आताची पिढी स्वातंत्र्य आहे म्हणून पुलं वर टीकेचे ताशेरे ओढत म्हणते, पुलंना इतका मान का? त्यांचं लिखाण इतकही खुसखुशीत आणि विनोदी नव्हतं. त्यांनी फक्त शहरी मध्यमवर्गीय लोकांसाठी लिहिलं, त्यापेक्षा टिंब टिंब टिंब टिंब बरे, वगैरे वगैरे.
पण त्या टीकाकारांना हे माहीत नसतं, की ज्या काळात ते लिखाण घडत असतं, त्या काळातील सामाजिक, आर्थिक अन् राजकीय घटकांचा परिणाम कलेवर होत असतो. त्यातून त्या त्या काळातले लिखाण, चित्र, चित्रपट आणि इतर मनोरंजनात्मक माध्यमे विकसित होत असतात. कारण मनाची गुंतवणूक करून कलेची निर्मिती होती. त्यामुळे त्या त्या काळात कलाकारांच्या मनाला जे स्पर्शून गेलं ते व्यक्ततेत आलं.याच थेअरीच्या बेसिसवर पुलंचे लिखाण उजवे ठरते. भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्या काळात पुलंनी लेखणीला जवळ केले. त्या काळात लोकांच्या मनावर असंतोष आणि अन्यायाचे सावट होते. देश स्वतंत्र झाल्याचे सुख असले तरी गेल्या दीडशेहून अधिक वर्षांपासून देशाचा इंग्रजांशी चाललेला लढा देशातील जनतेवर नकारात्मकतेचे आणि दुःखाचे जळमटं वाढवणारा होता. त्यामुळे या काळात लोकांच्या आयुष्यातल्या प्रसंगांना विनोदाची लकेर जोडणं आणि त्यातून त्यांना पुन्हा आयुष्यावर प्रेम करायला सांगणं सोप्प काम नव्हतं, त्यात साहित्यकार म्हणून पुलं अव्वल ठरले आणि नेहमीच जास्त लोकांसाठी वंदनीय राहिले. त्यांनी लोकांना पुन्हा नव्या स्वतंत्र आयुष्याची स्वप्न दाखवली. त्यांच्या जगण्यात आशेची पालवी निर्माण केली. रोजच्या जगण्यात सुखाच्या अन् विनोदाच्या खुमासदार शैलीने पुन्हा कित्येक चेहऱ्यांवर हसू फुलवले. महाराष्ट्रातील स्टँड अप कॉमेडीचे जनक म्हणून जेव्हा पुलंना मान दिला जातो तेव्हा तो कितीतरी पटींनी मोठा असतो. त्यामुळे मी म्हणते, जेव्हा जेव्हा अन्याय, दुःख, वेदना झाली आहे, तेव्हा तेव्हा कलाकार जन्माला आले आहेत, पुढेही येत राहतील. मग त्यातल्या काहींना कौतुकाची थाप मिळेल, तर काहींना ट्रॉलींग! आताच्या काळात एकाच व्यक्तीला एकाच वेळी कौतुक आणि ट्रॉलिंगला सामोरे जावे लागते. इथे सुद्धा काळ आणि बदलती परिस्थिती मोठ्ठा रोल प्ले करते. हेही स्वीकारायला हवे. “
– पूजा ढेरिंगे #pldeshpande