बाई म्हणून ती शंख, शिंपले गोळा करते. मातीत रेघोट्या ओढते. त्यांना घरी घेऊन झाडाच्या कुंड्यात टाकते, रेतीचा स्पर्श अनुभवते. त्या शंख शिंपल्यासारखंच ती नात्यातले बारकावे पाहते. तिथे होणारं सगळचं तिला माहित असतं. एव्हाना तोंडपाठ होऊ लागतं. त्यामुळेच त्याचं थोडंसं तुटक वागणं तिला दुसऱ्या क्षणाला कळतं. त्याला मात्र या बारकाव्यांची सवय नसते. कारण त्याआधी त्याच्या आयुष्यातल्या स्त्रिया म्हणजेच आई, बहीण यांनी ते न्याहाळण्याची त्याला सवय लावलेली नसते. मुलगा म्हणून जन्माला आल्याने त्याला मिळालेली विनघोषिय स्वातंत्र्याची मुभा त्याच्या सवयींत पण दिसून येते. त्यामुळे जे दिसतंय ते पाहत जाणं त्याला येतं शिवाय, व्यवहारातले बारकावे पाहणं त्याला जमतं. पण नात्यात तो जास्त गुंतून पडत नाही.
मात्र तो जेव्हा तिच्या संपर्कात येतो, त्याला तिच्या डोळ्यांपासून, भुवयांपर्यंत आणि केसांपासून लिपस्टिकपर्यंत सगळे बारकावे पाहायला आवडू लागतात. तसं पाहिलं तर हेही बाह्य बारकावे. मनातले बारकावे नाहीच. याउलट सुरुवातीला प्रेमात पडायला अडखळणारी ती आताशा त्याची बारीकशी हालचाल टिपत असते कळत नकळत, प्रेमाच्या भावनेतून. सुरुवातीला ती त्याच्या या बेशिस्त ढगळ वागण्यात गुंतून जाते. आवडून घेते. प्रेमात असल्यामुळे त्यालाही तिचं हे कळत नकळतच अटेन्शन मोहित करत राहतं. त्याला तिच्या पाहण्याने स्वतः च्या अस्तित्वाचा गंध सुखावू लागतो. पण हे सौंदर्याचे खेळ ओळखीचे होऊ लागता आणि सोबतीने आयुष्य घालवण्याची प्रहर येऊन ठेपते. तेव्हा बारीक बेशिस्त हालचाली त्रास देऊ लागतात. जेव्हा कपड्यांची घडी लागलीच घातली जात नाही, पैशांची कशीही उधळपट्टी केली जाऊ लागते, वस्तू हलकेच हाताळली जात नाही अशा आणि अनेक बारीकशा तक्रारी मनात अडकून राहू लागता. नकळत तिच्यासमोर तिच्या मैत्रिणींनी केलेल्या त्यांच्या जोडीदाराच्या तक्रारी आठवतात, ओला टॉवेल तसाच ठेवून जाणं, सॉक्स धुवायला न टाकणं या आणि इत्यादी.
ती या समस्त पुरुष वर्गाच्या वागण्याचा बारकाईने विचार करू लागते. मुलगा मुलगी भेदामुळे सासरी जावे लागेल, तिथे पालकांचे संस्कार निघू नाही म्हणून मुलीला शिस्तीने वाढवले जाते आणि मुलाला सासरी जावे लागत नाही म्हणून त्याला हवे तसे वागण्याची मुभा दिली जाते. हे चुकीचे आहे. मुलामुलीपेक्षाही आपली कामं आपण नेटके करण्याची सवय दोघानाही असावीच. कारण या अशा भेदामुळे मुलगा नकळत त्याची कामे इतरांसाठी वाढून ठेवतो हे त्याच्या लक्षातही येत नाही. मग ती कामे व्हावी यासाठी बायको या व्यक्तीकडे समाज हक्काने पाहू लागतो. त्यानंतर बायकोने वळण लावण्याचा प्रयत्न केला तर तो अमान्य करून ती कटकटी असल्याचे सुर लावले जातात. मग तिच्यावर फेमस नवरा-बायको विनोद बनवले जातात. तिला जन्मतः बारकावे पाहण्याची सवय लावली जाते हे सांगून की “स्वतःचा सोडून इतरांच्या मनाचा विचार कर” पण तिला मिळालेली ही शिकवण त्याला दिली तर आयुष्य दोन चाकांवर सुरळीत चालू लागेल.
-पूजा ढेरिंगे