सीता रामम्, एकनिष्ठ प्रेमाचा लिफाफा…

  • by

“मुझे तुमसे बेइंतहा मोहब्बत हैं, यह मैं बता नहीं पाऊंगी”ऐसा पड़ाव हर मोहब्बत के किसी मोड़ पर आता हैं।कभी कभी प्यार इतना मजबूर कर देता है।”हा विचार सीता रामम् पाहिल्या पाहिल्या मनात आला.

प्रत्येक प्रेमाचा शेवट प्रेम झाल्यानंतर लग्न, संसार आणि सोबतीने मरण हा नसला तरी तो व्यक्ती कशाचाच काही संबंध नसताना एखाद्या घटनेने अपघाताने आपल्या आयुष्यात येतो आणि आपलाच होऊन जातो. सीतेच्या आयुष्यात रामाचं येणं तसचं आहे. कलियुगीन रामायण कसं घडलं असतं ? त्यातले पात्र कसे वागले असते? रावणाची भूमिका काय असती याचा विचार डोळ्यासमोर ठेवून हा चित्रपट दिग्दर्शित केला असणार असं काही ठिकाणी जाणवतं.

Change is the only constant! असं यापूर्वी म्हटलो आपण. पण बदलाबरोबरच प्रेमही कधीच बदलत नसतं, हे हा चित्रपट संपल्यावर जाणवते. प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती बदलल्या, रंग, रूप बदललं पण प्रेमाचा आत्मा न बदलणारा आहे.

चित्रपटातील सीता म्हणजेच मृणाल ठाकूर कमालीची सुसंस्कृत मुलगी दिसते. तिच्या त्या दिसण्याला मुलींमध्ये जन्मतःच असते ती नजाकत, अकड आणि गुरुर याची जोड आहे. पण रामच्या प्रेमासमोर तिचं तसं असणं क्लिष्ट वाटतो. पण बऱ्याच मुली अशाच असतात नां… म्हणून सुरुवातीला सीता ॲक्सेप्ट होतेच. पण हळूहळू तिच्या वागण्याचं, कृतींच गूढ तयार होऊ लागतं. रामायणातील राम सीता आणि रावणाचे बदलेले कलियुगातील रोल्स भारी ह्युमर क्रिएट करतात. जसं सितेचं रामाला शोधायला येणं, रावण आणि रामाने फोनवर संभाषण करणं याने प्रेक्षक खुश होऊन जातो. या सगळ्यात दिग्दर्शकाने धार्मिक भावना दुखावल्या जाऊन कलह होऊ नये याची काळजी म्हणून पाकिस्तानात प्रवेश केल्यानंतर काश्मीरमध्ये आतंकवादी पाठविणाऱ्या अन्सारीला मारताना अन्सारीच्या जवळच असलेलं कुराण बाजूला हातात घेऊन हल्ला केला. बेसिकली “मुस्लिम परी आणि हिंदू जवान” या मानसिकतेला हाईलाईट करणारी फिल्म आहे. पण माझा विश्वास आहे, प्रेमात माणूस सगळ्यात जास्त ताकदवर बनतो! त्या प्रेमात दोघांचं असणं अनिवार्य आहे, हेच चित्रपट वारंवार सांगतो, दाखवून देतो.

चित्रपटाची सुरुवात आणि शेवट परफेक्ट पॅकेज आहे. पाकिस्तानी आफ्रिन म्हणजेच रश्मिका मंदानाला घेऊन सुरू होणारा चित्रपट समाधानकारक शेवट देऊन संपतो. चित्रपटात आफ्रिनकडून मिळालेलं शेवटचं पत्र तब्बल २० वर्षांनंतर सीतेच्या हातात पडतं. त्या सिनला अक्षरशः अंगावर काटा, मनात हळहळ, खूप तुडुंब भरलेलं प्रेम आणि आपल्या आवडत्या व्यक्तीशी जोडलेलं नातं आठवतं. आपण प्रेमात, प्रेमासाठी केलेलं स्ट्रगल आठवतं. सहज आसवं येतात. खऱ्या प्रेमाचे शेवट इतके अपूर्ण नसावेत ना, वाटून जातं. प्रेम त्याचा त्याचा मार्ग शोधतोच. मग तो कोणाच्याही माध्यमातून असो! कित्ती अलवार प्रेम करतो आपण! किती जपतो स्वतःपेक्षा प्रेमाला! राणी नूरजहाँ सीता बनते, हिंदू रामवर प्रेम करते. राम अनाथ असल्याचं कळताच ती त्याला पत्र लिहू लागते. त्यांचा प्रत्यक्ष भेटीपेक्षा पत्रांनी जास्त संवाद होतो. पत्राच्या भेटितला सहवास जास्त होतो. पण ती त्या किमान भेटीतून त्याची होऊन जाते, जन्मभरासाठी! त्यातून त्या दोघांची एकमेकांसाठी असलेली धडपड प्रेम सेलिब्रेट करण्याची प्रेरणा देऊन जातं.

चित्रपट कुठलेच प्रश्न, कुठलीच भावना अनुत्तरित ठेवत नाही. उलट आताच्या पिढीसाठी एकनिष्ठ प्रेमाचा स्पेशल लिफाफा अलगद मनात ठेवून जातो. स्मुथ मूव्ही आहे. काहीच न करता रविवार प्लेजंट करायचा असेल, सुखद करायचा असेल तर डीज्ने होटस्टारवर हिंदीमध्ये उपलब्ध आहे.

वॉच सीता रामम्, सेलिब्रेट लव्ह!

-पूजा ढेरिंगे

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *