कर्ती स्त्री/ कर्ता पुरुष; लग्न होण्याची अवस्था!

  • by

कर्ती स्त्री होण्याचा हा प्रवास दरीसारखा असतो. कर्ता पुरुष ही संकल्पना जशी जबाबदारीची. तसचं कर्त्या स्त्रीचं असतं. कर्ती स्त्री माझ्या नजरेत अशी दिसते, जिचं नवं नवं लग्न झालंय. तिला नव्या चार भिंतींना ‘घर’ म्हणायचं आहे. किंवा आधीच असलेल्या घराला घर म्हणून टिकवायचं आहे. त्या स्त्रीच्या मनात असंख्य धबधबे अक्षरशः कोसळत असतात.

ती म्हणते,
स्त्री म्हणत म्हणत आपण किती दूर वाहत येतो… नदिमायचं जगणं काय वेगळं असतं ग? वाहण्याशिवाय नदीसारखं स्त्रीलाही पर्याय नसतो हो!

आपला उगम कुठेतरी झालेला असतो. आपलं पोहोचणं निश्चित नसतं, पण आपल्याला दरीत उतरायचं नाहीतर समुद्रात मिसळायचं हे ठरलेलं असतं. जे अटळ असतं. ते अटळ असल्यामुळे आहे तसं स्वीकारून त्याचं सौंदर्य बघण्याकडे आपण विशेष लक्ष द्यायला हवं. इतकं कठीण नसतं, जर तुमच्या सोबतीला त्याचा हात असेल. भले, तो पुरुष असल्यामुळे त्याला कुठून तरी कुठे जाण्याचं दुःख कळणार नसतं. त्याला त्याचा उगम सोडावाच लागतो, मुळापासून दूर केलं जातं असं होत नाही. दोघांच्या मूळ सोडण्यात एक गोष्ट वेगळी असते. “इच्छा”!
त्याचा निर्णय तो घेतो. तिला मात्र मुक्काम न विचारता वाहवत जाव लागतं, नदी सारखं! पण जर सोबत आवडीची असेल आणि निवडीने केलेली असेल तर या प्रवाहात खरी मजा वाटू लागते.

लग्नाच्या प्रवासातून जाताना त्याच्या मनाचा प्रवास वैयक्तिक असतो, तितकाच तिचाही असतो.
त्याला जितकं कर्ता पुरुष व्हावं लागतं, तितकंच तिला कर्ती स्त्री व्हावं लागणार असतं!
त्याच्यावर तिच्या येण्याने निर्माण होणाऱ्या नव्या जबाबदाऱ्यांचं ओझं वाढत असतं. तिच्या मनात त्या घरात आधीच्या स्त्रियांनी निर्माण केलेल्या स्थानांचं ओझं डोक्यात थैमान घालत असतं.

कुठल्या पुनर्जन्मापेक्षा ही प्रोसेस वेगळी नसते. एखादा जन्म होतो तेव्हा जशी त्या घरात उलथापालथ होते, तशीच लग्न होतानाही होते. मी अजिबात लग्नानंतर घडणाऱ्या गोष्टींबद्दल बोलत नाही. कारण लग्न होण्याच्या काळात त्या दोघांच्या मनात काय चालू असतं याचा कुणी विचार करत नाही. लव्ह मॅरेज असेल तर सगळ्यांना वाटतं, हिच्या/ याच्या मर्जीने आहे त्यामुळे हे तर खुशच असणार… पण लग्न होण्याच्या काळात लव्ह मॅरेज असो वा अरेंज मॅरेज असो, ते दोघे खुश असतात पण त्यात फक्त निर्मळ आनंद नसतो. याचं कारण त्यांनी समाजात पाहिलेल्या लग्नाची अनेक उदाहरणं! ती उदाहरणं तितकीशी चांगली नसतात. त्यामुळे बिथरलेली अवस्था, चंचल मन, हजारो पूर्वग्रह, अनेक सूचना, लग्न टिकण्यासाठी देणाऱ्या अनेक शुभेच्छा, त्यात “लग्न झाल्यावर तुला कळेल” ही विनोद वजा भीतीदायक सूचना…

एवढं असूनही लग्न न झालेल्यांची अवस्था तशी खूपशी चांगली नसते. सगळीकडे समाजाचा मोठा रोल आहे. कारण आपल्या कुटुंबांसाठी समाज हा त्यांचा देव आहे. या देवाला त्यांना अनेक उत्तरे द्यावी लागतात, म्हणून देवासाठी अनेक बकर्यांचे जीव जात राहतात. या सगळ्यात आपलं कुटुंब बदल स्वीकारणारं असेल तर लग्न हा सुंदर सोहळा होतो.
त्या दोन जोडप्यांमध्ये असणारं प्रेम आणि त्यामुळे असलेली अंडरस्टँडिंग खूप वेगळी असते. लग्नानंतर त्या दोघांमध्ये कुटुंबसंस्था येते. कुटुंब त्यांच्यावर अनेक अनावश्यक गोष्टी लादत जातं. त्याने त्या दोघांच्यात दरी वाढू लागते. त्याला बायकोला जपायचं असतं, तसचं कुटुंबालाही जपायचं असतं. तिला मनोमन एकटं वाटू लागतं, तो त्याच्या कुटुंबाचीच बाजू घेतो म्हणून तिचं मन दुखावू लागतं. हळूहळू त्यांच्यातल प्रेम मागे पडून पूर्वीसारखं एकमेकांचं अटेंशन मिळावं एवढी एक इच्छा मनोमन दाटुन राहते. या काळात कुटुंब त्यांना मदत करतं, स्वतःचे अनुभव सांगून त्यांना शहाणं करत जातं. यातून तो कर्ता पुरुष होत जातो, ती घरातल्या बायांशी गट्टी करून कर्ती स्त्री बनू लागते. पण प्रेम… जिथून उगम झाला होता, तो उगम फक्त भूतकाळ म्हणून भूतलावर राहतो.
प्रेम अशी एकच गोष्ट ज्यात माणूस आहे त्या क्षणी जगतो. मग आठवणींचे सोहळे उरतात फक्त. ही त्याच क्षणी जगलेली गोष्ट माणसाला पुन्हा आयुष्यभर टिकावी वाटली तर त्या प्रेमाला अमरत्वाचं वरदान मिळतं. नाहीतर काही प्रेम लग्नानंतर आठवणींच्या चिंचपेटीत बंदिस्त होऊन जातात, कधीतरी हळवं होऊन आधार घ्यायला…!

प्रेमापासून दुरावा मिळायला नको, नाहीतर तुमचं नातं सामाजिक चौकटीतून बघायला परफेक्ट वाटू लागतं, पण मनातून त्या नात्याची वीण विस्कटलेली होत जाते. वैयक्तिक सुखावह नातं उरत नाही.
बऱ्याचदा समाजात दिसणारं नेटकं नातं हा दिखावा असतो, समाजासाठी. वैयक्तिक सुखात असलेल्यांसाठी प्रेमाची, नात्याची व्याख्या खूप वेगळी असते. ते स्वतःत इतके मग्न असतात की ते समाजाच्या परिमाणांचा विचारही करत नाही.

त्यामुळे खरी निवड आई किंवा बायको नसते. खरी निवड असते, समाज की नातं?
- पूजा ढेरिंगे
Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *