जेव्हा तो जॉबवरून घरी येऊन त्याचे शू नीट नेटके ठेवून शर्टाची कोरी घडी करून तोंड हात पाय धुवून खाऊन पिऊन बेडवर येतो. पूर्वीचा रोमँटिक मुड कुठे सापडत नाही माझी तक्रार मनात विचारांनी सलू लागते. मी जॉबवरून लवकर घरी आल्यामुळे डोकं रिलॅक्स होऊन याचं उत्तर शोधत जाते. कधी त्याचा मुड असतो तेव्हा माझा नसतो, जेव्हा माझा असतो तेव्हा त्याचा नसतो. हे जॉब आणि कामाच्या स्ट्रेसमुळे घडत असेल का? तेव्हा मला जुन्या दिवसांची आठवण होऊन वाटू लागलं, तेव्हा काही नसतानाही रूम, पब्लिक स्पॉट, लॉज, पिकनिक, ऑफिस, कॅफे आणि काय नाही तिथेही जवळीक करण्याचे क्षण शोधायचा तो. त्याचंच काय मी सुद्धा तर असच कधी न मिळाल्यासारखी त्या स्पर्शाची अनुभूती घेत जायचे. तेव्हा अबोल सगळं असायचं, तरीही नवीन होतं म्हणून नव्या जिवाचं जुन्या आयुष्यात येणं आणि त्यातून जुण्याला नव्याची ओढ लागणं खरंच स्वाभाविक होतं, म्हणून तेव्हा तसे वागत होतो आम्ही. तरीही माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं.
मी त्या एकट्या घरात त्याची वाट पाहत स्वतःशीच पुटपुटत होते, कदाचित मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते. तो
पूर्वी भेटायचा तेव्हा माझ्यापासून तो दूर जाणार शरीराने ही जाणीव मनात असायची, मला त्याच्या बाह्यांगावर दिसणारा टापटीप शर्ट काढण्याची सवय होती. तो शर्ट काढताना त्याच्याशी त्याच्या त्या प्रत्येक इंचभर भागाशी खेळणं ही माझी शारीरिक प्रेमाची व्याख्या होती. तोही काही वेगळा नव्हता. त्याला खरतर बाई म्हणून बाऊ करून उपभोग घेऊन शारीरिक प्रेम कधीच संपवायचं नव्हतं, आजही नाही. वपु म्हणता तसं वासना आणि ओढ हा संसाराचा आधार आहे बास्स. त्याचा बाऊ करू नाही. आधार लागतोच विषयच नाही पण प्रियकराचा नवरा होऊन त्याचं रोजचं आपलंच असणं हे या शारीरिक प्रेमाला आता पूर्वी इतकी भावत नसतं. त्यामुळे बऱ्याचदा तो आता पूर्ण माझा असतोही, त्या खोलीचे सगळे कोपरे रिकामे असता, दोघांचे असता, प्रत्येक दारा खिडक्यांना पडद्यांची पाळत असताना अधाशासारख प्रेम करणं होत नाही.
ही समज मी स्वतःला देत होते. तितक्यात त्याच्या बुटांचा आवाज आला, चेहऱ्यावर रोमँटिक भाव आणि त्याची वाट पाहणं संपल्याची सुरकुती ओसरली. मी दरवाजा उघडून आतल्या खोलीत गेले, तो लागलीच माझ्या मागे येईल आणि पूर्वीसारखं आधी मला पूर्ण बघून एक गेहरी नजर फिरवेल, केसांना स्पर्श करून अलगद मानेवरून हात फिरवून हळूहळू साडीच्या ब्लाऊजची पहिली नाडी सोडत प्रत्येक स्पर्श सुटत जाऊन सगळा माहोल दोघांच्या श्वासांचा होईल.
अपेक्षेने मी आतल्या खोलीत त्याची वाट पाहत होते. तो थकून उशिरा आल्यामुळे, त्याचा थकवा आणि त्यानेच त्याच्या हाताने काढलेले त्याचे कपडे आणि माझ्याकडे आपुलकीने टाकलेला कटाक्ष मला आणि माझ्या आतल्या शारीरिक ओढीला शांत करू लागला. मला अशावेळी त्याची प्रेयसी होऊन त्याच्या शरीराला लुटावं वाटत नाही, आई होऊन त्याची मानसिक भावनिक ओढ शमवावी वाटते. तोही अशावेळी स्तनांच्या मागे नाही तर माझ्या उबदार कुशीच्या स्पर्शात शिरण्याच्या संवेदनेत असतो. तेव्हा अलगद हा माझा रोमान्सच्या झुल्यात असलेला चित्रपटातला अपेक्षांचा सिन वास्तवात येतो आणि तेव्हा माझ्या हाताची बोटं कुशीत शिरलेल्या त्या थकलेल्या जीवावर फिरत असतात, उबेनिशी!