कला: अस्वस्थ करणारी…

  • by

नेटफ्लिक्सवर आलेला “कला” (Qala) चित्रपट खूप मोठं विचार मंथन आहे. मेंटल स्टेटचे प्रतिबिंब आहे. आईने एक मायेची नजर टाकावी म्हणून केलेला अट्टाहास आहे. प्रत्येकाची आई मायाळू नसते, हे सांगणारा चित्रपट आहे. या सगळ्यात तिची anxiety, तिचं आयुष्य कसं झुकून जातं याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही कलाकृती आहे. दिसणारी कला आणि त्यामागे घडत असणारं आयुष्य याची समांतर रस्त्यांवर चाललेली तारांबळ अस्वस्थ करणारी आहे.

शेवटी नियतीने अपघाताने वाट्याला दिलेल्या आयुष्यातून सुटका करून घेण्याचा तिचा आत्महत्येचा निर्णय आणि त्याआधीची मनस्थिती, त्याला तिच्या सभोवताली असणाऱ्या बर्फाच्या वातावरणाशी जोडणे हा या कलाकृतीतला मास्टरपीस आहे.

चित्रपट खूप संथ आहे. कारण तो प्रत्येक भागावर लक्ष वेधून घेणारा आहे. कलेवर आधारित चित्रपट तितकेच वेळ घेऊन दाखवावे लागतात. तुमच्यात संयम नसेल तर तुम्हाला हा चित्रपट आवडणार नाही.
जुळ्या मुलांपैकी एकच जण वाचणार असेल तर जो दोघांपैकी जास्त ताकदवर असतो तो जगतो. इथून चित्रपट सुरू होतो आणि सांगीतिक घराण्यात जन्म घेतलेल्या कलाचा अस्वस्थ प्रवास सुरू होतो. कला हे मुख्य नायिकेचे नाव आहे.
हा प्रवास तेव्हा जास्त कठीण होतो जेव्हा कलाच्या आईला कळते की जो जगला नाही तो “मुलगा” होता. त्यामुळे तिच्या सांगीतिक घराण्याचा वारसा पुढे नेण्याच्या हव्यासात आणि समाजाच्या घालून दिलेल्या पायंड्यामुळे ती मुलीला कधीच गाणं गाऊ देत नाही. मुली गाणं गात नाही असा तो काळ होता.
त्यानंतर जे कौटुंबिक प्रेम कलाला हवे असते त्यासाठी ती जे जे करते ते हृदय हेलावून टाकणारे असते. कारण आपल्याच आईच्या एका मायेच्या स्पर्शासाठी, शब्दासाठी, नजरेसाठी व्याकूळ होणं हे किती कठोर असतं याची आपण साधी कल्पनाही करू शकत नाही.

या सगळ्यात चित्रपटाला खूप सुंदररित्या निभावणारी कला खूप साधं सरळ पात्र आहे. तिच्यावर चर्चा व्हावी अशी युनिक ती दिसत नाही. पण जे तिने अभिनयातून केलं ते युनिक आहे. ते संगीताशी जोडणारं आहे, त्यामुळे तिचे भाव संगीताला न्याय देणारे असणं चित्रपटाची गरज होती. तिने ते उत्तमरीत्या साकारले. चित्रपटाचे संगीत जितके क्लासिकल टच देणारे तितकेच ते काँटेम्पररी गाण्यांची लय असणारे आहे. त्यामुळे चित्रपटाला वेगळा दर्जा मिळतो. चित्रपटाचा शेवट अनपेक्षित आहे.
तिचा जन्म झाला तेव्हा ती स्ट्रॉंग असल्यामुळे जगते, पण मायेच्या प्रेमाला आसुसलेली कला आयुष्यात कला, प्रतिष्ठा, प्रसिद्धी मिळूनही आत्महत्या करते, आयुष्याच्या डावपेचात कमजोर होऊन मरते, हे प्रेक्षक म्हणून पाहणं त्रासदायक असतं. तुम्ही जर कमजोर मनस्थितीत असाल तर हा चित्रपट टाळा, पण वेगळी कलाकृती पहायची असेल तर नक्की पहा.
– पूजा ढेरिंगे.
#कला #qala #artisticmovie

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *