बाहेरून या समाजाचा खेळ पहायचा असेल तर ‘ही’ सिरीज भारतातील प्रत्येकाला रिलेट करेल. इतकं क्रिस्टल सत्य मांडण्याची ताकद चित्रपटांमध्ये आली नाही, कारण तिथे सेन्सॉर बोर्डाच्या हाताखाली बरेच सिन कापले जातात. पण वेबसिरीजना सेन्सॉर बोर्डाच्या मर्यादा नसल्याने बऱ्याचदा खरं मांडण्याचं स्वातंत्र्य मिळते. पाताल लोक तितक्याच ताकदीने सुरू होते. बऱ्याच जणांनी सेक्रेड गेम्सबरोबर तुलना केली, हरकत नाही. कारण सेक्रेडने वेब सिरिजला भारतात चांगले दिवस आणले आणि पाताल लोकसारख्या सिरीज उत्तम कंटेंट देऊन त्याचा दर्जा कायम ठेवत आहे.
चित्रपटाची सुरुवात करताना कथा फ्लॅशबॅकने सुरुवात होऊन मग कथा सध्याच्या परिस्थितीत येऊन दी एंड होतो किंवा सुरुवातीला सध्याची परिस्थिती दाखवून फ्लॅशबॅक दाखवला जातो. वेब सिरीज मात्र सगळ्या पात्रांची ओळख करून देऊन त्या पात्रांची छोटी छोटी कथा टप्याटप्यात दाखवून त्याला योग्य ठिकाणी कट देऊन एंडला कोड्याचे सगळे भाग एकत्र आणून कोडं सोडवते. सस्पेन्स थ्रिलर किंवा डार्क क्राईम या पद्धतीने दाखवल्याने अधिक प्रभावीपणे पडद्यावर येतात. पाताल लोकमध्ये या छोट्या छोट्या कथांची मेहनत खूप उत्तम जमून आली आहे, त्यामुळे शेवटचा एपिसोड सगळ्या कथेला एकत्र आणून निष्कर्षाला पोहोचवतो…
मूळ कथेबद्दल बोलायचे तर, कथा हाथीराम चौधरी (जयदीप अहलावत) या पोलिस अधिकाऱ्यावर आधारित इन्वेस्टीगेटिव थ्रिलर सिरीज आहे. जी स्वर्ग, पृथ्वी आणि नरक या जुन्या संकल्पनांवर भाष्य करते. याचा आपल्या आयुष्यात संबंध लावताना, जात, राजकारण आणि मीडिया असा संबंध लागतो. समाजात विषमता आणि अशांतता निर्माण करण्यामध्ये या तीन घटकांचे महत्व किती प्रभावी आहे, ते प्रत्येक एपिसोड बरोबर तुमच्या समोर येत जातं. कथा सुरू होते एका वृत्तवाहिनीच्या संपादकाच्या हत्येच्या अयशस्वी प्रयत्न आणि ही हत्या करताना पकडल्या गेलेल्या हत्येकऱ्यांपासून.
कथेची सुरुवात ही संपादकापासून झाल्यामुळे पत्रकारिता हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याबद्दल काही खऱ्या गोष्टी लिहाव्या वाटतात.
सध्याच्या घडीला, “पत्रकारिता उरली नाही, मीडिया विकली गेली” या प्रकारच्या पोस्ट, ट्विट आणि मिम्स येऊन त्यावर हसणाऱ्या प्रत्येकाची प्रतिक्रिया पाहून मला त्रास होतो. कदाचित हे सगळं जवळून पाहिल्यामुळे असेल किंवा पत्रकारितेचा छोटासा भाग असल्यामुळे ते अधिक जवळचं वाटतं. पत्रकारितेसाठी एडमिशन घेतल्यानंतर प्रत्येक लेक्चरला सातत्याने समजून घेतलेले बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर आणि गोपाल गणेश आगरकर हे म्हणजे पत्रकारितेच्या पवित्र क्षेत्राचे स्तंभ आहेत, आजही कित्येक वर्गांमध्ये हीच पत्रकारिता शिकवली जाते. विद्यार्थी शिकतात, कारण त्यांना शिकवत असलेल्या प्राध्यापकांवर विश्वास असतो. याच विश्वासाने ते बाहेरच्या जगात पहिलं पाऊल टाकतात. परंतु बाहेरच्या बाजारू दुनियेत त्यांच्या विश्वासाचं आणि प्रामाणिकपणाच मूल्य गळून पडतं. एकतर असं वागून ते अपंग होणार असतात, मरणार असतात, नाहीतर दबले जाणार असतात. या तिन्हीतून वाचण्यासाठी ते विकले जातात.
‘ट्रु जर्नालिझम‘ नावाची संकल्पना केवळ एक दिखाऊ पापुद्रा आहे. त्याच्या खाली तुम्ही एक कॉपी पेस्ट कर्मचारी आहात, नाहीतर कोणाची तरी मर्जी राखणारे गुलाम. जेव्हा पत्रकारिता शिकायला सुरुवात करतात तेव्हा पत्रकारितेचे विद्यार्थी अनेक स्वप्न सांगतात, उदाहरणार्थ; समाजाला बदलायचे, महिलांच्या अत्याचाराच्या बातम्या छापायच्या, असे फोटो काढायचे की ज्यातून समाजाची खरी ओळख समाजाला होईल. पण या सगळ्यांना हे माहीत नसतं की आझाद हिंदुस्तान झाला पण फ्री प्रेस साठी झालेले प्रयत्न हे केवळ कागदावर राहिले. सत्ता आणि पॉवरच्या दबावात सगळी क्षेत्र त्यांचं हृदय गमावून बसले आहेत. पत्रकारितेचं हृद्य म्हणजे प्रामाणिकपणे सामाजिक घटनांचे प्रतिनिधित्व करणे… पण आताच्या घडीला हे प्रतिनिधित्व केवढ्याला पडतंय? गौरी लंकेश याचं ताजं उदाहरण आणि डेथ टू presstitute* ही ट्रोलची पातळी…
हे सगळं सांगण्याच कारण म्हणजे ‘पाताल लोक’ ही अमेझॉन प्राईमला आलेली सुदीप शर्मा लिखित वेबसिरिज. पाताल लोक, नाव वाचूनच थोडी कल्पना येते की, खालच्या पातळीची लोकं. पण या वाक्याऐवढ सोप्प आहे हे सत्य? या सीरिजमधून समोर येतं, जर्नालिझम-राजकारण-लिंग-जात नावाचा धंदा.
सिरीज पाहत असताना सतत समोर येणारा हाथीराम चौधरी, हा मुख्य भूमिकेतील अभिनेता कौतुकास पात्र ठरतो. कधीच लाईमलाईटमध्ये न आलेला हा अभिनेता पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून समोर येतो. परंतु याला आठवायचे असेल तर, गँग्ज ऑफ वासेपूर, रॉकस्टार, खट्टा मिठा, गब्बर इज बॅक, राझी यांसारख्या चित्रपटातून तो काहीअंशी प्रकाशझोतात आला होता. परंतु अभिनय त्याचा पिंड असूनही कित्येक वर्षांपासून त्याचं स्ट्रगल कायम होतं. पाताल लोकमुळे समोर आलेला हा हाथीराम साऊथ इंडियन चित्रपटातील हिरोंपेक्षा कमी नाही. हां, पण वाढलेली ढेरी आणि चेहऱ्यावरील पिंपल्स हा त्याच्या शरीराचा भाग त्याच्या भूमिकेसाठी खूप वरचढ ठरतो. भारतीय प्रेक्षकांना अपीलही करतो. त्याचा चित्रपटातील वावर हा कुठल्याही सामान्य घरातील पोलीस अधिकाऱ्याचा असावा तसा आहे. त्याची बायको आणि मुलगा हा आपल्याच घराचा भाग वाटतात. वडील पोलीस असूनही कधीही हातात न घेता आलेल्या बंदुकीची उत्सुकता मुलाला कुठे नेऊन सोडते, याचे खूप खूप महत्त्वाचे आणि बारीक कंगोरे लेखकाने पकडले आहे, ते बघून आत्मपरीक्षण करण्याची संधी लेखकाने प्रेक्षकांना दिली आहे.
सिरीज जसजशी पुढे सरकते हळूहळू हिंदू-मुस्लिम-जाट या तिन्ही समाजातील काही तथ्यपुर्ण घटनांचा उतारा देऊन समाजात प्लॅन करून घडवून आणलेल्या दंगलींमागचे चेहरे दिसू लागतात. स्वतःची जात विसरून ही सिरीज पाहिली तर निःपक्षपातीपणे या सगळ्यांवर किमान विचार कराल.
सीरिजमधील मुस्लिम समाजाचा मुद्दा;
मुस्लिम समाजाबाबत असलेल्या पूर्वग्रहांमुळे प्रामाणिक मनुष्याला जाती व्यवस्थेचा बळी द्यावा लागतो, हे काही घटनांमधून समोर येते. याची काहीशी झलक हाथीरामच्या पोलीस अधिकारी मित्र अन्सारी बरोबर घडणाऱ्या घटनांवरून दिसते. आरतीचा प्रसाद देताना संकोच, नोकरी मिळताना प्रोब्लेम हे त्यांनीही स्वीकारलेली जातिरहित सत्य!
या व्यतिरिक्त संशयित आरोपींची नावे मुस्लिम आहेेत मग आईएसआई, अल जिहाद, पाकिस्तानी, आतंकवादी या पर्यायांमध्ये टाकून बऱ्याच केसेसला पूर्णविराम कसा दिला जातो, याचे उत्तम स्पष्टीकरण देणारी ही सिरीज आहे. मुस्लिमांबाबत असलेला सरसकट पूर्वग्रह हा बऱ्याचदा अनेकांची आयुष्य संपवून टाकतो. याचा पश्र्चाताप कोणालाच उरत नाही. याची मोठी झलक सिबिआईकडे तपास गेल्यानंतर येणाऱ्या वक्तव्यावरून दिसते. या शिवाय हाथीराम सस्पेंड होऊनही या सगळ्या घटनेचा शोध घेतो, तेव्हा तो गुन्ह्यात अडकलेल्या प्रत्येक संशयित आरोपीच्या कुटुंबाचा तपास करतो. त्यातून कबीर एम नावाचे पात्र समोर येते. तेव्हा चौकशी करण्यासाठी कबिरच्या गावी पोहोचलेल्या या पोलिस अधिकाऱ्याला कबीरचे वडील म्हणतात, माझ्या पहिल्या मुलाची हत्या ही गाईचे मांस खाल्याच्या संशयामुळे झाली. दुसऱ्या मुलाला वाचवण्यासाठी मी खोटे सर्टिफिकेट बनवून घेतले. तेव्हा त्याचे वडील जो डायलॉग म्हणतात, त्याने मन पिळवटून येते. ते म्हणतात, जिसे हमने मुसलमान नहीं बनने दिया, उसे आप लोगों ने जिहादी बना दिया।”
जाट समाज:
हा समाज पंजाब साइडला मोठ्या प्रमाणात आढळून येतो. याबाबत अधिक माहिती नसल्यामुळे त्यावर लिहिणं टाळेल. परंतु पंजाब मधील छोट्या गावात राहणारा दुसरा आरोपी तोप सिंग जेव्हा उचभ्रू लोकांच्या अन्यायाला प्रत्युत्तर म्हणून तीन मुलांवर चाकू चालवतो, तेव्हा त्यातील एकजण मरताना म्हणतो, बलबीर सिंंह (त्याचा बाप) तेरी माँ ** देगा! आणि ते खरं होतं.
तिथला सिन डोळ्यात आग आणतो. जाऊन धाडकन त्या पुरुषाच्या मानगुटीवर पाय देऊन त्याच्या शक्तीचा माज जाळून टाकावा, इतका निर्दयी सिन आहे तो. मी त्याला सामूहिक आणि सार्वजनिक बलात्कारच म्हणेल! … जसा बलात्कार शब्द मोठा, तितकेच ते कृत्य नीच आहे.
चिनी बद्दल काय लिहू? हा चार आरोपींपैकी एक आहे. तिच्या अस्तित्वाने मला धैर्यशील बनण्याची प्रेरणा दिली असली तरी तिचं आयुष्य कोणाच्याच वाट्याला न येवो. कारण मुलगा म्हणून जन्म घेऊनही नेहमीच उपभोगाची वस्तू म्हणून राहणे अमान्य असल्यामुळे ट्रान्सजेंडर बनलेला चिनी हा मुलगी म्हणूनही कित्येकांच्या उपभोगाचीच वस्तू राहतो. ती चिडही व्यक्त करता न येणारा शांत चिनी समाजाच्या सो कॉल्ड आदर्शवादाला शेवटपर्यंत टोचत राहतो.
अशी प्रत्येक आरोपीची कहाणी वेगळी आहे. बघण्यासारखी आहे. प्रत्येक आरोपीला समाजाने आरोपी बनण्यासाठी भाग पाडले, अशी प्रत्येकाची कथा आहे.
परंतु सगळीकडे जात कॉमन आहे. आयुष्य नावाचा अशांत आणि प्रत्येक टप्प्यावर खडतर प्रवास त्या कुटुंबीयांसाठी आहे जे प्रामाणिकपणे आयुष्य जगतात, परंतु त्यांना सरसकट जातीच्या विळख्यात ढकलून दिले जाते.
सीरिजमधील खलनायक, मुख्य आरोपी म्हणजे अभिषेक बेनर्जी अर्थात कोल्ड ब्लडेड मर्डरर ‘हाथोडा त्यागी’ त्याच्या खुंखार मेलेल्या डोळ्यांनी कोणीही व्यक्ती हडबडून जाईल इतकी ताकद त्याच्या केवळ एकटक बघण्यात आहे. त्याला बोटावर मोजण्याइतके डायलॉग आहे, पण डोळे बंद केल्यानंतर त्यागी तुमच्या नजरेसमोरून जात नाही. एखादा व्यक्ती काहीही हावभाव न देता केवळ तुमच्याकडे बघत राहिला तर? त्यागी हा गुन्हेगार दाखवला असून त्याला कुत्र्यांविषयी खूप प्रेम आहे. या प्रेमाखातर घडणारे किस्से बघण्यासारखे आहे. असे म्हटले जाते की, या सिरिजची कास्टींग त्यागीने केली असून, त्याने स्वतःसाठी हाथोडा त्यागीचे पात्र निवडले आहे. या उत्तम कास्टींगमुळेही ही सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
मुळात सिरिजचा रिव्ह्यू लिहिणे चुकीचे आहे. कारण हा सगळा गोंधळ एकत्र पाहून निष्कर्षाला येणे आणि त्यांनतर त्यावर सार्वत्रिक भाष्य होऊ शकते पण वैयक्तिक प्रत्येक एका एपिसोडवर लिहून सिरिजच्या कथेला कमजोर करण्यासारखे आहे. त्यामुळे या सगळ्या एपिसोडच्या रहाड्यात तुम्ही सगळचं आत्मसात करतात अस नाही, तुमचा मुड नसेल तर तुम्हाला यातलं काहीच आवडणार नाही, मात्र मुड न्युट्रल असेल तर तुम्ही अगतिक होऊन अर्ध्या दिवसात हे भाग संपवून टाकाल.
मला यातलं सगळ्यात जवळच वाटलेलं जग म्हणजे पत्रकारितेचं. कुणाला त्यातलं राजकारण अपील करू शकतं, कुणी हाथीराम या एका सामान्य आणि नेहमीच अव्हरेज विद्यार्थ्यासारखी नोकरी केलेल्या पोलीस अधिकाऱ्याबाबत भावूक होऊन ही सिरीज पाहाल. कुणी सिस्टिमवर असलेला राग कुठेतरी दाखवला जातोय का? याचे उत्तर मिळवण्यासाठी ही सिरीज पाहील.
कुणी हिंदू त्याच्या मुस्लिम भावाला का आपलेच हिंदू लोक तिटकाऱ्याने वागवतात याचे मूळ बघेल, कुणी मुस्लिम ही सिरीज पाहून अश्रू अनावर होऊन रडेलही.
कथेचा मूळ सार म्हणजे, संपादकाच्या खुनापासून गुन्हेगारांना अडकवण्यापर्यंत ते तोंडावर आलेल्या निवडणूकीच्या वेळीच हे सगळं घडण्यापर्यंतचे सगळे काही प्लानिंग असतं. याचे उद्दिष्ट म्हणजे या सूक्ष्म तपासाकडे मीडिया, राजकारणी आणि सर्व सामान्यांचे लक्ष वेधून ठरलेल्या प्लॅन नुसार सगळं घडवून आणणे. यातून काय साध्य केलं जातं याचा निष्कर्ष म्हणजे शेवटचा एपिसोड!”
जातीवाद, समाजवाद दाखवल्यामुळे यावर बऱ्याच संघटनांनी आरोप नोंदवले… पण तरुणाईने त्यांना दिसते त्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळेच कदाचित आताच्या टॉप सीरिजमध्ये पाताल लोकचा समावेश झाला आहे. अशा सिरीज मधून नव्याने दिशा शोधणाऱ्या तरुणांना मनोरंजनाच्या माध्यमातून विचार करण्यास योग्य कंटेंट मिळत आहे, ते अधिक महत्त्वाचं आहे..
अतिशय माहितीपूर्ण आणि सुंदर विश्लेषण