काळात अडकलेला माणूस अधोगतीच्या गाळात रुतून बसतो.
कुठेतरी आपल्या बालपणी घडलेल्या सगळ्याच गोष्टींत अडकून राहून चालत नाही. अडकणे वेगळे आणि रमणं वेगळं. जगाबरोबर पुढे चालत रहाणारं घड्याळ तुम्हाला व्हावेच लागेल. जे जुनं झालं ते ओल्या भावनेसह आठवणीच्या गुलदस्त्यात ठेवावं. पण केवळ त्यालाच आयुष्य मानून साचल्या डबक्यासारखं तिथेच साचून राहून जगू नाही. याने आयुष्याला एक साचलेपणाचा वास येऊ लागतो. बहरणं असायलाच हवे.
भूतकाळातली दिल्ली पाहिलेले म्हातारी माणसं आताच्या प्रदूषणाच्या दिल्लीत शब्दशः श्वास उसने घेऊन जगतात. पण तो बदल ते पाहतात, त्यांना स्विकारण्याशिवाय पर्याय नाही. पण आपण पर्याय नाही म्हणून स्वीकारण्यापेक्षा त्यातले नवेपण समजून घेण्याच्या ओढीतून नवे बदल स्वीकारायला हवे. नवे सगळेच स्वीकारता येईल असे नाही. पण पावलोपावली नव्याची तक्रार करून चालणार नाही. प्रत्येक काळात त्यांचे असे वेगळे चॅलेंजेस असतात. बऱ्याचदा आपलं वय ते चॅलेंजेस समजून घेईल इतके परिपक्व नसते. त्यामुळे ते दिवस आपल्याला उगाच मोहरलेले वाटू लागतात. त्यांचं वेगळेपण आपल्याला स्थिरावणारे असेलही, शंकाच नाही. पण प्रत्येक काळाचे सकारात्मक, काही नकारात्मक मुद्दे आहेत. ज्यांना थांबायला आवडत नाही, त्यांच्यासाठी ही आजच्या काळाची धावती स्पर्धा एक अडवेंचर आहे. ते या पिढीचे, त्यातल्या सोयी सुविधांचे आभार मानतात. याउलट माझ्यासारखे अतिविचारी लोक जे भर रस्त्यात विचार करायचा म्हणून बसस्टॉपवर बसून घेतात. त्या लोकांना आनंद चित्रपटातली मंद सायंकाळ आणि त्या समुद्राची मैफल खुणावते, मनातल्या ओलाव्याला हक्काचं ठिकाण मिळाल्याचा आनंद होतो. मी जुन्या काळातल्या शांततेत आठवणी उशाशी घेऊन रमते. पण म्हणून अडकून राहू शकत नाही. कारण या वर्तमान काळाला नाकारणे हा माझी चूक असेल. याने माझे नुकसान असेल. जगात वावरण्यासाठी बदल स्वीकारणे आणि आहे त्या पिढीचा भाग होणे गरजेचं असतं. नाहीतर काळाच्या मागे राहून उशिरा जाग येऊन अचानक कॉम्पुटर उघडून बसाल तर येणाऱ्या तंद्रीने आदळाल. जग अनेक वर्षे पुढे धावलेले असेल.
रोज या गर्दीत उतरा आणि स्वतःची जीवघेणी ओढाताण करा हा माझा आग्रह नाही. पण सतत अस्विकारतेची नकारघंटा आणि काळाचे ड्रॉबॅक मांडत बसाल तर इतिहास तुमच्याशी गप्पा मारेल. वर्तमान तुमचा शत्रू बनून वैचारिक अशांतता निर्माण करेल.
"आमच्या काळात असं नव्हतं" या वाक्याला नॉस्टॅल्जिक फील असायला हवा, तक्रारींचा बेसुर नको. प्रत्येक पिढीसोबत जगण्याचे अप्रूप जिवंत ठेवायचं. स्वतःला आजमावत राहायचं. - पूजा ढेरिंगे