सोबत का कुणाची अशी सुटत जाते,
मावळतीचा सूर्य प्रकाशाची साथ का सोडतो?
नकळत अंधकाराला कारण कुठे, हक्क येतो
क्षण सुखाचे सुटतात त्याच्याच आठवणीत!
तो मरतो, ती मात्र मरत नाही,
तिचं आयुष्यावरचं प्रेम कमी होत नाही, नि त्याच्यावरचं वीतभर वाढतच जात राहतं…
आठवणी की आसवं नुसतीच डबडब सुरू होते.
माणूस सोबत्यावर आयुष्य वेचू लागतो.
अखेरचा श्वास आगेवर तळपत राहतो,
सोबत्याचा कंठ पावलावर दाटतो! रेंगाळतच राहतो!
स्मृतींच्याही जवळ चीता जळत राहते,
आसवांना केवळ पदराची साथ उरते!
सोबत्याचा जन्म मृत्युत विलीन होतो,
उरलेला तो एकटा जन्मतः मृत्यू जगत राहतो!
माझ्या वाट्याला रक्ताच्या नात्यातली आजी नव्हती, पण शहरात एक आजी येऊन भेटली होती.
आजीच नाही, ते दोघेही.
आजी आजोबा. एक सुंदर आयुष्याचा ऋतु जगून मुरलेलं जोडपं.
ऊन, सावली, वावटळ, कर्कशपणा, पाऊस, दुष्काळ, पानगळ, वसंत सगळचं सोबतीने अनुभवलेले जोडपं!
त्यांच्याकडे बघून कुतूहल वाटायचं की, “कसं तब्बल साठ वर्षे एकमेकांसोबत नि एकमेकांच्या सुख दुःखात राहता येतं?
एका दिवसाच्या प्रेमाचा हिशेब मांडणारे आम्ही खरंच उभ्या आयुष्यात या क्षणाचे स्व साक्षीदार होऊ?”
त्या दोघांना पाहून असे असंख्य अशक्य प्रश्न मला पडत राहायचे.
शेवटी शेवटी आजोबांचे ज्ञानेंद्रिय काम करेनाशी झाली होती. त्यांना वास्तवाचे भान नसायचे. केवळ आजार नि सुखद मृत्यूची वाट!
हो, म्हातारपणात मृत्यू हाच एक शाश्वत सखा वाटू लागतो. तरीही आजी त्यांच्या उशाशी त्यांची सखी बनून बसायची.
आठवड्यापूर्वी आजोबा वारले. शब्द नसतात, अशा आयुष्यातील थोडक्या शाश्वत क्षणाबद्दल. त्यांच्या माझ्या आयुष्यातल्या आठवणींपेक्षा आजींच्या आयुष्यात येणाऱ्या भूतकाळातील पोकळीचा मला जास्त त्रास होत होता. मी कल्पनाच करू शकत नव्हते की, सतत सोबतच असलेले हे दोघे आता त्यातील एकजणाच आयुष्य शिल्लकच नाही राहिलय…
माणूस कितीही जवळचा नि हक्काचा असला तरी त्याच्या शारीरिक नि मानसिक वेदनांनी तळमळायला होतं. वाटतं, ‘एवढं सहन करण्यापेक्षा मरण आलेलं बरं!’
देवही अजब खेळ खेळत असतो. आधी जगण्यासाठी झुरत ठेवतो नि शेवटाला मृत्यूवर प्रेम करायला शिकवतो.
मग इतके दिवस जीवावर बेताल प्रेम करणारे आपण, मृत्यूच्या भीतीने आयुष्यात सगळं करणारे आपण अचानक मृत्यूवर प्रेम करू लागतो.
शेवटच्या घटकांमध्ये आम्हीही चर्चा करताना म्हणू लागलो होतो,”आजोबांबरोबर आजीचीही आबदा होण्यापेक्षा आजोबांना या यातनेतून मुक्ती मिळावी.”
आणि त्या दिवशी ते घडलं! लोक आले, गेले… सांत्वन, कुणी खरंच काळजी दाखवली.
दोन तीन दिवस माणसांचा वावर राहिला. अश्रू ढाळायला लोक होते, अश्रू थांबवायला आधार होते.
चौथ्या दिवशी मात्र सगळे आपापल्या कामाला निघाले. घर आधी दोघांचं होतं. कुणी नसलं तरी एकमेकांना आधार होता.
आज म्हातारीला आयुष्याचा खरा खेळ कळला. तिला सोबत्याचा धीर कळाला, तिला त्याच्या अस्तित्वाचा शोध कळाला, तिच्या भोवताली आता खऱ्या आठवणी उभ्या राहू लागल्या. तिला भेडसावू लागल्या. तिला हतबल करू लागल्या.
अश्रू येऊ लागले. पण अश्रूंना थांबवायला कुणी नव्हतं, ना त्यांना आधार द्यायला कुणी होतं. शेवटी स्वतःच स्वतःच्या हाताने अश्रू थांबवून आधार बनू लागली ती स्वतःची.
काल आजी आमच्याकडे आली होती. आईची मैत्रीण ती. त्यामुळे त्यांचं आमच्या घराशी असलेलं नातं खूप जिव्हाळ्याचं होतं
आज पहिल्यांदा त्या आजोबांशिवाय आल्या होत्या. हे असं त्यांना पाहणं आणि त्यांना धीर द्यावा तरी कसा? या विचारांनी आपण अस्वस्थ होतो पण म्हातारी मात्र खमकी झाली होती.
स्वीकारलं होतं तिने मृत्यूला. आईने आणि आजीने त्यांच्या आठवणी काढत गप्पा मारल्या. ते होते तेव्हा अस झालं होतं म्हणून रडल्याही.
आजीला खुब्यामुळे आधार देऊनच चालावं लागतं. त्यामुळे त्यांना घरी सोडवायला मी जात होते. तेव्हा ती पुटपुटली, “आजोबा होते तेव्हा कोणाची मदत नाही लागायची ग. त्यांचं मी करायचे नि माझं ते. आज चार महिन्यांनी घराबाहेर पडले. आधी घराला कुलूप लावलं की चावी त्यांच्या खिशात दिली म्हणजे मला चिंता नसायची. आज कुलूप लावताना मात्र चावी कुठे ठेवायची म्हणून स्वतःच्या पदराला बांधून आणली. ”
“हम्म !”
या दोन शब्दांमध्ये एक आवंढा नि बरीच कोडी मला पडली होती.
याशिवाय मला काहीच सुचलं नाही.
माणूस इतका आपल्या सोबत्यावर अवलंबला जातो. एखादं काम वाटून घ्यावं तितक्या सहज आयुष्याचा प्रवास वाटून घेतला जातो. पण आता स्वतःचा पदर नि एकटीचं घर एवढीच जगण्याची सामग्री तिच्याकडे उरलेली असते.
प्रत्येक गोष्ट, अश्रू आणि सोबत्याची आठवण सगळचं पदराला बांधलं की घरातला आयुष्याचा प्रवास सुरू असतो.
एवढं होऊनही मला नवल वाटतं, माझ्या पिढीला आत्महत्या नि मरणाला जवळ करावं वाटतं.
ही पिढी सूर्य अस्ताला जाऊनही अंधारात जगण्याची ताकद कायम ठेवते.
स्वतःच्या जगण्याला न्याय देते नि उगवणाऱ्या सूर्याला उदयाचे बळ देते !
आजीने दुनियादारी पाहिली होती. ती आयुष्याशी लढली होती. पण आज ती जगातली सगळ्यात कठोर लढाई लढत होती.
लढाई तिलाच लढायची होती. ती जिंकण्या हरण्यापेक्षा ती लढत राहणं हे तिचं ध्येय होतं.
नेहमी सारखं दर्जा… खूप छान लिहिलं आहे. वाचून आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद 😊
Thank You So much Govardhan 🙂