बाप आई तू…

हा लेख त्या सगळ्या आई वर्गाला समर्पित, ज्या स्वतंत्र पालक आहे. Single mother म्हणून आपल्या मुलाला धाडसाने वाढवतात. त्यांच्या धैर्याला सामोरं जाणाऱ्या मुलीची कहाणी…

“वडील (?)
कोण आहे हा व्यक्ती ?
शब्द नवा नाहीये पण माझ्यासाठी कोण आहे … ?
त्याची माझ्या आयुष्यातली भूमिका काय आहे..?”
समाजातल्या कित्येक बापांना ओळखतेय मी, पण मला माहित नाही बाप कोण आणि काय असतो. सगळं केवढं वेगळं आहे हे … पुरुषप्रधान जगात मला बाप माहित नाही.
मला या शब्दाचा त्रास होतोय हो …!   ज़रा शांत बसाल तुम्ही? नका विचारू मला असले पाया नसलेले प्रश्न …. 

इतके दिवस त्रास नव्हता होत. मी बोथट झाले होते, पण आज अचानक शरीरातून सळसळती वीज जावी, दुखत्या भागावर घणाघाती आघात व्हावा तसं अंग आतून युद्ध करून उठलं. जेव्हा ऑफिसमध्ये ऑडिटच्यावेळी मला ‘वडिलांवर’ बोलण्यास संगितले…

काय वेगळं आयुष्य आहे ना हे …? ज्याच्याकडे बाप नाही त्याला बापाचं महत्त्व सांगायला लावावं हा कठोरपणा या आयुष्यातच होऊ शकतो, मला कित्ती पटींनी मान्यच आहे तो!
नटसम्राटमध्ये म्हटलं तसं लुळ्यालाच चप्पल नसल्याचं दुःख सांगावं, तसं आज एवढा सगळा स्टाफ सोडून त्या काचेच्या भांड्यातूून निवडलेल्या चिठ्ठीत तुझ्या आयुष्याचा बाप माणूस’ हे यावं? वडलांवर मीच बोलावं हे माझ्या वाटणीला यावं……? 

ती चिठ्ठी वाचून त्यावेळी हळवी वगैरे मुळीच झाले नाही मी …एखादी जखम लहानपणापासून वाट्याला आली कि तिचं दुःख तर होतंच नाही पण ती तिथे आहे कि नाही हेही  आयुष्याच्या लढाईत विसरून जातो. माझ्या आयुष्यात बापाचंही तसंच झालं एखाद्या जखमेप्रमाणे… लोकांना दिसू नये म्हणून लपून ठेवलेली जखम आणि तिचे व्रण मी विसरले तरी समाज विसरू देत नाही.
त्या क्षणापासून मला माझा बाप कल्पना करून माझ्या आयुष्यात आणावा लागला. त्याचा श्वास माझ्या आयुष्यात असल्याचा कुरूप टास्क मला बनवून घडवायला लागला.
आतून खोटं बोलण्याची तिरिपही बाहेर चेहऱ्यावर दिसू नाही म्हणून सगळ्यांच्या परवानगीने मी वॉशरूममध्ये जाऊन खंबीर होऊन वाट्याला आलेला तो टास्क करायचं ठरवलं.
त्यावेळी मनात एकच विचार केला, “माझ्यासमोर असणाऱ्या या प्रत्येकाकडे आई-वडील या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. पण माझ्या आयुष्यात असणारी एकच व्यक्ती केवळ माझी आईच नाही तर ती माझी वडीलही आहे आणि जी आई मुलीचे वडील होऊ शकते ती मग कुठलीही भूमिका सहज निभावू शकते ….”

पण मी त्यांना असं संगितल की माझी आईच माझे वडील आहे तर…?
ते कसं  वाटेल ऐकायला? या आधी त्यांनी हे असं काही ऐकलं असेल? त्यांच्या मानसिकतेला पेलवेल हे? विशेष म्हणजे हे सांगितल्यानंतर अनेकानेक मानसिक अन् प्रश्नार्थक नजरांना मला सामोरं जावं लागेल. काही पुरुषार्थी नजरांचा सुगावा वाट्याला येईल. त्यामुळे त्यांना आश्चर्य नाही वाटणार किंवा वाटेलही … हे धाग्याला धागे जोडून अजून गुंता वाढावा तसं माझं झालं होतं.
पण माझ्यासाठी त्यांचं आश्चर्य गौर करण्यासारखं होतं? अज्जीबात नाही कारण त्यापेक्षा “माझ्या या ‘विश्वानं’ हे सगळं आतापर्यंत निभावून आणणं, एक आई आणि एक बाई म्हणून” हे कोण्या वीरपुरुषाहून कमी धैर्याचं नव्हतं! मी ते सांगण्यातच धन्यता मानेल…
स्वतःला मिठीत घेऊन, स्वतःच्याच जखमा आणि वाट्याला आलेल्या दुःखाच्या वेदनेवरून अलवार हात फिरवून मी वॉशरुममधून बाहेर पडले. जातानाच प्रत्येक पावलानिशी मनाशी कित्येक निर्णयांच्या ठाम गाठी बांधल्या. आयुष्यात बापाचं नसणं स्वीकारणं आणि आईचं सामर्थ्य सन्मानित करणं हा त्या दिवशी घेतलेला निर्णय आयुष्याला पूर्णत्व देत गेला. आजवर बापाची कमी आईच्या कष्टांपेक्षा अधिक दिसायची. किंबहुना समाजामध्ये वावरताना ती कमी जाणवून दिली जायची. आजही ऑफिसमध्ये माझ्या वाट्याला बाप माणूस येणं हा योगायोग नव्हताच. ऑफिसमधल्याच जुनाट कुजट मानसिकतेत अडकलेल्या पुरुषांचे ते चाळे होते. मला ही लढाई मनाशी स्वीकारून जगाबरोबर जिंकायची होती. मला बाप आठवून हार नाही तर, आई बघून जिंकायचं होतं. मी ऑफिसमध्ये माझ्या आयुष्याचं सत्य सांगितलं, त्यावेळी बऱ्याचशा फेक स्त्री पुरुषांनी खोट्या दयेचा कांगावा केला. पण मला हलकं वाटत होतं. कारण आज वयाच्या बाविसाव्या वर्षी मी त्यांचं अस्तित्व नसल्याचं स्वीकारलं होतं. त्यावेळी मला कुणाच्या कमेन्ट्सने फरक पडला नाही, जेव्हा आईने हे दुःख पचवलं, मुला बाळांच्या जन्मानंतर लढलं तिथे मला तर केवळ बघ्या होऊन हे स्वीकारायचं होतं. आयुष्यातलं बोचणारं सत्य स्वीकारण्याचा निर्णय घेतला तेव्हा, “त्रास होतो आता.?” बॅकग्राऊंडमधून प्रश्न आला. 

“नाही रे ! त्रास नाही होतंय आता, सवय झाली नां… फक्त लहानपणी वडील शोधला, नाही मिळाला कुठेच. मग खोट्या आशांवर जगत राहीले. आयुष्य मोठं होत गेलं. तेव्हा मित्र मैत्रिणी आणि आजूबाजूचे प्रश्न विचारू लागले. त्यांच्या प्रश्नांनी मला कोड्यात पडायला व्हायचं.त्यामुळे मोठं झाल्यावर एकदा आईला विचारलंही, “आई, बाबा कुठे असतात गं ? ….. ती शांत राहिली आणि मी तिची शांतता समजण्याइतकी मोठी झालेली. त्यामुळे मी तोच प्रश्न पुन्हा कधीच उच्चारला नाही. आयुष्यात कद्धीच नाही!

बाबा एकदा मी मोठी झाल्यावर आले होते, तेवढं आठवतं… त्या दिवशी खरंतर त्यांच्या कुशीत शिरायचं होतं. थोडं सांगायचही होतं माझ्या भविष्याबद्दल, माझ्या जोडीदाराबद्दलही. पण त्यांना शेजारच्यांच लग्न पार पाडायच होतं, शिवाय जोशींची मुंजही होतीच….

मला कळतच नव्हतं, प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला हक्काचा हिरो, माझ्या आयुष्यात साइडरोल का करून गेला…! 
असो ! 
म्हणूनच डोळ्यातला अभिमानाचा समुद्र तिच्या पायाशी ठेऊन म्हणते, ” बापाचं जाऊदे ,पण आई भरभरून दिली, इतकी की बाप होऊनही ती पुरून उरली ……..”

Please follow and like us:
error

4 thoughts on “बाप आई तू…”

  1. तुझं लेखन सहज,सोपं व वेगळं असतं ….
    या लेखात ते स्पष्ट जाणवलं ….
    सहज आयुष्यातले चांगले सहकारी अशा भुमिका ठीकठिकाणी पार पाडताना दिसून येतात …
    मस्त सोपं स्पष्ट लेखन ..
    अभिनंदन

  2. he wachun as vatla ki tumhi nahi tr mech sarv sangat ahe aata paryant manat thevlela… kmit kmit kmi tumhala vyakt tri hota yet… aamhala tr te pn jamat nahi
    khup chan ya saglya post madhe me mazya aai aani mala pahat hoto… tya vyaktila baba mhnav ki pappa ajunhi mahit nahi kdhi bhetatch nahit na

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *