देहबोली आपल्याशी संवाद साधते तेव्हा चित्रपट आपल्याशी अलगद बोलू लागत असावा. मला पांघरूण तसा वाटला. पांघरूण हा चित्रपट शरीर भुकेवर- सुखावर भाष्य करतो. नक्कीच शारीरिक सुखाचा शृंगार हा त्या दोघांत बोलला जाणारा खाजगी विषय आहे. पण बऱ्याचदा तो तिथेही बोलला जात नाही. ती घुसमट बाहेर काढणारं ‘पांघरूण’ वेगळा विचार देऊन जातो.
पण आताच्या काळातही हा चित्रपट स्वीकारणं आव्हानात्मक आहे. येणारा प्रेक्षक तितक्या मोकळेपणाने ते स्वीकारत नाहीये. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या स्त्रियाही ‘हा विषय बोलायचं टाळायला हवे’ अशा आविर्भावात आहे. पण अशा चित्रपटांत देहबोली महत्त्वाची आहे. चित्रपटाची मुख्य नायिका लक्ष्मी तिच्या पात्राला साजेशी आहे. तिचं अंग एकाचवेळी नाजूक आणि समंजस आहे. कोवळी पोर आहे, आकार देईल तशी वळेल. असा तिचा देह आणि वावर आहे. लक्ष्मी ही खऱ्या आयुष्यात मांजरेकरांची कन्या असल्यामुळे त्यांच्या कामाचं निरीक्षण करून त्यातले बारकावे शिकत असेल नकळत. त्याशिवाय असा अवघड पात्र साकारण्याचा सहज अभिनय सहज शक्य होत नसतो.
वैभव जोशींनी शब्द साज चढवलेलं ‘ही अनोखी गाठ कोणी बांधली’ हे रेशमी गाणं बॅकग्राऊडला लिहितानाही ऐकू येत आहे. गाण्याचे शब्द मनावर अलवार चित्रपटाची गूढ कथा विणत आहेत. हे गाणं या चित्रपटाच्या शेवटास उलगडत जातं. आपल्याला त्याचे अर्थ लागतात. त्यामागे वाजणाऱ्या वाद्यांचा दणदणाट मनाला हलवून टाकतो.
चित्रपटातल्या फ्रेममधले कवडसे, धूलिकण, कोकणी फ्रेम्स, निसर्गाचा बहाव आणि जुना वारकरी काळ हे डोळ्यांना अतिशय सुखद करणारं आहे. पण या चित्रपटातला मुख्य नायक अंतू गुरुजी मात्र न पटावा इतका खरा, शांत आणि समंजस आहे. त्याचं असणं खऱ्या कीर्तनकाराला पटेल इतकं आदर्श आहे.
मात्र त्या काळातल्या विवाहांविषयी माझी मोठी तक्रार आहे. म्हणजे कोवळ्या पोरीचं बापाच्या वयाच्या पुरुषाशी लग्न लावल्यावर वयोमानाने अर्थात तो लवकर मृत पावेल. त्या लॉजिकनुसार त्या काळातल्या बहुदा सगळ्याच बायकांचं अर्ध आयुष्य विधवा म्हणूनच जात असेल आणि त्या काळातल्या विधवांचे आयुष्य म्हणजे नरक बरा! नवऱ्याचं सुख नाही ते नाही समाजाच्या टोमण्यांची सोबत! तरीही बाईने किती जळावं दुसऱ्या बाईवर? इतकं की दुसऱ्या बाईच्या नशिबी विधवा झाल्यावर तसं जिणे आलं नाही तर तिचा दुस्वास करावा? अपवाद सोडले तर बायाच बायकांना या चौकटीत बांधण्यात पुढे होत्या. आजही आहेत.
त्यानंतर “इलुसा हा देह, किती खोल डोह!” या गीताच्या शब्दांनी तर नकळत आपण कुठेतरी दूरवर कितीतरी वेळ आपल्याच शरीराच्या डोहावर पाण्यात खडे टाकत आयुष्याचा पाठ गिरवत बसावं असं सहज वाटून जातं.
चित्रपटात एके ठिकाणी अंतू गुरुजी म्हणतात, “लग्न म्हणजे काय घर आणि मूल सांभाळणं थोडी आहे. तिच्याही काही अपेक्षा असतील.” इथे त्यांच्यातला पती आदर्श वाटला तरीही या वाक्याला वास्तवात उतरवल असतं तर खरंच तेव्हापासूनच पुरुषाला वर्चस्व गाजवण्याचे विशेष हक्क मिळाले नसते. पण याबाबतीत स्त्रीचा सहनशील आणि समंजस स्वभाव इतका की आहे पदरात तेही वाटून देते. जे हक्काचं तेही हट्टाने मागून घेत नाही. हे चुकीचं आहे. याने आयुष्य कण्हत कण्हत संपतं, मग म्हातार वयात तक्रारी नगण्य होतात.
स्त्रीला होणारे छोटे, मोठे स्पर्श किती कमी वाट्याला यावे याची कल्पना करू शकता? बऱ्याचदा लग्नाच्या रात्री झालेला तो स्पर्श पहिल्यांदा असल्यामुळे असह्य होतो, कारण तो अनोळखी असतो, त्यात लघळपघळ नसतो, केवळ त्याला जसा हवा तसा असतो. म्हणजे बाईने केवळ राबत राहावं. राबणारी बाई सुसंस्कृत आणि बाईपणाला साजेशी! तिने आजही सहनशील, तडजोड करणारं आणि सोशिक असावं. शरीर ही गोष्ट फक्त पुरुषाने लुटावी, उपभोगावी. पण तीही त्याची इच्छा असेल तरच.
तसं चित्रपट डायरेक्ट शारीरिक सुखाबद्दल बोलत नाही. सुरुवातीला तो चित्रपटातल्या मुख्य भूमिकेची म्हणजे बालविधवा लक्ष्मीची स्वप्न दाखवतो, विदुर अंतू गुरुजींची सिंगल फादर म्हणून होणारी तारांबळ दाखवतो आणि हळूहळू त्या दोघांना एकत्र आणतो. त्यामुळे सरळ साधं जे आपल्या प्रेक्षकांना हवे ते सारं घडत असतं. पण मध्यांतर शरिरसुखाचं पांघरूण ओढू लागतं. चित्रपटगृहातला प्रेक्षक पाहता लोक या चित्रपटाबद्दल चर्चा करतील पण मोजक्या ओळीत, अडखळत!
याशिवाय मग ‘पांघरूण’ची खरी ऊब लागते माधव भाऊजी आणि लक्ष्मी वहिनीच्या स्पर्शाच्या ओढीत. कोरड्या देहाला आपल्याला हव्या असलेल्या पुरुषाचा स्पर्श होऊन देह त्याच्या मिठीत विरघळावा, ही बेसिक नैसर्गिक अपेक्षा असते बाईची. पण आपल्याला जो पुरुष हवा त्याला हे नको असेल तर? किंवा तो तयार नसेल तर? हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार वेगळे असतात. पण त्याला वाचा फोडण्याचं काम पांघरूण करतो.
आजही शरीर आकर्षणातून होणारा पहिला स्पर्श उनाड, अल्लड, कोवळा आणि हुरहूर लावणारा असतो, हे चित्रपटात पाहणं खरी मेजवानी आहे. स्पर्श मग तो कृतीतून असो नाहीतर डोळ्यांच्या पापण्यांनी. लक्ष्मी आणि माधव भाऊजींचे स्पर्शिक खेळ वरवर खूप अल्लड वाटता पण त्यांच्या मनाचा ठाव घेणारे आहे. पूर्वीच्या काळात आणि आजही कित्येक घरांत सून आणि दिराचे छुपे संबंध ही सुरू होऊन संपून गेलेली आणि त्या चार भिंतीत दडपून गेलेली घटना उरते.
पूर्ण वेळ चित्रपट “शारीरिक स्पर्शाची भूक आणि मनाची खोल दरी, या दोहोंशिवाय प्रेम, नातं, लग्न अपुरं!” याचा पाठपुरावा करत राहतो. कारण आजही ‘स्त्रीचं शरीरसुख हे तिच्या चारित्र्याबद्दल बोलतं’ म्हणून ती स्वतःच कधी चुकून ती चौकट लांघत नाही. कारण तिला मनोमन ठावूक असतं की तो क्षण क्षणिक असेल पण, चरित्र चिरकाल सोबत राहणार आहे.
चित्रपटात लक्ष्मी ते फुल आहे जिला देवाच्या पायाशी जायचं आहे. पण अंतू गुरुजी तिच्या केवळ असण्याचा आनंद, सुवास घेताय आणि माधव ते फुल तोडून तिला स्वर्गसुखाचा आनंद देणारा आहे. पण त्यांची शेजारीण राधाक्का तिला या शारीरिक आणि मनाच्या घालमेलितून अलगद सावध करू पाहतेय. ती म्हणते, “क्षणाचा मोह वेगळा आणि आयुष्यभराची संगत वेगळी!” पण दुसऱ्या क्षणी तीच म्हणते, “पुरुष सगळ्या गोष्टी पुरवतील पण स्त्रीच्याही शारीरिक गरजा असता तेच लक्षात घेत नाही.” या वाक्याचा आताच्या जगाशी संबंध जोडला तर आताच्या काळात फक्त शारीरिक ओढीत अडकून पडले आहे. मनाचा विचार कुठे, कधी आणि कोण करतं…? याचा समतोल राखता येत नाहीच का? शरीर सुखाचा विचार करणारा पुरुष आणि मनाचा विचार करून कुशीत घेणारा पुरुष एकच असू शकत नाही का? दोहोंचा मेळ जमला की नात्याचा सोहळा होऊ लागतो पहा!
त्यामुळे लक्ष्मीचं अल्लड वय तिला स्वस्थ राहू देत नाही. तिला तो क्षण हवाच असतो. तिची घुसमट कुठे बाहेर काढेल ती? मनाच्या घालमेलीबद्दल बोललं जातं तर शरीराच्या घुसमटीचं काय हो? असं नव्हतं की तिला केवळ शारिरीक भुकेची ओढ होती, पण तिच्या शरीराने मनाकडे केलेली ती मागणी होती. त्या मागणीसाठी अंतू गुरुजींचे शिष्य माधव भाऊजी हा तिच्या वयाचाच होता. तिचं त्याच्याकडे आकर्षित होणं माझ्या नजरेतून साहजिक होतं. लॉजिकल होतं. जर तिच्या शरीराला तिच्या नवऱ्याचा एकदा स्पर्श झाला असता तर लक्ष्मीने समाधानाने आयुष्य व्यतीत केलं असतं. पण अंतू गुरुजींनी पहिल्या बायकोचा मृत्यू स्वीकारला नव्हता. त्यामुळे ते लक्ष्मीला जवळ करत नव्हते. या सगळ्यात पहिल्या लग्नातूनही सुख न मिळालेल्या लक्ष्मीचा दुसऱ्या लग्नाने अंतू गुरुजींकडून अपेक्षाभंग होतो. त्यामुळे कितीही टाळलं तरी वयाच्या एका पायरीवर मोहाच्या पाशात अडकत राहतं हे प्रेम! सैल सोडून चालतं, पण मोह थांबत नाही. एक कोवळा क्षण वाट्याला आला की त्यात पाय अडकलाच म्हणून समजा. तसाच चित्रपटाच्या मध्यान्हानंतर लक्ष्मी अन् माधवचा पाय अडकतो. ‘त्या रात्री स्मशान पाऊस होता…’ अस म्हणावं तसा तो क्षण अंतू गुरुजी त्यांच्या डोळ्यांनी पाहता आणि त्यांचा डायलॉग खरा होतो की, “हा अवेळीचा पाऊस असाच नाही आला लखोबा!”
जोपर्यंत माधव आणि लक्ष्मी नग्न अवस्थेत सोबत दिसत नाही तोपर्यंत माझ्यातल्या स्त्रीचं मन म्हणत राहतं लक्ष्मी अल्लड आहे पण ती त्या क्षणाच्या मोहात पडणार नाही. पण ते घडतं. नग्न शरीराने एकमेकांच्या बाहुपाशात पहुडलेले ते दोघे शारीरिक सुख अनुभवतात. तिथली फ्रेम तशी घेणं अनेकांना बोल्ड वाटलं. पण त्या दृश्याशिवाय पांघरूण अपूर्ण राहिल. कारण आपल्या पत्नीला आपल्या शिष्याच्या मिठीत पाहून अंतू गुरुजी रागाने लालबुंद होत दगडी पाट उचलून त्यांच्यावर टाकता की काय असे एक दृश्य दाखवले जाते, तेव्हा त्यांचं रागात हातात येईल त्याने त्या प्रसंगाला नष्ट करण्याचा प्रयत्न करतो आपण. त्यामुळे अंतूचं वागणं मानवी कृत्य वाटतंही. पण तो क्रोध आवरत, झालेल्या घटनेवर शांत विचार करून त्या दोघांच्या अंगावर दगडी पाट घालण्यापेक्षा त्यांना कीर्तनकार म्हणून सत्कारात मिळालेली शाल पांघरूण म्हणून टाकून जातात. ज्यामुळे लक्ष्मीला ते येऊन गेल्याच कळतंही आणि तिच्या हातून घडलेल्या या मोहाची लाज वाटू लागते.
या घटनेनंतर शेवटास अंतू घरी आल्यावर त्याचावर टाकलेला प्रकाश त्याला विठ्ठल म्हणू पाहतो. त्याच्या कपाळावरचा तो वारकरी टिळा, त्याचे शुभ्र कपडे आणि चेहऱ्यावर संतुष्ट निरागस भाव.
पण इतकं का शांत आणि संयमी राहावं एखाद्याने? या अशा वागण्याने कुणाचा तरी अंत पाहिला जातो. त्यांना कळत असतं ना सगळं. तिच्या कायेच्या मोहाचा अंत अंतूने पाहिला. माधव भाऊजी हा व्यक्ती चुकिचा असला तरी तिची भूमिका चुकीची नव्हती. पण आपल्या कृत्याने कुणाचा जीव जाईल म्हटल्यावर कोण मोहाचा पाठलाग करेल ना? हा प्रश्न लक्ष्मीच्या ध्यानी आलाच असेल. म्हणून ती त्यांना विचारतेही, तुम्ही माझा गळा का नाही चिरला? त्यावर गुरुजी म्हणतात, “झाला तो अपराधच आहे. पण माझा विश्वास आहे प्रेमात खूप ताकद आहे.”
शेवटी अंतूचं तसं जाणं जिव्हारी लागतं. वाटतं, गुंता सुटण्याची वेळ झाली होती, मोहाने पाय काढला होता आणि अंतुने तिला मिठीत घेऊन ती गोष्ट पुरी केली असती. पण त्याने त्या घटनेचा इतका धसका घेतला की मृत्यूला जवळ केलं.
बाईचा व्यभिचार समजून घेता येऊ शकतो का? हो, अंतू गुरुजी समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ते वेगळे आहेत. कारण ते म्हणतात ते पांघरूण तुझ्या पापावर नसून माझ्या अपराधावर आहे. असं म्हणून ते प्राण सोडतात. एक अनैतिक मोहाचा क्षण इतकं उध्वस्त करून जातो का? कदाचित हो, ज्याने सर्वस्व अर्पण केलं त्याच्यासाठी मरण ते हेच! त्याचा अपराध त्याला दिसतो, तिचं पापही त्याला दिसतो, हे ज्यावेळी समोर येतं, तेव्हा मला आधीच्या फ्रेममध्ये भासलेला विठुराया खरा वाटू लागतो. त्याला देव समजलं तरी त्याच्या हातून होणाऱ्या चुका त्याला त्या मान्य आहे, त्यामुळे मला तो खरा वाटतो, पटतो.
मन नकळत चित्रपटाच्या शीर्षकावर विचार करू लागतं. त्यामागे किती नेमका विचार मांडण्याचा प्रयत्न असावा, पांघरुणात घडणाऱ्या शारीरिक क्रियेला न गुदमरणाऱ्या नैसर्गिक उबेची ओढ आणि गरज असते. फक्त ते पांघरूण आपल्या हक्काच्या माणसाचं असावं! हे चित्रपट मनन करावे असे असतात. जितके खोल अर्थ लावत जाल तितकेच मोती हाती लागतात.
चित्रपट संपतो आणि मन शेवटी पाप, पुण्याचे हिशेब लावत बसतो. पण जिथे मन आणि शरीर पणाला लागलं तिथे कोणाचं चुकलं कोणाचं बरोबर हे ओळखून तरी काय करणार आणि निकष कोणाचे लावणार? समाजाचे की वैवाहिक आयुष्यातल्या त्यांच्या क्रिया प्रतिक्रियांचे?
– पूजा ढेरिंगे
व्वा..💗# माणूस#प्रेम#सहजता
Khup chhan review lihalay tumhi. Movie ajun bgitla nahi tripn purn samajala. Samajat rahat astana khup velela ase avghdlele prasang kunakdun tri aikayla milatat ani thought process suru hote. Pn aaj prynt kdich eka solution vr alo nahiye. Kadachit ashya prashnanchi pratyekachi utter vegli astat. BTW tumchi ek line khup patali ani aavdli pn. पांघरुणात घडणाऱ्या शारीरिक क्रियेला न गुदमरणाऱ्या नैसर्गिक उबेची ओढ आणि गरज असते. फक्त ते पांघरूण आपल्या हक्काच्या माणसाचं असावं! tumche sglech lekh aavdtat ani aavrjun share krt asto frnds na. Keep it up nd best wishesh always👍