भेट स्वतःशी…

  • by

आपल्या मनाचं प्रतिबिंब म्हणून आपल्यासमोर कोणीतरी व्यक्ती येते. व्यक्ती पूर्ण वेगळी असते. पण ती सुद्धा त्याच गोष्टीने अस्वस्थ असते ज्या गोष्टीमुळे आपल्या आयुष्याची काही वर्ष वाया गेलेली असतात. आपण त्या प्रतिबिंबाचं दार लावू पाहतो. पण स्वतःपासून कधी पळू शकलोय आपण?

ती व्यक्ती जेव्हा आपल्याला तिच्या आयुष्यात झालेली घटना डिट्टो सांगते तेव्हा विचलित व्हायला होतं. आपणही हेच फिल केलं होतं, आपणही हीच माती खाल्ली होती म्हणत स्वतःला कोसतो. पण यावेळी समोरचा आपल्या सल्ल्याची वाट पाहत असतो.
जणू आपणच टाईम ट्रॅव्हल करून ती घटना तशी होण्यापासून रोकु शकणार असतो. त्यामुळे आपल्याच तरुण प्रतिबिंबाला यावेळी खरा सल्ला द्यायचं ठरतं.
घटना अशी घडते की मुलगी एकतर्फी प्रेमात पडते. मुलगा नेहमीसारखं भाव देणाऱ्या मुलीला टाळतो. मग हळूहळू ती त्याच्या एका कटाक्षासाठी समर्पणात जाऊ लागते. पण ऑनलाइनच्या जमान्यात तो तिच्या प्रेमाला ब्लॉक करतो.

त्याचा नकार ना मला माझ्या काळात पचवता आलेला ना तिला. दोघी “मीच का? Why me?” या प्रश्नाच्या वाटेवर जातो. स्वतःच्या दोषांच पत्रक प्रसिद्ध करतो. आपण कसे खराब दिसतो, कसे गरीब आहोत, एकटे आहोत वगैरे स्वतःला सतत सांगून जगाच्या दुःखाचं गाठोडं स्वतःवर ठेवतो. स्वतःला शून्यावर आणून ठेवतो.
त्याला घंटा फरक पडत नाही. असं म्हणून खूप त्रास करून घेतो. पण त्याला का फरक पडावा? आपल्याला नकार म्हणजे नकार कळायला नको का? मुलीने नकार दिल्यावर त्याचा आदर करायला सांगतो आपण. मग इथे हा भेद का?

त्यामुळे तिच्यासाठी किंवा अर्थात ७ वर्षे आधी जाऊन मी काही बदलू शकले तर त्या टिनेज वयातल्या स्वतःला मी एवढंच सांगेल,”जे तुझ्या वाट्याचे ते कोणताही डोंगर, गड, पर्वत, आभाळ ओलांडून अचानक तुझ्याकडे येईल. “अचानक” हा शब्द इथे मी खूप काळजीपूर्वक लिहितेय. ते कसं घडेल ते तुला कळणारही नाही. पण घडेल नक्की! त्यामुळे जे तुला पाहिजे त्याचा हट्ट करून त्याच्या मागे लागण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नांमागे लाग. स्वप्नांवर एकतर्फी प्रेम केलं तरी फायदा नेहमी आपलाच होतो. इतरांना तू आवडण्यासाठी आधी स्वतःला तू आवडायला हवी. त्यासाठी स्वतःची तयारी सुरू कर.”

मी हाच फॉर्म्युला वापरला आणि हे सांगितल्यावर कोणाला आश्चर्य वाटायचं तर वाटू दे पण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करून स्वप्नांच्या मागे लागतो तेव्हा ती माणसं नक्की आपल्या प्रवासात भेटतात ज्यांनी कधीकाळी आपली कदर केलेली नसते. त्यामुळे जेवढी गरज दुसऱ्याने आपल्यावर प्रेम करण्याची असते तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त गरज आपण आपल्यावर प्रेम करण्याची असते. कारण आपलं स्वतःचं प्रेम आपल्याला कधीच धोका देत नाही. ते नेहमी आपल्याल जगवतं!

  • पूजा ढेरिंगे
Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *