळी लावताच ना ? फक्त रंग बदलून लाल लावा …
देवा शपथ तुमच्या गोर्या मुखड्यावर भारी शोभून दिसते …”

हे सगळं वाचून मात्र खरंच वाटलं, अश्रू पडून चिठ्ठीतली अक्षरे मिटली असती तर फार बरं झालं असतं….
तरीही या माणसाच्या आग्रहाखातर मी आरशात जाऊन तो एक यशस्वी प्रयत्न केला….
“खास दिसत होते मी.
मला आवडले मी.
इवलुशी कमी होती, ती त्यांच्या किफायती तारीफदार शब्दांची.”
पण मी चिठ्ठी स्वीकारली आणि त्यातील शब्दही …

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *