पुरुषप्रधानात भरडला गेलाय ‘तो’

“माजोरडा, नतद्रष्ट, वासनांध”
हि जीभ तुझी मला पाहून उचलली जाते.

नाही म्हणत पुन्हा तू आमच्याच स्वाधीन होत जाते,
जसं गुलाम तुम्ही आमच्या होत गेल्या पण या गुलामीला तुम्हीच प्रोत्साहन देत गेल्या…

वाढत गेला असेलही माझा अहंकार, काय चूक ती?
प्रमाणापेक्षा महत्व वाढत गेले की माणसे होतातच गुलाम की. !

थोडी लाज, थोडा स्वाभिमान तुम्हीही राखला असता स्वतःचा,
पदरीचं काढून देताना पदर पडलाातेंव्हाच स्वाभिमानाची कवाडं तोडली तुम्हीच!

मला नावे ठेऊन निगरगट्ट होतो मी,
कारण शेकडो वर्ष जुनी हि पुरुषप्रधान मुळं खतपाण्याने घट्ट झाली ती!

पुरुषा, नवी मुळं तुला बनवावी लागतील बुंद्यापासून,
तेव्हा उठ तू कणखर मनापासून तनापर्यंत…

मी पुरुष आहे कठोर, मेहनती, गलिच्छ, पाषाण हृदयी,
तरीही मी पुरुष आहे हळवा आणि तुझाही, जर तू तुझी असशील कुठल्या संध्येला स्वतःत!

कुठल्यातरी सांजेला तुला मी दिसेल तुझाही,
तेव्हाच जेव्हा तू स्वतःसाठी होशील ठाम !

“कुठल्यातरी हजारो पुरुषांनी माज केला, अहंकार गाजवला, कठोर वागला, अब्रू लुटत गेला, त्या दिवशीच माझ्या अस्तित्वाचा मृत्यू होत गेला…
पुरुषप्रधान म्हणताना एक सुंदरशी वास्तू म्हणून जन्मलेला पुरुष पोकळ होत गेला…
तेव्हा हा पोकळ पुरुष लिहितो;
पुरुषप्रधान संस्कृतीच्या रांगेत मीही तर चेपला जातो,
का तुम्ही मला सोयीस्करपणे दुर्लक्ष करता?
थोडा नामर्द म्हणतील म्हणून कठोर मीही होतो,
तेव्हाचं दुर्लक्षित होणं मला अगदीच अस्तित्वासह मान्य होतं,
पण स्त्रियांच्या शरिरामुळे वासनांध झालेल्या पुरुषजातीत मी त्यांच्या मनापर्यंत पोहोचायचा प्रयत्न निष्फळ का होईना करतो…
तेव्हाही तुम्ही मलाही निसरडेपणाने पुरुषांच्या रांगेत ढकलता…
आता मात्र मला पुरुष हे लिंग वाटेना, मला शिवी म्हणून ते अधिक वाटू लागले….
कारण पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या बहुमतातल्या पुरुषांच्या जातीत तू मला टाकून माझ्या जाणतेपणात माझ्यातल्या पुरुष नावाच्या सुंदर वास्तूला तडे पाडले… म्हणूनच आज मला पुरुष हे लिंग कमी शिवी जास्त भासते.”

“मजला पुरुषांची थोडी समज कमी आहे.” मी स्त्री होऊन माझा कमीपणा स्वीकारत त्याला म्हणते.

तो त्याचा राग जायज व्यक्त करत राहतो;
पुरुष कधी व्यक्त होत नाही असं म्हणूनही आज साहित्यातून व्यक्त होणारी बहुमतातील पिढी ही पुरुषांची आहे. कारण जे हळवे असतात ते साहित्यिक होत जातात. ते स्वतःपेक्षा स्त्रियांसाठी जास्त लिहितात. ‘पुरुष म्हणून जन्म घेऊन नुसत्या शंकेच्या आणि कुत्सित शब्दांच्या लाखोल्या पदरी येण्यापेक्षा ‘पुरुष जन्म नको ग बाई’ असं मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त करत लिहीत जातात तेही बहुमतातल्या पुरुषांवर… पण या सगळ्यात ‘नेमका पुरुष’ कुठे लपवला जातो?

“ही लपाछुपी त्याची त्यानेच तर सुरु केलीय. ‘त्याला समाजासमोर प्रथम नि प्रधान दिसायचं, त्याचंच हे कैक वर्षांपासून रोवलेल रोपटं आज फळ घेऊन उभं आहे पुढ्यात.’ स्वीकारायला लाज वाटते?” मी माझ्या स्त्रीत्वाच्या गुर्मीत म्हटलं.

हेच. हे असं आहे. म्हणूनच विचारलं, या सगळ्या गर्दीत नेमका पुरुष कुठे दिसतो?
“तो आपल्याला कधीच दिसत नाही, कारण तो न आवाज करणारं घर बांधतो, तो न आवाज करणाऱ्या पैशांनी घराचा सांभाळ करतो, कारण तो न आवाज करून रडतो आणि त्यामुळेच तो न आवाज करून प्रेमही करतो…”

त्याच्या या दोन ओळींचा सार माझ्या नि:पक्षपाती मनाला पटला.
हळूहळू बहुमतातल्या पुरुषांना वगळून मीही बोलू लागले,
“आम्ही स्त्रिया हळव्या म्हणून रडून मोकळ्या होतो. पुरुषाला रडायलाही समाजाच्या सीमा पार कराव्या लागतात. त्यासाठी कधी मायनॉरिटीमधला पुरुष अनुभवावा. सुख ते कुठे नांदू शकतं, नि पुरुष अनुभवण्याचा स्वर्ग काय असतो ते बघणं निशब्द करणारं ठरतं.”
माझ्या नजरेत त्याच्या विचारांच्या दृष्टीने आता स्वच्छ नि नेमके पुरुष येऊ लागतात, तेव्हा मला आठवत जातात अनेक चांगल्या आठवणी !

त्यात पहिल्यांदा मनात येतो तो रक्ताचा बाप, मग सखा, मग प्रियकर, मग हळूच एखादा क्रश आणि मग कुठेतरी त्रयस्थ पुरुष.
हळूहळू त्यांच्या संवादाच्या, समजावण्याच्या, मायेनं कुशीत घेण्याच्या, चारचौघात रागवण्याच्या, चारचौघात प्रोपोज करण्याच्या, त्याच समाजात थोडंसं बुजर होत तिच्या केसांना हलकासा स्पर्श करत गजरा माळण्याच्या बारीक सारीक दुर्लक्षित खुणांमधला ठसठशीत पुरुष !

कधी त्याच्या कणखर मायेच्या स्पर्शाने कुशीत घेतो, कधी तो आयुष्यात ढासळला असेल तर तिच्या कुशीत जाऊन रडतो, एखादा किचकट निर्णय संमतीने घेतो, अलवार एखाद्या प्रेमाच्या ओळीने काळीज मांडतो, तो इतका सुखद वाटतो जेव्हा त्याच्या त्या मजबूत मापदंडांनी घट्ट कवचाच्या मिठीत घेतो.

त्याच्या दुमडलेल्या शर्टाच्या बाह्या, त्याच्या केसांची निष्काळजी ठेवण, तो चेहऱ्यापासून नखशिखांत असलेला पिळदारपणा आणि नसानसांत असलेला पोलादीपणा… त्याने हलकेच तिरके बसून कुठेतरी पाहावे तेव्हा त्याची ती एका बाजूने डोललेली शरीरयष्टी, त्याबरोबर कमरेला बसलेला हलकासा पीळ, त्या घट्ट शर्टातुन थोडीशी बाहेर आलेली इन आणि नजरेत दिसणारं समोरचं ते एकलव्य दृश्य…. पुरुषांचं हे मला आता पर्यंत आवडलेलं पॉश्चर!

नेहमीच समाजातल्या स्त्री पुरुषांची तुलना होते, तेव्हा स्त्रियांच्या बाजूने बोलणं प्रतिष्ठेच म्हणून चांगला पुरुष शेवटच्या रांगेत उभा राहतो, पण असं करताना या बहुमतातल्या पुरुषांमुळे त्याचं अस्तित्व, त्याचं निष्पाप मन आणि चांगली कृती कलंकित होऊन तोही या पुरुषप्रधान संस्कृतीत भरडला जातो. तो स्वतःसाठी कधीतरी बोलतो, तेव्हा असंख्य आवाज त्याची वाहवा करता, पण काही मोठे आवाज त्याला उर्वरित पुरुषांच्या कृत्याची आठवण करून देता….
“चूक तर त्यांचीही आहेच,
का कोणी स्त्रीला असं तुच्छतेने बघतं नि वागवत?
का कोणी स्वतःच्या मनाविरुद्ध कठोर बनतं ?
का थोडंसं म्हणत म्हणत जास्तच समाजासाठी जगतं?
हे शरीर स्वतःच ठेऊन नियम मात्र समाजाचे पाळतं?”

हे का होत असेल, याचं उत्तर मी जरी तुला दिल असलं तरी काही बोलावसं वाटतं, थोडं स्त्री होऊन पुरुषपण मांडावं वाटतंय,
“तुझा आवाज, तुझं अस्तित्व, तुझं म्हणणं मांडायला आवाज नाही मोठ्ठा,
तरीही लग्नाच्या वयात आला कि तू होतो जबाबदारीने मोठ्ठा,
तेव्हा तू सोडून देतो तुझं फोटोग्राफी, लिखाण, शिल्पकार, चित्रकाराचं स्वप्न,
तुला लग्न करून बायकोला सांभाळायचं म्हणून तू चुरा करून देतो तुझ्या आवडीचा,
तू पुरुष म्हणून ग्रेट आहे, तू माणूस म्हणून थेट आहेस,
पण तुझी थोडी पिढी किडली आहे,
ती कीड तुला स्वीकारावी लागेल,
पण नवी सुपीक पेरणी तुलाच करावी लागेल,
आधीच्या ओझ्याने तू वाकणं साहजिक आहे,
तरीही तू व्यक्त होतोय, हे नवलंच आहे!”

“आता एवढं बोललोच आहोत तर या सगळ्याच्या परे जाऊन एक गुपित सांगू? ” माझ्यातली लाज बाजूला ठेऊन स्त्री बोलू लागली,
“तुम्ही पुरुष मंडळी इतके स्वखुशित असता की वाटते प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे, इतके दमदार आणि मजबूत दिसता ते पाहून प्रत्येकावर थोडं थोडं प्रेम करावे वाटते, पण प्रत्येकावर प्रेम करणं शक्य नसतं कारण खरी तोरणं दोघांच्या संगतीने शोभता,
म्हणून मर्यादेच्या या सुखातला मजला एकच पुरुष पूर्ण वाटतो”

शेवटी इतकंच की, “पानं नेहमीच वगळून जाता फुलांच्या रंकाळ्यात,
थोडा न्याय तिथेही करायचा असतो ओंजळीत.
एका फुलाबरोबर एका पानाच्या देठाचा वावर ठेवायचाच असतो आठवणीने,
तेव्हा खरं ब्रह्मांडाच्या ओंजळीत खुलते एका स्त्रिसह पुरुष पूर्ण!”


Please follow and like us:
error

9 thoughts on “पुरुषप्रधानात भरडला गेलाय ‘तो’”

 1. गोवर्धन

  क्या बात है पूजे…. खरा पुरुष तूच समजून घेतलाय फक्त… खूप खूप धन्यवाद. नतमस्तक या साठी तुझ्या समोर खरंच… 🖤🖤🖤🖤🖤

 2. मयुर जाधव

  वाह….. ह्या फेमिनिझमचा जंगलात पुरुष मंडळी बद्दल असे निष्पक्ष लेख वाचून छान वाटत…. खरंच तूच लिहू शकतेस इतकं सुंदर 🧡🧡

 3. खूप जास्त आवडल हे शब्दात मांडता येणार नाही एवढ 🙌कमाल आहेस तू 🤩🙌

 4. खरी कहाणी चितारलीय… पुरुषांच्या मनातील भावना कधीच स्पष्ट होत नाहीत… बंधने त्याला ही असतातच.
  त्याच्याच मानसिकतेचा प्रश्न असतो… नाहीतर पुरुष ही सर्वत्र पुजला गेला असता…
  खूप सुंदर मांडलंय.

 5. खूप भारी, अगदी मनातल्या व्यथा मांडल्यात तू…पहिल्यांदा एखाद्या मुलीने एवढं आतमध्ये डोकावून लिहिल्यासारखं वाटलं..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *