रोमान्सचा रेडिओ

  • by

एक धून मनात गुणगुणत ती दुपारची शांतता तिच्या मनात पसरते. तिचं जग दुपारी सुरू होतं… जेव्हा शांतता तिच्या मनात आवाज करू लागते.
तो काळ अठराशेचा होता… रेडिओच्या येण्याने तिला नवा सुर गवसला होता. नवीनच दिवस होते, रेडिओ तितकासा फेमस नव्हता. तिला तर घरात पहिल्यांदा आणल्यावर आपल्या व्यतिरिक्त सुद्धा दुपारचं कोणी बोलतं, याचं भारी कुतूहल वाटू लागलं होतं.
तिच्या आयुष्यात तिच्या नवऱ्याने आजपर्यंत दिलेलं तेवढं एकच तिच्यासाठीच गिफ्ट. जे गिफ्ट तिला खूप आवडलं होतं. खरतर नवऱ्याने सरकारी नोकरीवर असल्यामुळे आपण कसे श्रीमंत आहोत याचा दिखावा म्हणून तो रेडिओ खरेदी केला होता. पण नवरा नसताना तिला रेडिओची भारी सोबत झाली होती. उत्तम कंपनी मिळाली की वेळ सुखद होतो, तसं रेडिओने तिच्या मनाच्या शहरात जादू केली होती. रेडिओ हवं तेव्हा बंद करता यायचा, ही रेडिओ बद्दलची सगळ्यात आवडती गोष्ट होती. नवऱ्याच्या बाबतीत तोच बोलत बसायचा, हिला त्यात स्वारस्य उरलं नव्हतं.
तसं पाहिलं तर, दोघे एकमेकांना ओळखण्यात किती उत्सुक आहेत, यावर त्या नात्याचं भविष्य अवलंबून असतं. पण या दोघांनी त्यांचे आनंदाचे मुक्काम बाहेर शोधले होते. हे लग्न तिच्या मनाविरुद्ध आणि त्याच्या वाढत्या वयामुळे करण्यात आलं होतं. त्यामुळे ती त्याला हवे नको ते बघण्याच काम करायची आणि तो तिच्या तोंडावर पैशांच्या नोटा मारून सरकारी फर्मान घरी येऊन सोडायचा.
त्यामुळे तिचं मन दुपारची वाट पाहू लागायचं. त्याचं कारणही होतं, कारण, रेडिओमुळे आयुष्यात नाही म्हटलं तरी थोडा बदल झाला होता. देशातल्या खूप थोडक्या आणि श्रीमंत लोकांची त्याच्याशी ओळख झाली होती. त्याच त्या वास्तविक आयुष्यात एखाद्या प्रियकराने यावं तसं तिच्या आयुष्यात रेडिओ आला होता. त्यावर नवीन नवीन प्रयोग होऊ लागले होते. या प्रयोगापैकीच ‘आरजे निष्कर्षची दुपार’ हा शो प्रसिद्धीच्या झोतात होता.
दर दुपारी रेडिओवर आरजे निष्कर्ष सुरेल आवाजात एक दुपार घेऊन यायचा. ती अगतिक होऊन त्याची वाट पाहायची.

पहिल्या दिवशी त्याची भेट खूप पर्सनल वाटली. कारणही तसच होतं. त्या एवढ्या जुन्या काळात या महाशयाने बायकांच्या छुप्या प्रश्नांना जगासमोर आणण्याचं धाडस केलं होतं. स्पष्ट सांगायचं तर त्याने हा शो केवळ स्त्रियांसाठी सुरू केला होता. ज्यात स्त्रियांना त्यांच्या सेक्शुअल आयुष्यात येणाऱ्या अडचणींबाबत सल्ले द्यायला सुरुवात केली होती. पहिल्या दिवशी त्याने शोबद्दल रेडिओ वर अनाउन्स केल्यावर तिच्यासह अनेकिंचे डोळे विस्फारले होते. याचं कारण म्हणजे त्यावेळी घरातल्यांनी कधी तिचा एव्हढा विचार केला नव्हता. तो या आरजेने केला होता. पण पहिल्या दिवशी त्याला एकही फोन आला नाही. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात मात्र त्याच्या या शोचे चांगले वाभाडे निघाले. नको नको त्या भाषेत टिका झाल्या. त्यामुळे त्याच्या शोला नकारात्मक प्रसिद्धी  मिळाली. त्यामुळे स्त्रियांसह पुरुषही हा शो ऐकू लागले. बायकांच्या प्रश्नांवर, बोलण्यावर काही खिल्ली उडवू लागले तर काहीजण त्यांच्या जवळ जाऊ लागले.
पहिल्या दिवशी निराशा हाती आली तरी तो थांबला नाही, त्याने दुसऱ्या दिवशी त्याचवेळी शोला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशीही पंधरा मिनिटं एकही कॉल आला नाही. पण नंतर अचानक एक कॉल आला, ती स्त्री घाईने बोलू लागली. तिचं बळजबरी झालेलं लग्न तिला शारीरिक सुखापासून कसं दूर ठेवतय ही ती मोठ्या पोटतिडकीने सांगत होती. तिच्या प्रत्येक एका वाक्यानंतर ती विनवणी करत होती की, प्लीज माझं नाव गुपितच ठेवा. तिच्या प्रत्येक वाक्याला आरजे दिलासा देणारी उत्तरं देत होता, समजावण्याचा प्रयत्न करत होता, नवऱ्याच्या जवळ जाण्यासाठी तू एक पाऊल उचल म्हणत होता. हे सगळं ऐकताना इकडे तिचं मात्र सगळं लक्ष त्याच्या आवाजाकडे होतं.
तिला आरजे बरोबर जवळीक करण्यात इंटरेस्ट नव्हता. कारण नेहमीच शरीराने किंवा मनाने कुणाचं होण्यापेक्षा केवळ सामंजस्याची सोबतही पुरेशी असते. तशी तिची अवस्था होती.
रेडिओवर चालणाऱ्या अनेक युद्ध, बॉम्ब आणि गुलामीच्या वातावरणात इकडे प्रेमाची दुपार फुलत होती. दुपारी दोनची घंटा वाजली की आपोआप ती साडीचा पदर नेटका करून आपल्याला हव्या असलेल्या व्यक्तीला भेटताना स्वतःला चाचपावं, तशी ती कावरी बावरी व्हायची. लाल कुंकाचं वर्तुळ गोल असूनही उगाच त्याला हात लावून गिरवायची, नंतर न सुटणाऱ्या तिच्या साडीच्या निर्यांना नीट करत आरशात बघायची. केसांच्या घट्ट चुड्याला थोडं सैल करत मनात आरजेच्या जवळपास असण्याची स्वप्न रंगवायची.

ती देखणी नव्हती पण रेखीव होती, तिच्या डोळ्यांच्या कडांना एक संपणारा काठ होता, ओठांच्या कडा कोरड्या पडल्या होत्या, भुवयांची रचना म्हणजे तिने इंद्रधनुष्य हातात धरून कोण्या अनोळखीवर प्रेमाचा निशाणा धरावा इतक्या आखीव होत्या, या सगळ्या ओस पडलेल्या वाळवंटाला कोणाचा तरी स्पर्श व्हावा आणि तिची तहान भागावी, एवढ्या एका क्षणासाठी ती आतुर झालेली आहे.
तिला नवऱ्याशी प्रतारणा करायची नव्हती, पण तिची शारीरिक भूक तिला आरजेच्या जवळ नेत होती. दर दुपारी त्याचा आवाज कानावर पडल्यावर आपोआप तिचं लक्ष तिच्या शरीराकडे जाऊ लागायचं. नकळत ती त्याच्या स्टुडिओत पोहोचायची, हळूहळू त्याचा आवाज ऐकताना त्याच्या ओठांना, त्याच्या हातांना आणि श्वासांना तिच्या जवळ फील करायची. त्याच्या तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दामध्ये तिला तोच दिसू लागला होता. ती त्या शब्दांची लय ओळखून त्याला जवळ घेण्याचा अनामिक प्रयत्न करत होती. पण रोजच्या त्या एका तासानंतर तिच्या हाती फक्त त्याचं बोलणं येत होतं.
त्यामुळे एक दिवस याचा प्रचंड राग येऊन ती त्याला कॉल करायचं ठरवते. नाव गुपित असणार म्हटल्यावर ती थोडी निर्धास्त राहते.
कधी एकदा दुपार होते या घाईत ती घरातल्या कामांची ओबडधोबड आवरा आवर करते. मग हळूच स्वतःच्या प्रत्येक उघड्या अंगाला रेखीव अन देखणं करून दार खिडक्या लावून दोन वाजायची वाट बघते. अन् त्याचा शो सुरू होतो. तिच्या श्वासांचा स्पीड हजाराच्या गतीत वाढतो, आणि पुढचा कॉलर बोलतोय पुण्यातून…
अस म्हणून तो “हॅलो ब्युटीफूल!” म्हणत तिला रिप्लाय करतो.
त्याचा तो आवाज ऐकून जणू कोणी खूप जवळ किस करायला यावं आणि दोघांत एका श्र्वासाच अंतर रहावं आणि त्या श्र्वासांच्या वाऱ्यात म्हणावं हॅलो ब्युटीफूल, तशी तिची अवस्था झाली होती. तिच्या श्र्वासांचा स्पीड हजारांनी वाढला होता. तिचे डोळे पाणावले होते, तिच्या शरीरावरून मनात साचलेल्या ओलाव्याला त्याचा स्पर्श झाला होता.
“हल्लो जेंटलमन…” ती बोलली.
तिच्या त्या नम्रतेने तो तिच्या अधिक जवळ आल्यासारखं वाटलं.
तो उत्तरला,
अहाहा काय आवाज आहे तुमचा! तेवढ्यात ती केस मागे घेण्याचा बहाणा करून लाजणार,
तर तो म्हणाला अगं केस मागे नको घेऊस परी नाही, खरी दिसतेय!
बोल, काय प्रोब्लेम आहे?
त्याचा आवाज तिला हक्काच्या मित्रा सारखा वाटला. असा मित्र ज्यावर ती एकतर्फी प्रेम करतेय.
“त्याचं काय आहे ना, गेल्या दहा वर्षांपासून आमच्यात कधीच जवळीक झाली नाहीये. मला ते सुख बाहेर शोधायचं नाहीये. त्यांचं मला माहीत नाही, पण माझं मन त्यांना सुरुवातीला न्याहाळायच. पण आता त्यांच्या बोलण्यामुळे मी त्यांच्यापासून खूप दूर गेले आहे.”
नाव गुपित होतं त्यामुळे ती बेफिकीर बोलत होती. कुठलीही बंधनं न ठेवता ती तिच्या मनातल मांडत होती.

तुम्हाला हेही आवडेल- http://manmarziyaan.in/they-both-lose-their-love/

तिचा तो नम्र आवाज ज्याला आरजेने कॉम्प्लीमेंट दिली होती, त्या आवाजाला गेल्या दहा वर्षांपासून तिचा नवरा ओळखतो.
त्या सरकारी ऑफिसमध्ये न चुकता रेडिओ चालायचा आणि हा शो म्हणजे गुपचूप वाचावं असं पिवळं पुस्तक, अंथरुणात चोरून पहावी अशी पोर्न क्लिप होती. फक्त हा शो चुकीच्या सवयी लावणारा नव्हता. म्हणून ती बोलत होती.
ती बोलत होती आणि तिच्यासारख्या हजारो स्त्रिया आणि त्यामध्ये एक तिचा नवरा ते कान देऊन ऐकत होता.
कित्ती प्रेम करतेस तू त्याच्यावर… आरजेने पुन्हा दिलासा दिला. पण…
“अरे अरे थांब. तुझा शो सुरू व्हायच्या आधी खूप करायचे. तुझ्यापासून काय लपवाव, आता तुझ्यावर प्रेम करू लागले..मला माहितीये हे इथे अस सांगणं म्हणजे… पण मला माहित नाही पण आज अनावर होऊन मी हा कॉल केला आहे.
“अग…” आरजे लाईव्ह असल्यामुळे त्याला आवरतं घ्यावं लागणार होतं.
“नाही थांब आज मला बोलू दे…”
अस म्हणत ती बोलू लागली…. तुझं माझ्या आयुष्यात येणं म्हणजे एखाद्या तहानलेल्या माणसाला पाण्याचा डोह मिळण्यासारखं आहे. मला माहितीये आता माझ्या सोबत हे ऐकणाऱ्या पाच पन्नास स्त्रिया तुझ्या मादक आवाजामुळे हा शो ऐकतात. कारण प्रेम कोणाला नको असतो. जसं मनावर प्रेम करणार कोणीतरी लागतं तसं शरीरावर प्रेम करून शरीराच्या स्तनापासून, योनिपर्यंत आणि हळूच पाठीच्या गुळगुळीत वलयाला  होणारा स्पर्श प्रत्येकीला हवा असतो. डिजायर, फॅन्टसी फक्त पुरुषांना असतात का?
एकदा तिच्या ताब्यात तर येऊन पहा, तिचा स्पर्श तिच्या पुरुषाला तितकाच तृप्त करणारा असेल, भूक शमवणारा असेल. पण भारतीय पुरुष त्यांच्या बायकांना एकाच साच्यात ठेवून त्यांच्यावर पुरुषी तोरा गाजवतात. त्याने ना तिला त्यांच्या संभोगाने ऑर्गजम मिळतो ना त्या क्षणाची अनुभूती. तिच्या स्तनांना ओढण्यात, तिला जवळ करताना तिला वस्तुसारख वागवण्यात कसला आलाय संभोग…
संभोगात ओढाताण असली तरी हक्काची हवी, पुरुषाने जवळ करताना फक्त माझं शरीर भागल पाहिजे या विचाराने संभोग केला तर तो संभोग नाही जबरदस्ती असते.
संभोगाच्या वेळी कसं श्वासांनी एकमेकांशी बोलायला हवं, डोळे बंद करून एकमेकांच्या शरिरांना ताब्यात घेतलं पाहिजे. जे तू जवळ नसताही करतोयस… तुझा आवाजच इतका मोहक आहे की कुठलीही स्त्री…
“आता तू माझं ऐक! “
त्याने तिला मध्येच थांबवून भानावर आणलं.
ती घाबरली, तिला घाम आला होता, तिच्या शरीराला त्याची चाहूल लागली होती..तिचं मन शांत झालं होतं पण वास्तविकता आठवून तिला भीती दाटून आली आणि तिने फोन कट केला.
तिने अचानक फोन कट केल्यामुळे आरजे शांत झाला, ती गडबडली आणि या सगळ्यात दाराची घंटी वाजत असल्याचं तिच्या लक्षात आलं.
येणारी सायंकाळ तिला सत्यात घेऊन आली. समोर तिचा नवरा उभा होता, तो या अशा अवेळी आल्यामुळे तिच्या मनात भीतीने कमाल मर्यादा गाठली. तिने पदर सावरून डोक्यावर घेतला, पाणी आणण्याच्या बहाण्याने स्वयंपाकघरात गेली. मागे रेडिओ वाजत होता, आरजे बोलत होता,
मला माहित नाही ती कोण होती. पण ती वादळ आहे! ते वादळ शामवायला एकच व्यक्ती मदत करू शकतो, तिचा नवरा.
या वाक्यावर नवऱ्याने रेडिओचा आवाज मोठा केला. माठात पाण्याचा तांब्या अडकून तिने कान इकडे केले…
आरजे बोलू लागला, ही स्त्री खरी आहे. तिला कुठल्याच बेकादेशीरपणे प्रेम नको आहे. कारण तिचा तिच्या नात्यावर अजूनही विश्वास आहे. तिने हजारो पावलं तिच्या नवऱ्याकडे टाकली आहे…त्याला एक पाऊल तिच्याकडे टाकायचं आहे. एक नाहीतर अर्ध, नाहीतर एक प्रेमाचा स्पर्श जरी देऊ केला तिची तहान शांत होत… 
त्याचं वाक्य संपतं न संपतं तिचा नवरा पहिल्यांदा स्वयंपाक घरात जातो, तिच्या नागमोड्या कंबरेला मिठीत घेतो, ती अलगद माठातून पाणी काढून त्याच्या ओठांना लावते, मागून मारलेली मिठी पुढून मारताना तो पाण्याचा तांब्या दोघांत सांडतो अन् तिच्या सर्वांगावर शहारे उभे करतो, ते हात, पाय, डोळ्यांच्या पापण्या, स्तन आणि कंबरेला आलेले शहारे पुसण्यासाठी तो त्याच्या ओठांना तिच्या स्वाधीन करतो, अन् दोघे एकमेकांना घट्ट मिठीत घेऊन खऱ्या अर्थाने नव्या नात्याची सुरुवात करतात.

– पूजा ढेरिंगे

Please follow and like us:
error
Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *