क्रिएटीव्ह-ब्रिएटीव्ह

मी: सगळंच करायचं राहून जातंय… एक दिवस सुटताना दुसरा धरून, वर्षभर पैशांच्या सुखात जाण्याची वाट पाहतोय. कुठेतरी का जगतोय हेच विसरलोय का आपण? जन्म मृत्यू, ओढाताण, मेहनत, समाज लग्न, सगळं माहिती आहे, या जगण्याचा शेवट माहिती आहे. मग तरी पैशाचं सुख लागतं, आयुष्याला सोपं करायला…


तो: “पैशाचं सुख ? काय बोलतेय पागल ?”
मी: “मग काय तर, काल काल पर्यंत अडकून होतास तुझ्या स्वप्नांमध्ये. आज तूही हरवलाय पैशांत.”


तो: “काय करू काय सांग ना? हे ब हे डोक्यात जाऊ नको. स्वप्न आणि नोकरी यावर आपलं हजारदा बोलणं झालयं. याला गत्यंतर नसतं. शिडी असतेच लहानपण, स्वप्न, तरुणपण, स्वप्नांचा मृत्यू, नोकरी, मोठेपण, वृद्धापकाळ !
ही तूही एक दिवस तेच करणारे त्यामुळे उगाच तुझी फिलॉसॉफीकल शीडी इथं नको वाजवू. माझं जे चाललंय ना त्यात सेट करण्याचा किमान प्रयत्न तरी करतोय. तुझं काय? काहीतरी लिहत वाचत बसते, दिवसभरात काहीतरी नवं सर्च करून अर्थ लावून उगाच डोक्याची कवटी चाळत बसते. हे क्रिएटिव्ह ब्रीएटिव्ह चुतियापाये. तुझी स्वप्न कॉलेजात होती तेवढं त्याचं आयुष्य बासे की? जे घडतंय ते सुखात मिळतंय ना तुला, तुला या वयात क्रिएटिव्ह करायला मिळतंय अजून काय कमीये तुला?

दोघेही शांत झालो.
बऱ्याच दिवसांनी भेट झाली होती. कारण प्रत्येकवेळी भेटायचं म्हटलं की माझ्या कारणांची सरबत्ती सुरू व्हायची. त्यामुळे यावेळी त्याचं चिडण स्वाभाविकच होतं. मी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत होते. पण साडेतीन वर्षांपासून आयटीमध्ये काम करत असणाऱ्या त्याच्या मनाला प्रॅक्टिकल जगाची हवा लागलीय, मी विसरले होते. मी त्याच मित्राची अपेक्षा केली होती, जो माझा मित्र झाला होता.
पण तरीही मी त्याच्या शब्दांची मजल बघत होते.
तो पुन्हा बोलू लागला, “ओहो! आत्ता लक्षात येतंय, या दिवसभराच्या रिकामटेकडेपणामुळे तुझ्या डोक्यात आलंय हे. त्यामुळे हे पैशाचं सुख अँड ऑल सुरू झालयं तर! पण तुलाही माहितीये, पैशांमागे धावताना स्वप्न तुटले अस कोणी बोलल की माझ्या डोक्यात तिडीक जाते.
तसंही, नेहमीच्या वुमन एम्पॉवरमेंटच्या जगात मुलगी आहे म्हणून तुम्हाला नोकरीपासून नोकरीसंदर्भात अनेक गोष्टींची लिबर्टी मिळते. शिवाय लग्न करायचं म्हणून जोडीदाराची जबाबदारी घेण्याचं ओझं पेलण्यासाठी आर्थिक परिस्थिती जुळवून सगळं सोपं मुलींना नाहीच करावं लागत. त्यामुळे तू जरा चील कर!”
तो वेगळाच झाला होता. कधी काळी स्त्रियांच्या सबलीकरणाच्या मोलाच्या गोष्टी हाच मनुष्य करायचा का?  मला प्रश्न पडत होता. माझा आता संयम सुटला होता. त्याच्या विचारांनी आमच्यातल्या मैत्रीच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. त्यामुळे मीही म्हटलं,
“आर यू फॉर रियल? आय मीन हे तू बोलतोय?”
मला सगळं सगळं मान्यये. पण लक्षात ठेव, एक दिवस क्रिएटिव्ह ब्रीएटिव्ह लोकांचाही येतो, माझाही येईल. जिला तिचं ऑफिस असेल नोकरीसारखं तुला वाटतं तसं काम असेल. इकडे क्रिएटिव्ह असल्यामुळे चार तास तुझ्याहून जास्तच असतील (मुलगी असूनही इथे मी ती लिबर्टीघेणार नाही) कधी कधी तर मीच इतकी गढून जाईल की चोवीस तास मी त्यातच डोकं खुपसून बसेल. पण या सगळ्यात तुमचे पूर्वग्रह टोमणे सुरू होतील, तुम्ही म्हणणार, ते क्रिएटिव्हचं एक सोप्प असतं, मनमर्जीचं काम असतं, कसही करा. त्यामुळे तिथे खर्ची जाणारा वेळ हा माझ्या आवडीचा असेल हेच तुला काय जगालाही वाटेल. पण रोज तेच ते करून खरंच क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह अॅज सच तळाशी उरतं? सगळा मेंदू खाजवत बसायचा, त्यातून येणाऱ्या विचाराला मांडायच, तेही दुनियेला म्हणजे तुझ्यासारख्या ऑडीएन्सला. ज्याला क्रिएटिव्हचा एवढा तिरस्कार! पण तेव्हाच्या पॉईंटला जी मेहनत असते त्यात एकतर जगण्यावर मात करून क्रिएटिव्ह जगायचं असतं नाहीतर हरून दुनियेच्या स्पर्धेत अपंग होऊन जायचं असतं. 
हा आमचा क्रिएटिव्ह लोकांचा पॉइंट ना आम्हाला बाहेर नाही सांगता येत. खूप पर्सनल होऊन जातं आणि पर्सनल झालं की कामाला दुय्यम स्थान येतं. त्यामुळे क्रिएटिव्ह ब्रिएटीव्ह लोकही काम करतात. आर्टिस्ट असतात, मनाचं करतात. पण विचार कर बा कोणाच्या हातात आयुष्य न देता स्वतःच नियंत्रण ठेऊन क्रिएटिव्ह लोकं स्वतःचं आयुष्य लीड करता, जगवता, शिवाय त्यातून मिळणाऱ्या मोबादल्याची गॅरंटी नसते. एवढी मोठी रिस्क कोणता मूर्ख घेईल? आणि तरीही फिलॉसॉफीच्या शिड्या वाजवून असच दुनियेच्या नजरेत नवा आयुष्याचा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करता. क्रिएटिव्ह ब्रीएटिव्ह म्हणत म्हणत डोकं रिलॅक्स करण्यासाठी तुम्हालाही हेच क्रिएटिव्ह लोकं आठवतात ना? त्यामुळे एकतर स्वतःचं आयुष्य जर खरंच इतकं प्लॅन्ड असेल तर नको क्रिएटिव्हच्या फंद्यात पडू. अजिबात कुठली फिल्म नाही, ना पुस्तक ना डायरी ना चित्र बघूस. सगळं तुझं आहे पण ते दाखवण्याची क्षमता आम्ही ठेवतो. स्वतः भोवती दिसणारा जिवंतपणा हा क्रिएटिव्ह लोकांनी दिलेला ठेवा आहे. त्यांनी त्यांची पैशांची संपत्ती, लग्नाचं ओझं आणि मोह सोडून हे स्वीकारलंय. त्यामुळे ठीके, जबाबदारीमुळे पैशासाठी काम करावं लागतं. पण त्या वास्तविक बोलण्याने आमची किंमत कमी नको करू.
एक बोलू, जगण्यासाठी पैसा महत्त्वाचा, पण आयुष्यावर प्रेम करण्यासाठी स्वप्न महत्त्वाची. !

तू थिअरी खाजवली, मी डोकं खाजवलय. रोज माझ्यातला मी किती वापरला जातो माझं मला माहितीये. माझ्यासाठी कॉम्प्युटर काम करू शकत नाही जोवर मी स्वतःसाठी काम करू शकत नाहीये. दोघांची काम तितक्याच मेहनतीची पण मी मर्जीने करतो म्हणून त्याचं कवडीमोल करावं अशी मानसिकता वाढवणं चुकीचं आहे…. मी इथे अक्षरशः फुलस्टॉप दिला…

अग, हो बाई! आता काय रडवणार आहेस? आयुष्याची भडास निघाली की आता! हो, शांत हो! अरे हम हैं ना, थोडं ट्रॅकवरून निसटलो होतो. तुम्ही क्रिएटिव्ह लोकं आणताच ना ट्रॅकवर… ओरडुन, चिडून, कॅनव्हास वर रेखाटून, गाऊन, नाचून, लिहून, रडून, हसून, कळवळून सगळे भाव समर्पित करून पूर्ण करता त्या ताज्या नवजात भावनेला!

-पूजा ढेरिंगे

Please follow and like us:
error

1 thought on “क्रिएटीव्ह-ब्रिएटीव्ह”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *