विचारांचा दरवाजा…!

  • by

कसं कुणी अचानक दार ठोठावत येतं, इतके दिवस स्वतःची घडी केलेले आपण कपाटाबाहेर पडावे तसे दाराबाहेर पडतो. त्या बाहेरच्याला भेटतो. आपल्याला सोबत घेऊन तो बाहेरचा ‘चार गोष्टी’ बोलतो. मग तो माणूस जातो, दार बंद होतं… पण आपण आता सुटे झालेले असतो… कपाटात घडी घालून पडलेले आपण आता अस्ताव्यस्त झालेले असतो.

चार गोष्टी! त्यातली एक जरी गोष्ट कळली असती तरी मी तेवढीच अस्ताव्यस्त झाले असते. दार बंद होतं तोवर मला माझ्या वाट्याला असलेलं सगळं माहीत होतं. पण अनपेक्षितपणे काहीतरी घडलं. दार उघडल्याक्षणी चार गोष्टी कळल्या. त्याच क्षणी माझ्या विचारांनी पुन्हा गिरट्या घालायला सुरुवात केलीय. आता त्या चार गोष्टींना असंख्य फाटे फुटले आहेत. पण सगळेच नकारात्मक. या दरम्यान माझ्याकडून जेवण मिस झालंय, चहा मिस झालाय, काही पेंडींग कामं होती त्यांचा ढीग तसाच आहे. मी बेपर्वा आहे… एखादा विचार इतका हावी होतो की माझ्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होत जातो. मला कळत नाही असं नाही. पण ‘नाही केलं तर काय बिघडेल’ या बेजबाबदार फिलॉसॉफीवर मी पुढचं सगळं अवलंबून ठेवते. मग मी त्या फाटे फोडलेल्या विचारांचा पाठलाग करते आणि पाठलाग करताना या पेंडिंग कामांचा विचार करत राहते. मग कामे राहिलीय याचा गिल्ट कमी करण्याचा प्रयत्न करते. पण कामं न करता फक्त त्यावर विचारच करते. पण यामुळे स्वतःला मल्टी टास्कर हे टायटल देऊन स्वतःच्या मेंदूची तस्करी करण्यात यशस्वी होत राहते. आता मला त्या चार गोष्टी ओळखीच्या झाल्या आहेत. त्या चार गोष्टींचं माझ्या आयुष्यात येणं झालंय. ते ना माझ्या विचारांमुळे टळलं, ना माझ्या घालमेलिने. जे घडायचं ते घडलच. आता पुन्हा मला माझ्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी माहिती आहेत. माझ्या स्वतःची विचारांच्या खाईत गुंडाळले जावं तशी अस्ताव्यस्त गुंडाळी करून झाली आहे.

माझ्या आयुष्याचा काळ लोटतो. एक दिवस अचानक पुन्हा दरवाजा ठोठावतो. मी या विचारांच्या विश्वातून पुन्हा घरंगळत जमिनीवर पडते. घडी अस्ताव्यस्त होते. थरथरत्या हाताने दरवाजा उघडते. बघते तर एक तरुण मुलगा, माझी पेंडिग कामे दाखवत माझ्याकडे येतो. ती कामे त्याची होतात. मी म्हातारी झालेली असते. त्याला धुळीत पडलेल्या फाईल्स देऊन ‘कामात मग्न हो, विचारांत नको’ कारण ‘ तसं नाही केलं तर काय बिघडेल’ याचं जिवंत उदाहरण मी आहे. बेफिकिरी आयुष्य सेलिब्रेट करण्यात असू दे.

त्या दिवशी मला माझी चूक लक्षात आली आणि मी त्या दरवाजावर एक चिठ्ठी लिहून ठेवली. “दरवेळी दरवाजा कोणीतरी ठोठावण्याच्या भ्रमात राहू नको. आपल्याला आतून स्वतःसाठी दरवाजा उघडावा लागेल. जगाकडे बघावे लागेल आणि फक्त विचारांचा पसारा मांडून त्यात गुरफटून न जाता क्रियेवर लक्ष द्यायला हवे. प्रत्येकवेळी जिंकता नाही आले तरी चालेल पण जिवंत राहता आले पाहिजे.

– पूजा ढेरिंगे

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *