प्यार इम्पॉसिबल?

बिगेस्ट बॉक्स ऑफिस फ्लॉप चित्रपट म्हणून २०१० च्या काळात या चित्रपटाची एन्ट्री झाली होती. शिवाय एकेकाळचा मिस वर्ल्डचा किताब जिंकलेली प्रियांका चोप्रा या चित्रपटाची मुख्य नायिका होती. कितीही सुंदर स्टोरीलाईन असली तरी काहीतरी कमी राहतेच. चित्रपटाचा शेवट हा प्रेमाला व्यक्त करताना कुठेही कमी पडत नाही. क्वारंटाईनचा हा काळ आपल्याला वीस वर्षे मागे नेणारा म्हणत असाल तर अशावेळी आपण जास्त करून आपल्या शाळा, कॉलेजच्या दिवसात जातो. जिथे आपण रमतो, ते आणि तेवढं आपलं आयुष्य!
या जीवनावर बॅकबेंचर्स स्टोऱ्या होतात, मोठमोठे लेख, मिम्ज येतात पण जे नेहमीच या गर्दीत हरवता त्यांचं काय??

या जुन्या काळात जाऊन मी जे जे शक्य नव्हतं ते ते या सुट्ट्यांच्या दिवसात करण्याचा प्रयत्न करते.
अशातच अमेझॉन प्राईमला प्यार इम्पॉसिबल ही २०१०ची फिल्म सर्फींग करताना समोर येते. गुळगुळीत प्लॉट दिसावा इतकं सोपं नाव. त्यामुळे बऱ्याच जणांकडून टाळली गेलेली फिल्म.
तरीही जुने चित्रपट म्हणजे डोक्याला उसंत असते. तेव्हा मी हा चित्रपट पाहायला सुरुवात करते. बघतानाच अभय शर्मा या मुख्य नायकाच्या भूमिकेत असलेल्या उदय चोप्रामध्ये मला मी दिसू लागते. त्याच्यासारखं मीसुद्धा अगदी कॉलेजमध्ये जाईपर्यंत कुठलाच इगो, स्वाभिमान न बाळगता स्मार्ट दिसणाऱ्या आणि फेमस ग्रुपमध्ये राहायचं म्हणून त्यांना अभ्यासात मदत केली. कारण स्पार्क एन ऑल माझ्यासारख्यांसाठी शौकपेक्षा वेगळे नव्हते. शिवाय असं बिनधास्त राहणं म्हणजे वाया जाणं अशी शिस्त घरच्यांनी अंगवळणी लावलेली… त्यामुळे शिस्त आणि लाज या दोन्ही मर्यादांच्या पलिकडे इतकी वेगळी लाईफ असते कधी कळलंच नाही. शिवाय त्या काळात घरची परिस्थिती कोणामध्ये बसून गप्पा माराव्या अशी नव्हती आणि बेस्ट फ्रेंड फोरेव्हर हे म्हणजे केवळ ढोंग वाटायचे. शिक्षण आणि घर हे दोन्ही होतं, यातच समाधानी होते. पण ही अशी मैत्री पाहून माझी नस दाटून यायची. मला वाटायचं ही एवढी स्कूल आणि कॉलेजची लाईफ किमान सगळ्यांना समान द्यायला हवी होती, कॉलेज आणि शाळेतल्या निरागस स्वर्गीय लाईफचा आनंद सगळ्यांना तितक्याच सहजतेने आणि मोहात पडून घेता यायला हवा होता. पण दुर्दैवाने बऱ्याच जणांचा अभय होतो. त्यामुळे त्याला जोडूनच ‘प्यार आणि इम्पॉसिबल’ हे एकाच वाक्यात येऊ लागतं. कारण ‘आमच्यासाठी प्रेम असेल तर तेही फक्त अरेंज’ हा पायंडा पडलेला. त्यामुळे आमच्या बाबतीत आधार कार्डवरचा फोटो जोक नसून रियालिटी असायची. बॅकबेंचर्सने मौजमस्ती करायची आणि आपण त्यांची होमवर्क करून स्वतःला समाधान द्यायचं, त्याला काय होतं आपली रिविजन होईल देऊ की करून त्याचा होमवर्क…. यातून माझा स्वभाव होत जातो अभ्यासू आणि एकलकोंडा आणि मग अकरावी बारावी कॉलेज म्हणजे फिल्मी कॉलेज वाटायचं पण त्यातला ७० टक्के काळ आमच्यासाठी तोच तो घरी येऊन कॉलेजला जाणारा असायचा. त्यातल्या ३०% काळात मला सुदैवाने क्रश भेटला होता. भेटला म्हणण्यापेक्षा दिसला. कारण त्या माझ्या चोमू लुकमध्ये ना त्याने माझ्याकडे पाहिलं ना काही फील केलं. मी मात्र त्याच्यासाठी लास्ट सेमीस्टरच्या वेळी शेवटच्या मिनिटाला चौथ्या मजल्यावरून खाली अन्सरशीट आणायला गेले. तरीही त्याच्यात कृतज्ञतेचे भाव नव्हते. अभय जसं हिला बुडताना वाचवतो आणि तिला त्याचं काहीच पडलेलं नसतं, सेम भावना याच्या नजरेत दिसायची. तिथेच प्यार इम्पॉसिबल कळलं होतं मला.
पण जेव्हा प्यार इम्पॉसिबल हा चित्रपट बघतो, तेव्हा ते फिलिंग अजून जास्त फील होतं. जेव्हा व्यक्ती त्याच्या परिस्थिती, कुरूप आणि आउटडेटेड दिसणं, घरच्यांची शिस्त आणि आजूबाजूच्या गोष्टींनी इतके दबलेले असतो तेव्हा कितीही वाटलं तरीही बॅकबेंचर्स बनून जगता येत नाही.
त्यामुळे आम्ही हे असेच केस गळू नाही म्हणून पचापच तेल लावून येणारे, क्लीवेजची सावलीही दिसणार नाही असा गळ्यापर्यंत पॅक कुर्त्ता, कानात वर्षानुवर्ष बाळीसारखे कानातले, पायात एक चार पाच पट्या एकावर एक लावलेली स्टायलिश दिसणारी पण आउडेटेड डिजाइनची सॅंडल, यावर पर्वणी म्हणून शाळेसारख दप्तर…
देअर यू गो गर्ल…
अशावेळी मी आणि माझ्यासारखे कित्येकजण फक्त सजीव गर्दी वाढवणारा जीव असतात. मीही त्यातच जमा होते. कॉलेजात प्रेम म्हणजे चेहरा…
चेहऱ्याला चमक तर दुनिया दिवानी, नाहीतर किती मिन्नते करा कोणी बघत नाही…
त्यामुळे जसं या फिल्मच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये अभय हिला टॉम बॉय आणि टिपिकल मेकअप देऊन रात्री फिरायला नेतो, तेव्हा तिचं सौंदर्यात जगलेलं जीवन आणि याने आयुष्यभर काढलेलं समाजाच्या नजरेतल कुरूप, डल जीवन यातली दरी सुंदरपणे दिसत जाते.
सौंदर्य पाहिलं आणि घाईत निर्णय घेऊन लग्न केलेली ती, अलीशा मर्चंट (प्रियांका चोप्रा). त्यानंतर संसार आणि प्रेम सांभाळू न शकल्यामुळे तिचा डिव्होर्स. त्या काळात दुसऱ्या बाजूला अभयने अलिशावर एकतर्फी प्रेम करत दुसऱ्या कोणत्याच मुलीवर प्रेम न करता त्याच्या आयुष्याशी लढणं. मधली स्टोरी थोडी रेंगाळणारी असली तरी काही गोष्टी जुळून आल्या आहेत. प्रियांकाच त्या पात्रात असणं, आणि त्या छोटुष्या मुलीने, तानियाने याला अधिक चार्मिंग करणं काहीसं कथेला पुढे नेत जातं.
त्यातलं एक वाक्य, सुंदर दिसणाऱ्यावर समाज प्रेम करतं, हा दुनियेचा नियम आहे… त्यामुळे या बाह्य सौंदर्याच्या जगात ‘सुंदर असणं ही एक नगण्य टर्म असते केवळ!’

हे समाजाच्या दृष्टीने कुरूप असलेले लोक अनेकदा अनुभवतात. परिणामी, एका कमजोर आत्मविश्वासाने ते आयुष्य जगू लागतात. शिवाय, अशा टाईपच्या लोकांबरोबर हे बऱ्याचदा घडतं की, ते त्यांच्याहुन सुंदर व्यक्तीवर नितांत प्रेम करतात, आणि समोरचा व्यक्ती ते नितांत प्रेम पाहून प्रेम करतो.

यावर अलीशा आणि अभयमध्ये रात्रीचा संवाद दाखवता, तिथे तो तिला म्हणतो, मी सात वर्षांपासून एका मुलीवर नितांत प्रेम करतो.
यावर ती आपल्या सारखं सहजतेने म्हणते, हे ऐकुन कोणतीही मुलगी लागलीच तुझ्यावर प्रेम करेल.
त्यावर तो म्हणतो, जर ती अस करेल तर ती चूक असेल. कारण “अगर प्यार करें तो मुझसे करे इसलिए नहीं कि मैं उससे प्यार करता हूं।”
हे वाक्य छोटंसं आहे पण कित्येक नात्यांची पक्की विट असते. प्रेम दोन्ही बाजूंनी असावं, नाहीतर रेती सुटत जाऊन नातं पोकळ होत जातं.
प्रेमाची साधी, सोपी व्याख्या प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न आहे, सौंदर्य हे मृगजळ आहे. तेवढंच पाहून प्रेम केलं तर घटस्फोट ठरलेला पण मनाचं सौंदर्य ही कळी आहे तिला जाणून घेत फुलवत नेताना आयुष्य सुगंधाने फुलून जातं. त्यामुळे तुमचं प्रेम ओळखता यायला हवं. चमचमत्या झगमगाटात तुम्हाला आवडेल तेच प्रेम असेल असं नाही. कारण अक्सर काही गोष्टी आकर्षक असता पण त्या आयुष्यभरासाठी नसतात. प्रेम नाजुक आहे, ते जपावं लागतं. यामुुळेच कदाचित,

पहिलं प्रेम हे अयशस्वी राहतं, कारण बऱ्याचदा हे प्रेम असमंजस आणि गोजिऱ्या वयात होतं. सामंजस्यानंतर मिळालेलं प्रेम हे कित्येक कडांनी पारखून घेतलेले असतं त्यामुळे त्याच्यात प्रेमाबरोबर वास्तविक जगणं असतं. त्यामुळे क्रश का असेना पण माझं ते एकतर्फी प्रेम असफल राहिलं याचा आज अभिमानच वाटतो, कारण प्रेम हे केवळ एका विशिष्ट काळाचा खेळ नसतो, त्याचा प्रवास हा कांद्यासारखा असतो, पाती उलगडत जातात, जिभेला चव देत जातात, रडवतात, नसल्यावर महत्त्वही अधोरेखित करतात, पण आयुष्याच्या शेवटपर्यंत त्याचं आपल्या आयुष्यातलं स्थान अढळ राहतं.

तसं पाहिलं तर सिनेमात काहीही नाही पण मुड लाईटर असेल तर रेंगाळणारा पार्ट पुढे घेऊन पाहिला अडीच तासांचा चित्रपट एक तासात नाजुक आणि टची फील देऊन जातो, प्रेमाचा फील.

Please follow and like us:
error

2 thoughts on “प्यार इम्पॉसिबल?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *