अन् शेवटी मैफल रंगते एका अनपेक्षित संध्याकाळी. गर्दी जमते खचाखच. त्या मैफलीत सगळे लोकं घेऊन येतात त्यांच्या कहाण्या, लवचिक-पर्सनल कहाण्या! तिथे लोक आपल्या माणसांवर गप्पा मारू लागतात. आधी कुजबुज करतात. मग आजुबाजूच्यांचं ऐकतात.
पण त्यातला एकजण मोठयाने बोलू लागतो.
“कदर नसली की माणसं हळूहळू निसटून जातात, मनातून!” त्याच्या या वाक्याला अनेकजण दुजोरा देतात. टाळ्या पडतात. तो बोलायचं थांबत नाही. मनातली सगळी घुसमट बाहेर काढू लागतो. अतिशय कटू बोलत होता तो. पण जमलेले सगळे निशब्द ऐकत होते.
तो म्हणाला, आपल्याच माणसाला कदर नसते. आपल्या प्रेमाची, आपल्या काळजीची, आपल्या दुःखाची, आपल्या शांततेची!
यावर सगळे कुत्सित हसतात. तो बोलत राहतो,
‘आपला’ या जिव्हाळ्याखाली आपण गेले प्रत्येकवेळी त्यांना समजून घेत जातो. बऱ्याचदा तुटतो, पण आपलाच आहे म्हणून सांधून घेण्याचा प्रयत्न करत राहतो. एक नातं एका बाजूने प्रयत्न करत राहतं तेव्हा त्याची कमाल मर्यादा संपते. संयम तुटतो, आशा मावळतात, अपेक्षा संपतात, ‘आपलं’ या हिरव्या पानावरचा विश्वास उडून जातो. पतझडीचा ऋतू सुरू होऊ लागतो. मन रुक्ष वाटायला लागतं. शरीराला पुन्हा त्याची ओढ लागत नाही. अपेक्षांना आपल्या माणसाचं वागणं अपेक्षित होऊ लागतं. आता पूर्वीसारखी त्याच्याशी कुठलीच तार जुळत नाही.
एक कोवळा क्षण तोही येतोच आणि आपला म्हणून सांभाळला, जपला गेलेला तो माणूस आपणच मनातून परका करून टाकतो. त्याच्याशी भावनेतले सगळे नाते तोडून टाकतो. इतके कठोर आपणही होतोच. “
एका श्वासात तो हे वाक्य बोलून आवंढा गिळतो. लोकं अक्षरशः डोळे पुसू लागतात. काही फक्त मिटून घेतात.
सुरुवातीला विनोदात खळखळून हसणारी ही गर्दी सुरुवातीला आपल्या माणसांबद्दल भरभरून बोलण्याचे मुखवटे घालून आली होती. आता दर्दी बनू लागले होते. या सगळ्यात सुरुवातीपासून खरा बनून आलेला जो असतो तो बोलत राहतो. कारण त्याच्या हसण्याचा कडेलोट झालेला असतो. त्यामुळे तो बोलू लागतो, मनाला येईल ते. खूप खूप आत साचलेलं. ते पाहून एक दोन म्हणता म्हणता प्रत्येक व्यक्तीची त्याला दाद मिळत जाते.
तो कंटिन्यू करतो, आपला माणूस कृतघ्न वागत जातो, त्याच्याशी कितीही जोडण्याचा प्रयत्न केला, तो तोडत जातो आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचं वर्तुळ समान होतं. सगळे होकारार्थी माना डोलवतात. टाळ्यापेक्षा लोकांचे चेहरे बोलू लागतात. समदुखी म्हणून ती मैफल अजून रंगत आणते. मैफल सकारात्मक होऊ लागते. घुसमट बाहेर पडते आणि शेवटी सगळेच एकमतावर येतात,
म्हणतात,
जिसने हमारा फायदा उठाया वो हमसे क्या लेकर गया? वक्त के सिवा?
वो हमे जिंदगी का सबक देकर गया।
आणि सतत बोलणारा तो एक माणूस शेवटी एक वाक्य बोलून शांत होतो,
“माणसांची जाण असणारा माणूस समाधानीच असतो.”