तू आता जगतोय, तो क्षण कसाय?
मनातल्या विचारांना त्यात न घेता, तू आता जिथे आहे तो क्षण कसा आहे?
विचारांचं झाकण बंद करून फक्त डोळे उघडे ठेवून बघ. जर फक्त एक झाड, पाणी, हवा, बेंच, माणसं, गाड्या, दुकानं, भाजीवाला, स्टॉल आणि तू एवढ्याच गोष्टी असतील तर हा क्षण कसा आहे?
या सगळ्या तशा कॉमन गोष्टी.
या गोष्टी खूप अर्थ लावाव्या अशा नाहीत, किंबहुना त्याला अर्थात पाडण्याची गरज नाही इतक्या त्या रोजच्या वापरातल्या आहे.
पण या सगळ्यांचा अर्थ बदलतो जेव्हा तिथे मन आणि विचार एन्ट्री घेतात.
ही एन्ट्री आपल्याला ठरवून देते, आपण कसं असायला हवे, राहायला हवे, समाज कसा विचार करेल, आपली स्वप्न, आपला आनंद कशात आहे, प्रेमातला कोणता पॅटर्न चांगलाच, तो माणूस वाईट कसा, समाधानी असणं म्हणजे काय, कोण कसा चांगला नाहीये, या जगातली आपली शेवटची इच्छा आणि
.
.
या जगात आपला स्पार्क काय आहे?
या स्पार्कलाच हायलाईट करणारा आणि आपल्यात उमेद पेरणारा हा पिक्सरचा ॲनिमेटेड मूव्ही आहे, “सोल; आत्मा”
नावाप्रमाणेच यात आत्म्याला पडणाऱ्या प्रश्नांचा आणि त्याला न मिळणाऱ्या मुक्तीचा विषय आहे. या संकल्पनेला चालत्या बोलत्या चित्रांत रूपांतरित करणं म्हणजे हॅट्स ऑफ, ज्याच्या डोक्यात ही कल्पना आली. या फिल्मची खासियत हीच आहे की तुम्हाला बिटविन द लाइन्स वाचायला जमायला हवे. म्हणजेच जेवढा दिसतोय, तेवढाच हा चित्रपट नाही.
चित्रपटाची कथा फोडून त्यातला स्पार्क पुसायचा नाही. पण बेसिक स्टोरी ही अशी की जो नावाचा जाझ गीतकार त्याच्या स्वप्न पूर्तीच्या एक पाऊल मागे असतो. ते स्वप्न त्याच रात्री पूर्ण होणार असतं आणि त्याचा मृत्यू होऊन तो ढगात जातो. मृत्यूनंतर काय? या प्रश्नावर अनेक वादविवाद आपण जन्माच्या कोणत्याही टप्प्यावर घालत असतो. पण ही फिल्म तयार करणाऱ्याची कल्पनाशक्ती इतकी ताकदीची की मृत्यू झाल्यानंतर वर ढगात चालणारी सिस्टीम आपल्या डोक्याला आठवडाभर पुरेल असा लॉजिकल कंटेंट देऊन जाते.
जो अचानक मृत्यूमुळे गडबडून जातो, त्याचं स्वप्न अपूर्ण राहील म्हणून त्याला हा मृत्यूच मान्य नसतो. त्याला पुन्हा पृथ्वीवर जाण्याची इच्छा असते… या उलट तिथे असणाऱ्या एका आत्म्याचा अजून जन्मही झालेला नसतो. ढगातल्या सिस्टीम नुसार जो तिचा गुरू होऊन तिला पृथ्वीवर पाठवणार असतो. पण त्या मुलीला पृथ्वीवर यायचे नसते आणि हा मारण्यासाठी तयार नसतो. त्यामुळे एकमेकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते मिळून मिळून काय काय खटाटोप करतात आणि या खटाटोपातून कशी त्यांची मतं बदलतात, ते बघणं भारी खुराक आहे.
त्यात हे ही अधोरेखित होते, माणूस हा जीव किती तळमळ करत असतो. कसा त्याचा जीव कशा कशात अडकत असतो, कसे फक्त आपणच बेस्ट ओळखण्यासाठी तो फिरत राहतो, जे त्याला वाटतं तेच त्याचं स्वप्न आणि या आयुष्याचं ध्येय आहे, या भ्रमात जगत असतो. कसं एक स्वप्न पूर्ण झालं की आता काहीच न म्हणता पुन्हा दुसऱ्या क्षणाला तो नवीन स्वप्नात गुंततो… पण या सगळ्यात त्याचं जगणं आणि त्याच्या आयुष्याचा अर्थ हरवून जातो. तेव्हा त्याला त्याच्या आयुष्याचा हेतू कळतो. या फिल्ममुळे आपण स्वतः बद्दल विचार करत असलो तरी आपण स्वार्थी होत नाही, ही या फिल्मची जादू आहे.
अशातच ती रात्र येते जेव्हा त्या माणसाची इच्छा पूर्ण होते. पण काय गंमत, तो खुश होत नाही! तेव्हा एक फेमस व्यक्ती त्याला गोष्ट सांगते,
एके दिवशी एक नवा मासा पोहत पोहत जुन्या माशाला भेटतो आणि विचारतो, “मी एक गोष्ट शोधतोय, ज्याला लोक समुद्र म्हणतात.”
जुना मासा म्हणतो, “समुद्र?”
तो म्हणतो, “तू आता समुद्रातच आहे.”
तेव्हा नवीन मासा म्हणतो, “हे तर पाणी आहे. मला समुद्र हवा आहे.”
या गोष्टी सारखच तर आपलंही होत असत. आपण आपल्या स्वप्नाला नाव देतो, स्वप्नाला आकारात बसावतो आणि फक्त तिथेच आनंद आहे, असं गृहीत धरत जातो. स्वप्नापेक्षा खरं महत्त्व आपण ज्या क्षणात असतो, तो प्रवास जगण्यात आहे. प्रवास खुल्या मनाने केला तर स्वप्न पूर्ण नाही झालं तरी आत्म्यात जीव अडकून राहत नाही.
या सगळ्यात ढगातल्या एका सिस्टीमचे मला विशेष कौतुक वाटतं. तिथे मेलेले, जन्म घेणारे आत्मे असतात. पण त्या सगळ्यात झोन मध्ये असलेले काही आत्मे असतात. हा झोन खरतर कल्पनाशक्तीच्या पल्याड नेणारा विचार आहे. या झोन मध्ये डिप्रेशन मध्ये गेलेले, या जगापासून तुटलेले, आत्मविश्वास गमावलेले, स्वतःचा स्पार्क न सापडल्यामुळे वेडे झालेले आणि समाजाच्या आणि मानवी व्यक्तिमत्त्वाच्या आखून दिलेल्या चौकटीमुळे न्यूनगंड निर्माण झालेले स्वतःच्या कोशात नष्ट होणारे आत्मे होते. जन्म आणि मृत्यू होणाऱ्या आत्म्यांचे ध्येय स्पष्ट आहे. खरी तारांबळ असते या लॉस्ट झोन मधल्यांना त्यांच्या शरीर आणि विचारांच्या बाहेर आणून पुन्हा स्वतःवर आणि जगावर विश्वास ठेवण्यास तयार करण्याची.
फक्त शेवटच नाही तर सुरुवातीपासूनच मूव्ही इतका अर्थपूर्ण आहे, ज्यामुळे एक मिनिटचा ब्रेक घेतला तरी लिंक तुटत जाते. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी एका मोठ्या गोष्टीत आहेत. एका सिटिंगमध्ये पूर्ण मूव्ही मनात साठवून घ्या. त्यातली एकुणएक ओळ या निगेटिव्ह काळात काही दिवसांसाठी सकारात्मकता देऊन जाईल. तेव्हा कळेल आयुष्य आपण काय काय सिद्ध करण्यासाठी व्यतीत करतो. आपण खरंच आपल्या आयुष्याला ओळखतो का?
रात्रीच्या वेळी डोळे बंद करून यावर विचार करायला हरकत नाही की ही खरंच फिल्म होती की माझ्या आयुष्याचा रियालिटी शो!