जागा रिकाम्या होत जातात…काल घरात एक फ्रेम लावलेली होती. तुटली म्हणून जागा रीती झाली. ती खूपच आवडती फ्रेम आहे. तिने तिची जागा तिथे निर्माण केलीय. सायंकाळचा सूर्यप्रकाश तिला अजून देखणं करायचा.
फ्रेमवर साहजिक धूळ बसली होती. पण फ्रेम खालची जागा रिकामी झाली, ती मात्र पूर्वीसारखी स्वच्छ होती. उलट काही किडे, मकड्यांची जाळी तयार झाली होती. ती जाळी त्यांच्या घरांसारखी बनली होती. काही जुन्या जागा नकळत घर बनतात, नाही! या अशावेळी दोन पर्याय असतात, एखादी गोष्ट आपल्याला इतकी टोकाची प्रिय असते की एकतर आपण ती दुरुस्त करतो, नाहीतर ते टोकाचं प्रेम घेऊन तिच्यापासून सुटका करून घेतो.
माणसाचं पण असच असतं ना, थोड्या कटकटी होतात, प्रत्येकवेळी आपापसातील समीकरणे बदलत जातात. त्या नात्याला जूनेपण येतं, पण त्या नात्याची जागा स्वच्छ असते. ती जागा कुणीच घेऊ शकत नसत. कारण एका नात्याची भूक दुसऱ्या नात्यातून भरून निघत नसते. ती जागा म्हणजे त्या नात्या प्रती असलेली आपली श्रद्धा आणि आपुलकीच तर असते. अशावेळी त्या नात्याला रिप्लेस करायचं की रिपेअर हे आपण ठरवायचं.