माझ्या नजरेतला काश्मिर


आयुष्मान खुराणाच्या ‘अनेक’ चित्रपटात काश्मीर, आसाम, जम्मू सारख्या राज्यांवर खूप ठोसपणे भाष्य करणारे दोन डायलॉग आहेत. “जब सात साल के बच्चे को हर दो मीटर पर एक वर्दी वाला दिखे तो यहाँ पे कैसे कोई इंडियन फिल करेगा।”
दूसरा डायलॉग, “पीस मेंटेन करने से अच्छा हैं वॉर मेंटेन करना। “
या दोन डायलॉगमधला काश्मीर या आठ दिवसाच्या ट्रीपमध्ये मी अनुभवला. दुर्दैवाने ऑफ सिझन गेल्यामुळे कदाचित काश्मिरच्या सौंदर्याबरोबरच तिथली जीवनशैली बघता आली.
बर्फाच्या धुक्याने शाल पांघरलेल्या काश्मिरची शाल जरी डोळ्यांना दिसली नाही पण कदाचित ती धुकं साफ झाल्यामुळे इथल्या लोकांची दबलेली आयुष्य बघायला मिळाली. इथे आर्मी आणि सामान्य जनता असे दोन वर्ग आहेत. दोघांनाही पीस (शांतता) प्रस्थापित  करायची आहे, पण आपापल्या पद्धतीने. ते कधीच एकमतावर येऊ शकत नाही. त्यामुळे दोघांचं म्हणणं ऐकून दोघांबद्दल कणव वाटते. पर्यटकांना देव मानणारे हे दोघे आहेत. त्यामुळे ते आपल्यासमोर नेटके राहतात.


काश्मीर बघताना कान आणि डोळे उघडे ठेवून पहावं. कारण इथे डोळ्यांना दिसतं एक आणि ऐकू येतं एक. दोन्हीही वास्तव असलं तरी दोघांमध्ये स्वर्ग, नरक ही अनुभूती आहे.


इथल्या लोकांच्या बोलण्यात काही गोष्टी कॉमन ऐकू आल्या त्या म्हणजे, “कश्मीर एक दुकान हैं, भारत और पाकिस्तान के लिए।”
“यहां पे रोज फेक एनकाउंटर होते हैं।”
“इंडिया हमारा दुश्मन हैं।”
“यहां की मिड़ियाने अलग ही कश्मीर पेश किया हैं।”
“कुछ रिपोर्टर्स जनता की भी सुनते हैं, लेकिन जब वो समाज के लिए लिखते हैं तो उन रिपोर्टर्स को यूपी बिहार में कैद करके रखा जाता हैं।”
“ड्रग्स लेनेवाले बच्चे ज्यादा बढ़ रहे हैं, पहले ये लोग बच्चे को मुफ्त में ड्रग्स देते हैं, फिर एकबार लत लगने के बाद उनसे गलत काम करवाते हैं। “

बुरख्याखाली सौंदर्याला लाजवेल अशा देखण्या रूपात जन्म घेऊन बुरख्याखाली मरणाऱ्या मुली जास्त आहेत. कारण सुंदर मुलींना बघून उत्तेजीत होणारे अनेक लोक इथे टपलेले आहेत. उद्योगधंदे किंवा इतर ठिकाणी काम करणाऱ्या महिला मोजक्याच दिसतात. हिमालयाच्या पर्वतरांगांनी वेढलेले बर्फाच्छादित काश्मीर बघणं स्वप्न असतं अनेकांचं. त्या काश्मिरची मला सुद्धा ओढ होती. पण थोडा हिरमोडच झाला. कोरडा काश्मीर बघणं म्हणजे तसं दुःखच ना 🙁

शहरं जसजशी कमर्शियल होत जातील तसं त्याचे सौंदर्य नष्ट होत जाणार. आज श्रीनगरमध्ये हजारो वर्षे जुनी भक्कम झाडी आहेत पण ती पाडून तिथे इतर मानवी सुख सोयी करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या निसर्गाला अशीच कुऱ्हाड लागली होती. त्यामुळे सोन्याचा धूर निघणारा महाराष्ट्र कृत्रिम विजेवर जगू लागला. काश्मिरची हिरवाई बघून त्यावर पडणारा सूर्यप्रकाश पाहून आपल्या सोन्याचा धूर निघणाऱ्या महाराष्ट्राची प्रतिमा समोर येते. पण इथली परिस्थिती बदलत चालली आहे. एकदा झाडांना कुऱ्हाड लागली की निसर्गाला तोडून आर्थिक फायदा घेणाऱ्या टोळ्या वाढत जातात. इथे अनेक ठिकाणी टनल्सची (बोगद्याची) कामं चालू आहेत. पर्यटकांचा काश्मीर बनवण्यासाठी मोठी धडपड तर सुरू आहेच. पण काश्मीर हे पैसा कमावण्याचे साधन असल्याचं दिवसेंदिवस इथे जाणवत राहतं.
या दरम्यान इथल्या लोकांचं निरीक्षण केलं तर, इथे जन्मलेल्या लोकांची त्वचा जास्त काळी दिसलीच नाही. इथले वातावरण बघता लोकांच्या त्वचा इतक्या चकचकीत दिसतात आणि नव्वद टक्के लोकांचा फिटनेस इतका जबरदस्त आहे की कोणाचंच पोट आलेलं दिसत नाही. त्यात बऱ्याच लोकांची नाकं लांब आणि टोकदार असतात. हा शारीरिक फरक इथल्या भुमिमुळे त्यांच्यात असावा. शिवाय अजूनही तिकडे मॅकडोनल्ड्स, डोमिनोजने कब्जा केला नाहीये. त्यामुळे त्यांची खाद्य संस्कृती ही अजूनही हेल्दी आहे. त्यामुळे आपल्याकडे देखण्या मुलांना जसं टक लावून बघण्यातल सुख महिन्यातून एकदा मिळतं, तसं इकडे पावलापावलावर नेत्रसुख प्राप्ती होते.
सायंकाळकडे झुकत चाललेला काश्मीर ऐकताना  थोडा माहोल शांत होतो आणि बऱ्याचदा कानावर पडतं, बॉम्बे का फॅशन, काश्मीर का मौसम, ऑर बिवी का मुड या तीन गोष्टींवर काश्मीरची लोक विश्वास ठेवत नाही.  कारण इथे केव्हाही ऋतू बदलतो आणि दिवसभर कितीही उष्ण वातावरण असले तरी रात्री काहीही धुवायचं असेल तर बर्फासारख्या कडकडीत थंड पाण्याचा सामना करावा लागतो. ते अतिशय अतिशय थंड असतं.
या सगळ्या वास्तविक प्रवासातल्या गोष्टींनंतर प्रवासात भेटलेल्या एका व्यावसायिकाचे वाक्य सतत मनात घोळत राहिलं. तो म्हणाला,
कश्मीर देखने से ही सुकून मिलता हैं,
लेकिन समझ जाओगे तो दर्द ही दर्द हैं!

-पूजा ढेरिंगे