पावसाने एक गंध अत्तरात माळला, थेंब थेंब झिरपत मोगरा तिथे जन्मला… किती जोडले संसार, किती झाल्या दाराआड छुप्या शृंगारिक बैठका… किती जोडप्यांच्या प्रेमाची सांधली ती विण… न बोलता गंध पसरवत जातो, तो मोगरा ‘प्रेम’ ठेवून गेला…
गर्दीच्या रस्त्यावरून चालताना न मागता गहिरा सुवास चाफेकळी नाकाला स्पर्शून गेला. मनाच्या हरेक कानाकोपऱ्याला निस्वार्थ ताजं करून निखळ सुखवून गेला. तरीही तो पुरून उरला नि ‘पैसा क्या चीज’ म्हणत माझा हात पाकिटात गेला आणि मोगरेवाल्याकडून तो लाखमोलाचा सुगंध विकत घेतला.
तो सुगंध मी कोणाला देणार होते? हे तेव्हा माझ्या मनालाही माहिती नव्हतं. कदाचित आईला नाहीतर देऊ शकते प्रियकरालाही… ? का प्रियकराला मोगरा दिला जात नाही? सहज प्रश्न पडला. तो केसात माळू शकला नाही तरी त्याला या सुगंधापासून समाजाने का वंचित ठेवावं?
मी कुणाकडून तरी शिकले होते, आपल्याकडचा मोगरा वाटता यायला हवा… ! काही क्षण भन्नाट विकत मिळतात, मनाला त्याची पारख हवी! मनाला मी आज ते अत्त्तर देण्यास समर्थ ठरले होते.
मला प्रश्न पडतो या फोटोतल्या म्हाताऱ्याला माहीती तरी आहे का, कुठे जातोय त्याचा मोगरा?
जातोय नैतिक प्रेमाकडे, कायदेशीर बायकोकडे, की मग…? सगळ्या जगाला चापट मारत त्याचं आकर्षण आणि सुख मिळणाऱ्या बाईच्या केसांत?
मला तरी वाटतं त्याने इतरांच्या रोमान्समध्ये डोकावणं बंदच केलं असणारे. ज्याला पोटाचा प्रश्न पडतो त्याला समाजातल्या काय चूक काय बरोबर, नैतिक अनैतिक संबंधांशी काडीचा संबंध नसतो.
म्हाताऱ्याला मोगऱ्याचा गंध येतो का? की त्याच्या लेखी त्यातून मिळणाऱ्या पैशाला जास्त सुगंध असतो?
त्याला मोगऱ्याचा स्पर्श अल्लड प्रेमाच्या आठवणीत नेतो की पैशातून खरेदी न केलेली स्वप्न जास्त छळतात?
पोट जगू देत नाही, स्वप्नात पण सुख असतं हे अनुभवायला रोज पोट भरेल ही शाश्वती लागते. पोट कुणाला विकता येत नाही. मग सुगंध विकावा लागतो. कुणाला तरी प्रेम वाटलं जातं हे आणि काय कमी आहे का?
-पूजा ढेरिंगे