पर्दों की बुनाई छूटती जा रहीं हैं,
उस कमरें में हूई मोहब्बत बूढ़ी हो रही हैं।
वो दोनों अभी भी साथ रहते होंगे ना?
उस मुकम्मल मोहब्बत का घर देखना हैं मुझे, अंदर से।

असं म्हणत मी कल्पना करू लागते, त्या पडद्याची ज्याने हे सुख पाहिलं असेल…
“उसकी लहराती उंगलियां उन पर्दों से गुजरती हैं,
मुझे उन्हें लिपटने का मन करता है।”
त्या पडद्यांच वाहवत जाणं इतकं सुखद असतं, ज्यात जिवंतपणा नि मखमली इश्काचा आभास व्हावा, तो होत रहावा म्हणत तो पडद्याला त्याच्या इश्काची निशाणी बनवत नेतो… पडद्यात इश्क सापडणं कित्ती बालिश आहे, पण त्याला छेडू नका तो त्याचा इश्क आहे.
पुढे तो त्याच्या शर्टाची इन करत तिच्याकडे बघतो तिथे, एकत्र भेटलेल्या त्या दिवशी ती त्या पडद्याला छेडत त्याच्यापासून लपण्याचा मोहक प्रयत्न करते. तिच्या केसांना स्पर्श करत केसांसारखे मोकळे पडदे एकमेकांत गुंतत जातात. तो दिलखेचक मेळ त्याच्या नजरेनं केवळ न्याहाळणे एवढं परमसुख त्याला कशात नसतं.
त्याच्या डोळ्यात तिचं स्वैर असणं असतं पण तिच्यासाठी
पडदा म्हणून तिच्या चेहऱ्यावर घेतलेला दुपट्टा, तिच्या छातीवर ओढलेली ओढणी आणि कमरेची कमनियता झाकण्यासाठी घातलेली ढगळ सलवार…
तिचा तिच्यावरच ताबा ठेवून वागणं, तिचं तिच्यातच बंधिस्त होऊन राहणं त्याला नापसंत किती…
त्याला पडदा आवडतो कारण, इश्काच्या घरात या त्याच्या विश्वासाने तिच्या बंधिस्तपणाचा पडदा खाली पडतो. ती समाजाचा पडदा दूर सारून सरसावत ओढते इश्काचा पडदा, तो स्वतःला इश्कात काबिल समजून जातो.
तो तिला पडद्यातून स्वतंत्र करतो, तिथे तो पडद्याच्या प्रेमात पडून इश्कात गिरक्या घेऊ लागतो, नि नकळत दोघांची चुकामूक होणार तितक्यात ते पडद्यातून एकमेकांत अडकतात, सुटण्याचा तो अट्टल प्रयत्न त्याला तिच्या नि तिला त्याच्या शारीरिक स्पर्शातून जवळ आणतात. तो शरिरापेक्षा मनाने सुखावत जातो, तो धागा इश्काचा सुटत जातो, नि सगळी बंधनं मुक्त होतात…
तिथे त्यांच्या आयुष्याच्या संसाराच्या पडद्याची वीण सुटू लागते, दोघांतला पडदा विरळ होत जातो नि पडद्याआड असलेला इश्क समोरासमोर येतो…
- पूजा ढेरिंगे