निसर्गाला माणसाची नाही, माणसाला निसर्गाची गरज आहे…
महाराष्ट्र सरकारने २५ किल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल आणि डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा फतवा जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हणजे काय विचार करून हे असे निर्णय घेतात हे?
विकास करायचा तर ज्या समस्या आहे त्याचा करा… निसर्गाला समृद्ध करा, जीव सृष्टीला आणि इतिहासाला अनुभवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करा. मॉडर्न डोकं चालवून संस्कृती जपली जात नाही. त्याकरता एकदा स्वतः गाद किल्ल्यांचा अनुभव घ्या. काहींसाठी ते प्रेम आहे, काहींसाठी कदर आहे, काहींच्या बांधवांचे प्राण तिथे गेले आहे, काहींचा रोजगार तिथला आहे, काहींची शांतता हे गड किल्ले आहे. त्यामुळे एकदा सरकारने इतर दौरे करण्याबरोबरच हेही दौरे अनुभव्हावे आणि आपली नाळ त्या इतिहासाशी जोडून हे असे निसर्गाला व्रिद्रूप करणारे निर्णय द्यावे.
पर्यटक म्हणून निसर्गाने निसर्ग अनुभवायचं स्वातंत्र्य माणसाला दिलं. पण पूर्ण स्वातंत्र्य दिलं कि माणूस त्याचा जीव घ्यायला उठतो, हेच करतंय का हे सरकार? एकदा या गड किल्ल्यांचा, त्यावरील डोंगर कपाऱ्यांचा, तिथे जन्मणाऱ्या कोवळ्या निसर्गाचा नि भरभरून बरसणाऱ्या ऋतुमानाचा फील एकदा घ्या. जो जिवंतपणा माणसाला माणसात मिळत नाही, जे माणूस माणसात शिकत नाही, त्या माणसाला माणूस बनवण्याचं सामर्थ्य या गड किल्ल्यांत आहे.
गड किल्ले हि जागा नाही, ते एक हक्काचं नि अनुभवण्याच ठिकाण आहे. त्याचा व्यवसाय करून इतिहासाची दमडी मोल किंमत करू नका!
पिढ्यान पिढ्या मोठ्या होतात. माणसे जन्म घेतात मरण पावतात. हेच निसर्गाचं चक्र चालू आहे, चालू राहील. आधी बिल्डिंगी, रस्ते, मेट्रो, इंडस्ट्री, कारखाने, बुलेट ट्रेन सगळं घडलं. टपऱ्यांची अतिक्रमणे उठवली जातात. निसर्गावर झालेलं अतिक्रमण कोण थांबवणार? त्यासाठी निसर्ग सक्षम आहेच. पण आपण निसर्गाचे देणेकरी असूनही आपण आजही त्याचाच फायदा घेत जगतोय? त्याला मारून त्याच्या हद्दीत बिल्डिंगी, घरं मोठे करून देश विकसित करतोय… आणि आता गड किल्लेही तुम्ही सोडत नाही?
गेल्या कित्येक पिढ्यांसाठी ओसाड रस्ते, स्वच्छ नद्या, झुळझुळते पाणी, गावांमध्येच निसर्ग अगदी घराला खेटून. पण आता? तोच निसर्ग पाहण्याची ओढ असली तरी निसर्ग जवळ नाही. ओढ मात्र आहे. निसर्गप्रेमी जन्म घेताय, त्यांच्या परीने त्यांचं योगदान देताय. पण ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी मिळतंय त्याच्याबद्दल थोडी कृतज्ञता वाटू नये? त्यासाठी वेगळी पदवी बहाल करावी लागते? पण तेही बरंच आहे निसर्गप्रेमी म्हणून तरी काही लोक अदबीत राहतात.
पण विचार शक्ती इतकी कमकुवत आहे का? निसर्ग जतन करायला गड किल्ल्यांवर लग्न सोहळे?
कल्पना करा, निसर्गाच्या कुशीत असलेल्या त्या गड किल्ल्यांवर माणसं कचाकचा आपले पाय देताय, आणि त्याचा कणभर गिल्ट न ठेवता निसर्गाला हात लावून गुदमरून टाकताय…. याशिवाय लग्न सोहळ्यातील प्लॅस्टिकने त्याची गळचेपी का करायला निघाले आहे? मग थोड्या दिवसांनी ग्रँड कुल पार्ट्या नाहीतर मंत्र्यांचे विशेष लग्न समारंभ तिथे होतील नि यातून का कोणी शिवबा सारखा म्हणवून घ्यायला धजावणार नाही.
मुळात गड किल्ल्याने तुमची गरजच नाही, कारण निसर्ग इतका सक्षम आहे कि तो तुम्हालाही पोसतो. तुम्ही त्याच्या हद्दीत येऊन त्यालाही व्यवसाय करून टाकतात नि मोठे होतात…. ?
आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या ठेवणीत हे गड किल्ल्यांचं पावित्र्य नि तिथला इतिहास जिवंत ठेवा. तुम्ही असे इतिहास घडवू नका कि, हेरिटेज म्हणून सगळ्यात खालचा दर्जा महाराष्ट्रातल्या निसर्गाला दिला जाईल. कारण निसर्गाने तुम्हाला कधीच घाण दिली नाही, ती तुम्ही केली. जपता येत नसेल तर निदान विद्रुप नि गलिच्छ करू नका.
ज्या डोक्यातून हि गलिच्छ कल्पना आली, त्याने एकदा सिंहगड, राजगड, विसापूर, जंजिरा, तोरणा किंवा त्या पंचवीस किल्ल्यांमधील एका किल्ल्यावर जाऊन रिकाम्या मानाने हेच तिथे बोलून दाखवावं. तिथे असा तोल जाणार नाही, कारण या गड किल्ल्यांत मूल्य, संस्कार, जपणूक, मरण आणि भान हे सगळं शिकवण्याची ताकद आहे.
काहीही करा निसर्ग तरीही त्याच भावनेने तुम्हाला आपलेसे करेल, फक्त तुम्ही त्याला ओळखा. अधिक सुंदर करा!