प्रत्येक नव्या विश्वाला जगासमोर आणण्यासाठी कुणा ना कुणाचं निमित्त पुरतं. तसं, राजा हरिश्चंद्र, हरिश्चंद्राची फॅक्टरी, आलम आरा, अशी ही बनवा बनवी, माहेरची साडी, पछाडलेला, चिमणी पाखरं, श्वास, नटसम्राट या माझ्या आयुष्यात पाहिलेल्या काही लेजन्ड्री मराठी चित्रपटांना सोडले तर मध्यंतरीच्या काळात मराठी चित्रपटांचा ग्राफ एकाच वर्तुळात फिरत होता. तीच ती कथा आणि ठरलेलं डीरेक्शन !
यशस्वी व्हायला आणि जगात लोकप्रिय व्हायला काहीतरी कमी होतं. पूर्वी आपली कापडं झिझवलेल्या मंडळींचे चित्रपट केवळ लोकल आणि फार फारतर राष्ट्रीय अवॉर्डसाठी जातात. त्यांच्या कलेचा काळ हा रिलीज झाल्यानंतर जास्तीत जास्त एखाद आठवड्याचा, पूर्वी हा काळ जास्त होता. कारण चित्रपटांची निर्मिती ही मर्यादित होती. आता उपलब्ध झालेल्या असंख्य प्लॅटफॉर्ममुळे मी माझ्या घरी बसून व्हिडिओ बनवू शकते, तोही ब्लॅक अँड व्हाईट किंवा हवा तसा इफेक्ट देऊन…
पिढ्यांमध्ये जसा बदल होत जातो, चित्रपटही तसाच बदलत जातो. प्रत्येक पिढी चित्रपट सृष्टीत आपलं योगदान देत असते.
या पिढीत अनेकांनी दिलं, मात्र सैराटला त्याचं योग्य स्थान पटकवता आलं. कदाचित वेळ योग्य होती, कथेचा विषय जिव्हारी लागणारा होता, दिग्दर्शक आपल्यालाच कुणीतरी असावा असा होता, नव्या चेहऱ्यांची प्रतीक्षा होती, रांगड्या ग्रामीण भाषेतून दुःखाचा नि आनंदाचा ठसका ट्रेण्डी वाटणारा होता, पब्लिसिटी स्ट्रौंग होती नि नैसर्गिक आणि खरी कथा पाहू शकतील असं हेल्दी वातावरण अर्थात या चित्रपटाच्या येण्याने तयार झालं होतं.
त्यामुळे प्रत्येकाने त्याच्या मनाला भावलं ते व्यक्त होत गेला. यातून तयार झालेले कलाकार हे न विसरता येणारे ठरले. कारण चित्रपटाने कोणत्या ना कोणत्या कारणाने मनात घर बनवले.
त्यापैकीच अार्ची, अर्थात रिंकू राजगुरू. तिच्या येण्याने अनेकांनी तिच्या अभिनयाची तारीफ केली, तिच्या बुलेट चालवल्याने अनेकींना हुरूप आला, कुणी तिच्या ‘मराठीत समजत नाही इंग्रजीत सांगू का’ ला उत्तम संवादाचा दर्जा दिला. पण दुसरीकडे तिच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर असंख्य कमेंट्स आल्या. कोणी म्हटलं की “तुला आर्ची सारखी गर्लफ्रेंड मिळावी, त्यावर रिप्लाय करणारा म्हणायचा, त्या जाड्या ढबरी वर कोण प्रेम करणार? रात्रीचं वांधे. ती आपल्यावर बसली तर प्रेम व्हायच्या आधी जीव जायचा…” कोणी म्हटलं, तू आर्चीसारखी दिसते, त्यावर ती चिडून म्हणायची, शी! ती काय हिरोईने? काळा सावळा रंग, ना नाकी डोळी चांगली ना चेहऱ्याला आकार… त्यापेक्षा ऐश्वर्या, सोनालीसारख म्हण… नकारात्मक आणि ट्रोलींगच्या या जगाला टाळून आपल्या कामाला प्राधान्य कसे द्यावे, हे तिच्याकडून शिकण्यासारखे आहे. हिरोईन असो हिरो असो, या दोघांच्या बाह्य सौंदर्याचा प्रेक्षक मोहताज असतो. ही व्याख्या बदलणारी ही पोरगी होती, अर्थात श्रेय नागराज मंजुळे यांचे अधिक आहे. त्यांनी चित्रपट सृष्टीला अभिनेत्री कशी असावी, याचे उत्तर दिले.
आणि ही मुलगी सैराटमधून सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार पटकावून गेली. त्यानंतर मनसु मलीग (कन्नड सैराट) कागर, मेकअप, झुंड आणि आता वेबसीरिज हंड्रेड. एकोणिसाव्या वर्षी हा ग्राफ असेल तर हळूहळू ही रेंज वाढणारी असेल. योग्य कथा मिळतील, तशी ही अभिनेत्री म्हणून अधिक चपळ होईल. चेहरा नवा असल्यामुळे तिचं मेहनत घेणं हे तिच्याबद्दल आकर्षित करणारे आहे. तिला नेहमी बोल्ड दाखवले गेले. तिच्या या फोटोतून ती इतर कथांसाठी सॉफ्ट पण प्रभावी भूमिकांसाठी तयार होत असल्याचे दिसून येते…
हा फोटो स्क्रोल करून गेले पण पहिल्या नजरेत कुठल्याच अँगलने ती रिंकू राजगुरू वाटली नाही. पण तिच्याबद्दल @swapnil rajshekhar यांचे लिखाण वाचून थांबले. तेव्हा कळलं ही आपलीच सैराटची बदललेली आर्ची आहे… एवढा बदल चित्रपट सृष्टीत कौतुकास्पद आहे…
कुणी म्हणेल, आर्चीच्या वाढदिवशी हे लिहून तुम्ही दोन वेगळ्या काळांची तुलना करू पाहत आहे. परंतु ही तुलना नाही, ही प्रत्येकाच्या काळातला स्ट्रगलची पुंजी आहे. प्रत्येकवेळी नवं काहीतरी चित्रपट सृष्टीत येतं त्याने त्याचा दर्जा अधिक वाढला जातो. यात सैराटचे योगदान अटळ आहे. त्याबरोबरच त्यातील कलाकरांचेही!