नाती खरंच दूरच असावी. माणसाने गुंतून नाती जपू नये. त्याने काय होतं तर तो स्वतःची स्वप्न मारतो, तडजोडी करतो, मनात नसतं तेही करतो. इतरांना आनंदी ठेवून नाती जपतो. कारण त्याशिवाय नाती टिकत नाहीत. त्यामुळेच आपण नेहमी म्हणतो, रक्तापेक्षा मानलेली नाती कधीही चांगली!
माणसांनी दूर राहावं एकमेकांपासून. कुठला अघळपघळ नको. प्रेम नको. आधार नको, अपेक्षा तर नकोच नको.
प्रत्येक नात्यातल्या अनावश्यक अपेक्षा त्या नात्याचा जीव घेतात. अमुक तमुक बदल करायला लावणारी नाती तर जास्त काळ तग धरू शकत नाही. त्याने या नात्यात राग, द्वेषभाव वाढतो. कारण अपेक्षा या बहुतांशवेळा मनाविरुध्द असतात आणि मनाविरुध्द वागणं कोणत्याच सजीवाला मान्य नसतं. पण नात्याच्या बंधनामुळे तो या अशा अनेक अनावश्यक तडजोडी करतो.
माणूस म्हणून तुम्हाला काही जमलं नाही तरी चालेल माणुसकी म्हणून तुमच्या भोवतालच्या लोकांना आणि नात्यातल्या आपल्या माणसांना मुक्त ठेवता आले पाहिजे.
काही लोक अशीच असतात. त्यामुळेच त्यांच्याशी बोलावं वाटतं, मन मोकळं करावं वाटतं, मनापासून नातं ठेवावं वाटतं. कारण त्यांनी त्यांच्या मनात हे स्वीकारलेले असते की प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. आयुष्य असल्यामुळे त्याचे स्वतःचे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत. आपण त्याच्यावर स्वतःला न लादता उलट जेवढा वेळ सोबत आहोत तो आनंदी बनवण्यात मदत करू.
यावरून आठवलं, आतापर्यंतच्या आयुष्याच्या अनुभवात मला कधीच दिसलं नाही की एखादा मनुष्य एकमेकांच्या आनंदासाठी प्रयत्न करत आहे. दूरचे तर जाऊद्या. पण जे आपले म्हणवत आलो त्यांच्या नातं असतं ते सुद्धा फक्त नि फक्त फायदा तोट्याचे नाहीतर अपेक्षेच बोलतात. कुठल्याही नात्यात अपेक्षा येतात तेव्हा तो माणूस कर्ज फेडल्यासारखं जगू लागतो.
कोणी कोणाकडून अपेक्षा करू नाही, स्वतःकडून पूर्ण होईल ते सगळं करावं! ज्याच्या त्याच्या आयुष्याचं ओझं ज्याला त्याला वाहायच असतं. उगाच त्यात तुम्ही अपेक्षांचं ओझं टाकून त्या अपेक्षा पूर्ण झाल्या तर आनंद करून घेणं हा विजय नसतो. ही चांगली वृत्ती नाही. उलट, त्या व्यक्तीने मन मारून अपेक्षा पूर्ण केली ही तुमची हार असते.
त्यामुळेच माणसाने एकटं जगावं. एकटं राहावं, आठवण आली की भेटीगाठी घ्याव्यात. पण कुणात अडकु नाही आणि कुणाला अडकवू सुद्धा नाही. याने हळूहळू आपण एक उत्तम निरोगी आयुष्य निर्माण करण्यास सुरुवात करू.
– पूजा ढेरिंगे