वन्स अगेन…!

  • by

वन्स अगेन (पुन्हा एकदा)… हा शब्द आपल्या इथे लग्न झालेल्या स्त्रियांच्या आयुष्यात पाप समजला जातो. खूप धैर्य आणि येणाऱ्या पन्नास पिढ्या उलटल्यानंतर या शब्दाला सहज उच्चारल जाईल. पुरुष म्हणून एक पेग जास्त भरला जातो, तसं स्त्रीला एका पेल्याची मुभा २०० वर्षे पार करून आताशा मिळू लागली. लग्न झाल्यानंतर दुसरं लग्न करण्यासाठी किंवा पुन्हा प्रेमात पडण्यासाठी हा शब्द टॅबू आहे.

काही चित्रपट सगळ्यांना आवडणारे नसतात. आपण अशा चित्रपटांना पाहायला हवं. जिथे मोजके संवाद असतात, फ्रेम्स खूप बोलक्या असतात, आणि पात्र? ते तुम्हाला त्यांच्या दुनियेत घेऊन जात असतात.

प्रेम आयुष्याच्या दाराबाहेर उभं असतं, त्या दरवाजातून आत येणारा व्यक्ती अगणित अमूल्य असतो. ती भेट लांबवर नेता आली पाहिजे. भेटीपेक्षा कृतिला खूप अर्थ असतो. त्या काळात माणूस माणूस नसतो, तो प्रेमात कलाकार बनत जातो. तो अविश्वसनीय वागू लागतो.

चित्रपटातली अभिनेत्री शेफाली शहा ही काहीशी  विद्या बालनच्या धाटणीतली, तिच्यासारखी शरीरयष्टी असलेली, फिगरमध्ये असण्यापेक्षा थोडी एकदम किंचित ओव्हर वेट असलेली, थ्री फोर्थ स्लिव्ज ब्लाऊज, सुती साडी, सुटा अंबाडा, कपाळाला साजेशी बारीक टिकली एवढी साधी मुख्य भूमिकेतील नायिका आहे.

केसांना बांधून ठेवणारी नटराजची आवडती पेन्सिल, एक दोन रेंगाळणारी केसाची लट, भुवयांना ताठरपणा, आयुष्यात पडझड झालेल्या नि एकटेपणा आलेल्या असंख्य दुखांचे आवरण सांगणारे काळे डाग, साडीचा पदर बेफिक्री थोडा लूज, खांद्यावरून पडणारा तरीही अश्लील नसलेला, चापून चोपून घातलेली अंगभर साडी नि तिचं ते कामात असताना त्या साडीच्या पदराला सवयीने खांद्यावर टाकणं, त्याचं सतत खाली पडत रहाणं आणि शेवटी त्याची अडगळ होते म्हटल्यावर त्याला पिनाने बंद करून कामात गुंतने. याहून वेगळं असतं का तिशी ओलांडल्यानंतर लग्न झालेल्या स्त्रीचं आयुष्य ?
तारुण्यातल्या अभिनेत्री आणि वाढत्या वयाच्या उंबरठ्यावर असलेल्या अभिनेत्री यापैकी अधिक आकर्षक या साध्या पण गूढ पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री वाटतात. आंटी म्हणून त्या फेमस होतात. पण या स्त्रिया अधिक मच्युर स्ट्रोंग कंटेंट समोर आणतात, खिळवून ठेवणारा.
वन्स अगेनसारख्या चित्रपटात अभिनेत्री पॅटर्नमध्ये बसणारी हिरोईन सूट नसती झाली.
कारण या चित्रपटांमध्ये संवाद खूप महत्त्वाचा असतो, तो संवाद साधताना त्यातली शांतता आवाजातून यायला हवी.
तिने स्वतःसाठी वेळ ठेवावा. स्वयंपाक घर तिचंच आहे तर त्यातला एक कोपरा तिचा तिने स्वतःसाठी ठेवावा. जसा तारा ठेवते. तिच्या रेस्टॉरंटच्या कामातून, रात्री दहा वाजता ती स्वतःसाठी वेळ काढते. चुकीने अनोळखी व्यक्तीला लागलेला फोन कॉल हा नवं नातं तयार करत जातं, विधवा तारा आणि डिव्होर्स होणाऱ्या फेमस अभिनेता अमर कुमार यांच्यामध्ये. आयुष्याच्या मध्यावर एकटेपण येणं आणि त्याला असा काहीसा मोड मिळणं हे खूप अचंबित करणार असतं, तितकंच अपराधीपणाची भावना देणारं असतं. पण तरी या दोघांमध्ये ते प्रेम घडतं.

प्रेम मोगऱ्यासारख असतं. लपून छपून चोरल्या जाणाऱ्या मोगऱ्याला वेगळा दरवळ असतो, तो दरवळ फक्त नि फक्त त्या दोन व्यक्तींना येत असतो.
तो मोगरा कुणाच्या हातात पडण्याची जरा जरी भणक आली,  तरी अंगावर धावून जाणं ठरलेलं असतं.

कथेबरोबरच संगीत, दिवसातल्या नेमक्या वेळी केलेलं चित्रीकरण मनमोहक आहे. प्रत्येक दृष्याबरोबर बॅकग्राऊंडला लावलेली म्युजिक आनंद देणारी आणि नव्या सुखाची ओढ लावणारी आहे.
दोन व्यक्तींच्या आयुष्याला दैनंदिन कामांचे बॅकग्राऊंड असले तरी, तिचं रेस्टॉरंटमध्ये कामात असणं, मनात चालू असलेल्या विचारांना पदार्थांची फोडणी देणं हे लाजवाब आहे. फिल्म आणि खाणं हा ज्याचा बेस्ट टाईम असतो, त्याला हा चित्रपट बिलगून राहतो.

एक फेमस अभिनेता अमर कुमार (नीरज काबी) नावाचा जो आयुष्याच्या अशा मोडवर आहे, जिथे तो डीवोर्स घेणार आहे. पण त्या दरम्यान तो एका विधवा पण दोन मुलांची आई असलेल्या ताराला भेटतो. ही भेट चेहऱ्यांनी झालेली नाही. तिच्याबरोबर फोनवर बोलणं झाल्यानंतर तिच्या हातच्या खाण्याचा डब्बा खाऊन तृप्त झालेल्या आत्म्याने केवळ तिच्या प्रेमात पडण्याची टकटक दिली आहे प्रेमाच्या दरवाजावर. दोघेही दरवाजाभोवती घुटमळत आहे. ती भेट लांबत जाते.

शेवटी न राहवून तो तिला भेटायला येतोय, अभिनेता म्हणून फेमस असलेला हा नायक भर रस्त्यात तिच्या हातात गजर्याची ओंजळ देऊन जातो. ती बाहेरून ठाम दिसत असली तरी तिच्या मनात मोगऱ्याचा गंध आपसूक पसरताना जाणवतो.

समाजापासून आणि आधीच्या लग्नामुळे ओकवर्ड झालेलं हे नातं खूप वेगळं आहे.त्यांची ही रस्त्यावरची पहिली नजरेची भेट होते.
ती त्याला चिठ्ठीत लिहिते,
आजकल मेहमान भी बताकर आते हैं।
हमारे यहां जब कोई बताकर आता है तो ये डिश बनती हैं,
अगर खाना अच्छा लगे तो मिलकर बताइएगा।

जसं दारू पिणाऱ्या व्यक्तीला निमित्त हवं असतं, तसं खाण्याचे शौकीन असलेल्या खवय्यांची हीच तऱ्हा असते. खाण्याचा शौक वेगळ्याच विश्वात नेणारा असतो. रोमांसला कोथंबिरीचा दरवळ येत जातो…  आणि हे खवय्ये जर प्रेमात असतील तर मग मात्र वन मोर म्हणत म्हणत वन्स अगेन होऊनच जातो…

तो एका भेटीत विचारतो,
ख़ुद को ही ढूंढ़ के किसी को पाया जा सकता हैं।
त्यावर ती उत्तरते,
शायद, किसी और को पाकर ख़ुद को ढूंढा जा सकता हैं।
त्यांनतर ती विचारते,
आपने क्या सोचा था, कैसी होगी तारा?
तिचं वर्णन एखाद्या जिवंत शब्दासारखं, तो त्या टेकडीवर बसून करतो.
म्हणतो,
वहीं बलखाती चाल।
वहीं हाथों में कंगन।
वहीं बालों का जोड़ा।
वहीं लहराती हुई साड़ी।
चेहरे पे गुरूर और आंखों में नमी।
कुछ ऐसाही सोचा था मैंने।

काही चित्रपट नाजूक असतात. साऊथचा ९६ जसा आहे, त्या धाटणीचे चित्रपट. जिथे संवाद आणि फ्रेम्स हे चित्रपटाचा आत्मा असतो. काही वास्तविक फ्रेम, काही खूप अवास्तविक, या फ्रेम्सचा हा खेळ म्हणजे वन्स अगेन!

काही डायलॉग त्यासोबतच्या दृष्यांना जोडून येतात, ते अधिक रिलेट होतात, जसं…
जिंदगी तेय कर ले हमसे क्या चाहिए।
सबसे कम उम्र किसकी होती हैं जानती हो? न्युज की !
शायरी ही करनी थी तो,
चोरी की तो ना करते।

समाजात लग्नानंतर स्त्रीचं आयुष्य एका वाक्यावर फिरवलं जातं, “हमारे लिए हमारे बच्चों की खुशी बहुत आगे हैं।” आणि हा कुठला डायलॉग नाही, ही अनेक स्त्रियांच्या आयुष्यातली शोकांतिका आहे. पण हे  म्हणत किती दिवस आपल्या वयाच्या झालेल्या मुलांना गोंजारत बसायचे? जबाबदारीला आयुष्य मानून घेतलं जातं. मोठं होऊनही मुलं जर आई वडिलांच्या भावनांचा विचार करू शकत नसतील तर मुलं त्यांचा स्वार्थ पाहायला शिकले समजून जावं, इतकं सरळ गणित आहे हे.

चित्रपटात आपण एक सुरुवात आणि शेवट अपेक्षित करत असतो… काही चित्रपट फक्त प्रेक्षकांशी बोलणारे असतात, लॉजिकल बोलणं. तुम्हाला काय घ्यायचं ते तुमच्यावर आहे.

चित्रपट मध्यंतरानंतर खरा खेळ सुरू होतो…
एका मशहूर अभिनेत्याला रेस्टॉरंट चालवणाऱ्या ताराक्कावर प्रेम होतं, बातम्यांमधून तिचं आयुष्य समाजासमोर येतं… An old star with a new lover! यावर मुलगा आईला दोष देतो, मुलगी समजून घेते… ती मुलीसमोर व्यक्त होते नि दुसऱ्या रात्री अमर कुमारला भेटायला जाते… त्यावेळी तो म्हणतो, मुझे अपने आप से ज्यादा आपकी फ़िक्र थी।
तिचा तोल जातो, तो तिच्याजवळ येतो, तिच्या मनात चाललेली प्रेमाची भावना तिला मागे सरू देत नाही… त्याचं तिच्या मानेवर केवळ श्वासांनी रेंगाळणं तिला त्याला गच्च मिठी मारायला भाग पाडतं…
त्या मिठीला स्वल्पविराम देत दोघेही घरी परततात, मात्र जवळ आलेला तो क्षण नशेसारखा मनात उरतो, नि आरशात ती तिच्या पाठीला पुन्हा नव्या प्रेयसीसारखी न्याहाळू लागते. प्रेम होतं तेव्हा आरशात पाहणं सुरू होतं.
मात्र आरशाला तडा जायला वेळ लागत नाही.
प्रेमात असाल तेव्हा तुम्ही एकमेकांच्या अस्तित्वाचा आदर करतात. तुम्ही लपून जरी प्रेम करत असाल तरी तुमच्या समोर कोणी आलं तर तुम्ही घाबरून जात नाही, ओळख करून देतात. बेसिकली प्रेमात पडलो की प्रेम केल्याची लाज वाटत नाही. पण अमरच्याबाबतीत हे होत नाही… तिची ओळख करून देताना तो म्हणतो, ये तारा, ये खाना बनाती हैं मेरे लिए।
प्रेमात आदर संपला मग काहीच उरत नाही. व्यक्ती हक्काचा झाला की इतर गोष्टी गळून पाडतात का? अंगाला नि पदराला रोजचा लागलेला मसाल्याचा वास त्याला आता हक्काचा झाला म्हणून आवडत नाहीये का? असंख्य प्रश्न पडतात. पण ताराच्या वागण्यातून नवीन उत्तरं सापडतात. तिची अशी ओळख करून देणं तिलाही अपेक्षित नव्हतं. ती नाराज होते, तिला कळत नाही कसं रिअॅक्ट व्हावं, ती तिथून निघून जाते… नि एक दिवस पुन्हा कॉल करते, तेव्हा तो सॉरी म्हणतो आणि त्यावर ती विचारते, जर तशी ओळख करून देणारं नव्हता मग माझी ओळख तरी काय करून देणार होतास?
दोघेही अनुत्तरित होतात.
मैत्रीण म्हणू शकला असता, अस मला सहज वाटून जातं. तिची विचार करण्याची पद्धत वेगळी म्हणून ती स्वतःसाठी अधिक वेळ घेते. त्यावर एकदा रिश्तों से डर लगता है मुझें। म्हटलेला अमर चित्रपटाच्या शेवटी म्हणतो, मैं आपके साथ जीना चाहता हूं, मैं आप से प्यार करना चाहता हूं।
‘ये मुमकिन नही’ म्हणत फ्रेम बदलते. घर सांभाळणाऱ्या त्या गृहिणीच सगळं सुरळीत होतं, मुलांची शिक्षणं, त्यांची लग्न. मात्र तिचं आयुष्य तिथेच थांबलेलं असतं.
नि तिथे प्रेम तुम्हाला निडर बनवतं.
मुलामुलीच्या जबाबदारीतून बाहेर पडून तारा आणि अमर एका वेगळ्या सफारीला निघून जातात. मोगर्याबरोबर जसा जास्वंद शोभून दिसतो, तसं हे प्रेम होतं. तुम्हाला मोगऱ्याबरोबर जास्वंद असू शकतो, हे स्वीकारावं लागतं. जे चालत आलं ते आणि तेवढंच योग्य, हा भ्रम तोडावा लागतो. नि मग आपोआप बहरत जातो आयुष्याचा मोगरा नि लाल जास्वंदही!

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *