राखी विशेष?

  • by

वंशाचा दिवा म्हणून मुलगा पाहिजेच मानणारी पिढी रक्षाबंधनाला बहीण कशी देणार?

कित्येक घरांमध्ये भाऊ किंवा बहिणीची कमतरता भासत राहते. काहीजण नैसर्गिकरीत्या दिलेले अपत्य आपले मानून समाधानी होतात. पण आजही गर्भानिदानातून कित्येक बहिणींना मारून टाकले जाते. गर्भात नाही मारले तरी स्त्री म्हणून गर्भाबाहेर असलेला समाज आणि पुरुषसत्तेचा पाठीराखा तिचा बळी देत राहतो.
जन्म झाल्यापासून मुलींचा सतत तिटकारा करून मुलगी म्हणून मिळालेला हा जन्म कसा निरर्थक म्हणून लहानपणी खूप जास्त राग यायचा, चीड यायची. या विचारसरणीला विरोध करता येतो किंवा त्या विरोधात उभे राहून काहीतरी बदल करता येतो, हे वातावरण सुद्धा आजूबाजूला मिळत नव्हते. तेव्हा, हा समाज पुरुषवर्गच चालवतो, किंबहुना तो त्यानेच निर्माण करून जपला आहे हा विचार माझ्यात मुलगी म्हणून रुजायला लागला. आई आणि मावशीला बघत असताना त्याची तीव्र जाणीव होऊ लागली. जाणीव होत नव्हती तेव्हा आई-मावशीकडून तशी जाणीव करून द्यायला सुरुवात झाली. हातातल्या घासावरही पुरुषाचा आधी अधिकार मानणाऱ्या पिढीतून कधी एकदा बाहेर पडेल, एवढीच एक इच्छा होती. सतत भाऊच बहिणीची रक्षा करू शकतो, या वाक्यातून तिला सतत असुरक्षित आणि कमकुवत असल्याची भावना रुजवली जायची.

पुरुषप्रधान समाज असणं चांगलं होतं की वाईट हे कळण्याचं ते वय नव्हतं. पण ‘रक्षा करायला घरात भाऊ नाही’ हे वाक्य समाजाच्या रुढीमुळे रक्षाबंधनाला मनात यायचं. मुली ह्या कुणाच्या लेखी कसलंच रक्षण करत नाहीत. किंबहुना तसा विचार समाजात पसरलेला आहे. पण मुलींनी संस्कृतीचे मात्र रक्षण करावे हे एवढं काम समाजाने त्यांच्याकडून चोखपणे करवून घेतलं आहे. मैत्रिणी जेव्हा त्यांच्या भावाच्या राखीचे आणि ओवळणीच्या क्षणांचे किस्से रंगवत असायच्या, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला नाही म्हटलं तरी खिन्न करायचा.  
पण नंतर रक्षाबंधनाची संकल्पना लक्षात आली. त्यांना ओवळणीची ओढ लागायची. मला भाऊ म्हणून रक्षक म्हणण्यापेक्षा पुरुष कळायला एक भाऊ हवा होता.

माझा ‘भाऊ’ या नात्यावर राग नाही. मला तो हवाच हा अट्टाहास नाही. पण या रक्षाबंधनामागचा विचार भाऊ आणि बहीण या दोघांपुरताच मर्यादित असल्याची जुनी परंपरा काहींसाठी निराश करणारी होती. पूर्वीच्या रक्षाबंधनाचे रुप आताशा बदलत आहे. रक्षाबंधन हे रक्षा करणाऱ्या प्रत्येक नात्यासाठी आहे, हा विचार हळूहळू एक अंशी का होईना रुजवला जात आहे. आज मी बहिणी बहिणींची राखी बघते, किंवा आई- मुलीची राखी बघते. हे लहानसहान बदल या काळाला स्त्री जन्मावर लागलेले रोग काढून टाकायला मदत करणारे आहेत.

©Pooja Dheringe

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *