स्पर्शाची भूक असते माणसाला… मग तो स्पर्श तिचा असो अथवा त्याचा… जिव्हाळा शोधायला स्पर्श मानवायला हवा… मला स्पर्श सेलिब्रेट करायला आवडतो.
हो, प्रत्येकाला नाही जमत तो. अशी त्याची वीण मोकळी सोडावी लागते. नातं घट्ट असलं की वीण सैल सुटते. स्पर्शाचं परिसासारख असतं. ज्याला करतोय, त्याचं सोनं व्हावं अथवा ज्याने आपल्याला केला त्याच्यामुळे आपलं सोनं व्हावं… त्यामुळे स्पर्श हा एका सेकंदाचा खेळ नाही. स्पर्श दोरीसारखा असतो, धागा धागा जुळत जाऊन ही स्पर्शाची वीण एकमेकांना जवळ आणते. त्याने थोडं पुढे यावं, तिने थोडं त्याच्याकडे झुकावं… त्याने हळूच पाण्याचे थेंब फेकावे तिने अलगद झेलण्यासाठी थांबावं… हा प्रवास असतो, प्रेम उगवल्यापासून प्रेम डोईवर येईपर्यंतचा… अन् श्वासांच्या शेवटच्या घटकेला प्रेमाचा अस्त होताना नव्या प्रेमाची सकाळ सोबत घेऊन येणारा…
पण काही स्पर्श शरीराचा गळा घोटतात.
हो, काहींना स्पर्श फक्त शरीराशी जोडता येतो… स्पर्श काय असतो याचा तिळमात्र फरक त्यांना पडत नसतो. त्यांना फक्त गुप्तलींग आणि त्यांची भूक दिसत असते. एका माणसाने जर स्पर्शासाठी कुणाच्या तरी मनाविरुध्द, मजबुरिने आणि शरीर हुरुहुर करतंय म्हणून कोणाच्या अंगाला हात लावायला हात पुढे केलाच तर समजायचं त्याच्या हातून लाखो जीव नासवले जाणार. स्पर्श सुरेख असेल जर तो मर्जीने, पण स्पर्श हवस असेल जर त्यात तो ओरबडायचा वास असेल. त्याच्या सोबतही असच काहीस झालं. त्याचं वय तेरा चौदा वर्ष. त्याला आईने विचारलं आज शाळेत काय शिकवलं, तेव्हा त्याने त्याच खुफिया पद्धतीने सांगितले, “आमच्या शाळेत आज फक्त गर्ल्ससाठी एक ‘सिक्रेट’ वर्ग घेतला.” “असं का रे?” आईने अंदाज लावण्याचा प्रयत्न केला. तिला वाटले, मुलींच्या मासिक पाळीच्या समस्यांसाठी घेतला असेल. तो म्हणाला, मला काय माहीत, सिक्रेट आहे तर ते कसं सांगणार?”मग आईने पालकांच्या व्हॉट्सप गृपवर विचारलं तेव्हा लक्षात आलं, तो सिक्रेट वर्ग म्हणजे योग्य स्पर्श आणि अयोग्य स्पर्श या संदर्भात होता. पण हा वर्ग केवळ मुलींनाच का?
स्पर्श… मी विचार करत होते नेमकं काय असतो स्पर्श?स्पर्श प्रेमाचा ? की मग स्पर्श मिळावा म्हणून तडफडणारा वासनेचा स्पर्श? वाईट स्पर्श, चांगला स्पर्श…
एकदा मी त्यालाच विचारलं, राहुल्याला. पण त्याने स्पर्श, हा शब्द ऐकला. थोडा शांतच झाला बोलताना. माझा मित्र आहे तो, पण त्याला मी अजुनही त्याची मैत्रीण वाटत नाही. जर वाटत असते तर त्याने मला मी विचारल्यावर सांगितलं असतं ना, स्पर्श म्हणजे काय ते? पण तो तिथून निघून गेला, याचा अर्थ काय? हा प्रश्न प्रायव्हेट नव्हता. पण त्याच्यासाठी खूप हदरवणारा होता. त्याचं आयुष्य स्पर्शाच्या तलवारीवर चालावं तसं आहे.त्याने दुसऱ्या दिवशी भेटून मला सांगितलं, गुप्तांग नावाचा अवयव बंड करून उठतो, त्याला स्पर्श म्हणतात. माझ्यासाठी आयुष्यात युद्ध तेच! त्याच्या अशा ज्वलंत शब्दांनी मी थोडी बिथरले. पण मला कल्पना येत नव्हती. राहुल्याने त्याचा लहानपणीचा किस्सा सांगायला सुरुवात केली. तो गावी राहायचा. त्याची आई आणि तो एवढंच छोटस विश्व असल्यामुळे तो खूप बोलका आणि मुक्त होता. मुलगा असल्यामुळे मुलींसारखी बंधनं नव्हती. तो त्याच्या मुक्त असण्याला बिनधास्त जगायचा. आपल्याला वाटत असतं आपल्याला कोणी बघत नाही, पण त्याला नेहमी त्याचे घर मालक बघत असायचे. त्याला मजा वाटायची. लहान मुलांना अटेंशन दिले की ते अधिक खुलतात. तो खूप खळखळून हसायचा, त्याच्या मुक्त वावरण्याने जोही व्यक्ती त्याला भेटायचा म्हणायचा, “मोठा होऊन तू लाखोंच्या दिलावर राज्य करशील. तुझं असच न अढी ठेवता जगणं लोकांना तुझ्याकडे आकर्षित करेल.” हे ऐकुन त्याची आई कमालीची खुश व्हायची. एका आईला याहून अधिक ते काय हव असतं? मुलाचं हसणं म्हणजे आईचं सुख असतं. ती ते ऐकुन आठवून स्वतःच्या संगोपणावर आनंदी व्हायची. पण घर मालक हे बघत राहायचा. राहुल्याला नुसतं पाहून तो चाळीशीतला घर मालक त्याच्या कमरेखाली हात लावायचा. खाज आल्यासारखं खाजवत राहायचा. मित्राला कळायचं नाही. मित्र तिथून निघून जायचा. हे रोज व्हायचं… पण त्या दिवशी… उन्हाळ्याचे दिवस होते. रखरखत्या उन्हात त्या दिवशी आई कामाला गेली म्हणून घराची किल्ली हरवल्यामुळे तो घर मालकाच्या घरात बसला. तो चाळीशीतला घर मालक, त्याची बायको, एक मुलगा अस त्याचं कुटुंब होतं. घर मालक त्याचा पाहुणचार मोठ्या उत्साहात करत होता… त्याचा उत्साह पाहून बायकोला भरून आलं…. कारण संसार म्हणून त्यांच्या आयुष्यात आता वेगळं काही राहील नव्हतं. ती दोघे सोबत राहून कर्तव्य पार पाडत होते. पण नवऱ्याला खुश पाहून तिला बर वाटलं होतं. ती सुद्धा मोठ्या खुशीने त्याचं सगळं करत होती. कारण एवढे दिवस भाडेकरू असून त्याच्या आईने अन् त्याने कधी कुणाकडे हात पसरले नव्हते. ना कुणाकडे राहिले होते. असे स्वाभिमानी कुणी पहिल्यांदा आपल्या घरी आलं की त्यांचा पाहुणचार करण्यात सुख वाटतं. त्या घर मालकाचा मुलगा अर्थात खुश होता. दोघांनी खूप गप्पा मारल्या. बायकोने जेवायला दिलं.
पण घर मालक… तो मात्र त्याला न्याहळण्यात व्यस्त होता. त्याचं तसं बघणं राहुल्याला कसतरी वाटत होतं. त्याला तेव्हा एवढं काय कळत नव्हतं. पण त्याच खळखळून हसणं वाढत होतं. त्याला नव्या ठिकाणी मौज वाटत होती. गप्पा मारता मारता विषय निघाला आणि घर मालकाचा मुलगा म्हणाला “आमच्या अडगळीच्या खोलीत जुन्या वस्तू आहे, तुला इतिहासाची आवड आहे, चल मी दाखवतो तुला.” मुलगा आनंदला. त्याच्या हसण्याला पारावर राहिला नाही… आपल्या आवडीचं काही मिळालं की आपण त्याच्या बदल्यात काही देऊ करतो… आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेत नाही. जो देतो तो देव वाटतो. पण तसही देवाचं रूप घेतलेल्यात राक्षस बघण्याचं राहुल्याच वय नव्हतं. राहूल्याला घर मालक अन् त्याचा मुलगा देव वाटले. तो मागच्या परसात गेला, अडगळीची खोली. त्या दोघांनी मिळून जुन्या वस्तू शोधायला सुरुवात केली. त्यांच्यावर देखरेखीसाठी वडीलधाऱ्या माणसाने असावं म्हणून घर मालक आला. तो त्यांच्या हालचालींना बघत राहिला, स्कॅन करत राहिला, एकेक अवयवाची दखल घेत राहिला. संपूर्ण खोलीत काळोख होता, काळोखाचा मागोसा घेत मालकाने त्यांच्या मागे चोर पावलांनी जाऊन दोन्ही हातांनी दोघा पोरांना उचलून मांडीवर बसवले. तेव्हा त्याचं गुप्तांग ताठरलं. तो आतून खळखळून आनंदला. तो त्याच्या पोराला एका मांडीवर अन् शेजारणीच्या पोराला दुसऱ्या मांडीवर हलवत राहिला. त्याचं गुप्तांग तडफडू लागलं. त्याच्या श्वासांना राक्षसी वास येऊ लागला. त्याने त्या दोन्ही मुलांचे हात घेऊन त्याच्या गुप्तांगाला लावले. त्या दोघांना यातलं काही समजत नव्हतं, ते एकमेकांकडे पाहू लागले. तो त्यांना समोर माना ठेवायला सांगू लागला. दोन्ही मुलांना डोळे झाकून घ्यायला लावले. त्याचं ते ताठरलेले अवयव त्यांच्या तोंडात देताना त्याला हिडीस आनंद व्हायला लागला. त्या अजाण पोरांना कसलाच मागमूस लागत नव्हता. राहुल्याला उलटी आली, त्याला काठीने मारून त्याच्या तोंडाला जबरदस्तीने त्या गुप्तांगाचा स्पर्श करून तो आत्मिक विकृत, घाणेरडा आनंद लुटत राहिला. त्याच्या स्वतःचा पोरगा ओरडला नाही, रडला नाही. तो राहुल्याकडे बघत राहिला, जणू त्याच्यासाठी हे रोजच झालंय… शेवटी त्याची भूक भागल्यावर त्याने राहुल्याला सोडून दिलं. राहुल्याने झाली गोष्ट आईला सांगून ते गाव सोडलं. पण गाव सोडूनही राहूल्या पूर्वीसारखा कधीच झाला नाही. आजही तो एकटा एकटक काहीतरी विचार करत राहतो. एकदा तर त्याचं लक्ष नाही म्हणून मी हात लावला, तर तो दचकून गेला. त्याचं ते दचकन मी नॉर्मल म्हणून इग्नोर केलं. मला त्याचं तसं व्यक्त होणं आता कळत होतं. त्याला स्पर्शाशी नफरत झाली होती. त्यामुळे तो फक्त शांत बसतो, ना मुलींना बघतो ना मुलांना. पुरुषाच्या आयुष्यात एक जुना घाव गहिरा असतोच, जो त्यांच्या आयुष्याएवढाच कठोर अन् अबोल असतो…खळखळून हसणं त्याला जमत नाही, तो एकटक निसर्गाच्या हालचाली बघत राहतो. त्याची नि माझी ओळख अशाच निसर्गाच्या सानिध्यात झाली.
त्या दिवशी त्याच्या आयुष्याच्या काप्प्यातल एवढं भयानक राक्षसी सत्य बोलून तो खाली डोकं घालून स्वतःला दोषी ठरवू लागला. तो माझ्याशी नजर मिळवायला घाबरु लागला. का? कारण तो पुरुष होता. पुरुष म्हणून तो कठोर असायला हवा, हे बिन बुडाच स्टेटमेंट त्याला धड रडूही देत नव्हतं. तेव्हा माझ्या लक्षात आलं. आपल्या इथे जो अन्यायाचा पीडित आहे, त्यालाच गुन्हेगार घोषित केलं जातं. तशी वागणूक दिली जाते. त्याला त्या दिवशी ज्या मैत्रीच्या सुरक्षित हक्काने मिठी मारली, त्याने तेव्हा मला दूर लोटलं नाही. त्याने जेव्हा त्या मिठीला प्रत्युत्तर म्हणून अश्रूंनी भरलेली मिठी मारली तेव्हा त्याच्या स्पर्शात मला मैत्रितल्या विश्वासाची जाण आणि त्याला सुरक्षित स्पर्शाची ऊब जाणवली. या अशा घटनांमध्ये घर मालकाची जेवढी चूक तेवढीच समाजाची चूक.
घर मालकाला पुरुषाचं आकर्षण होतं… त्याच्या लैंगिकतेनुसार त्याला पुरुषाशी लग्न करायचे होते. पण समाजाने बहुमताने सगळे पुरुष स्त्रीशी लग्न करता, या विचाराने त्याच्या पालकांनी त्याच लग्न स्त्रीशी लावून दिलं. मी वरती म्हटलं तसं, एका व्यक्तीची हवस कित्येक पिढ्या नासवते. घर मालकाच्या लैंगिक पसंतीला समाजात स्थान नसल्यामुळे त्याच्या बायकोचं आयुष्य, घरातल्या मुलाचं आयुष्य, शेजारणीच्या पोराचं आयुष्य आणि केवळ लैंगिक सुखासाठी अशा कित्येक मुलांच्या गुप्तांगाला त्याने स्पर्श केल्यामुळे खराब झाले आहे..या घटनेत एकतर त्याची लैंगिकता स्वीकारण्यासाठी समाजाने त्याची लैंगिक निवड स्वीकारणं गरजेचं. दुसरं म्हणजे आपल्या अपत्याला, मुलगी असो वा मुलगा, त्याला हे स्पर्श नीट समजावून सांगा. यातला फरक लहान वयात सांगणं आताच्या घडीला काळाची गरज आहे. कारण आपल्या समाजात मुलीला आणि स्त्रीला स्पर्श होतो तो स्पर्श वाईट असतो हे सांगितलं जातं. पण मुलांचं काय? स्पर्शासाठी विश्वास महत्वाचा. स्पर्शाला भाषा नसते समज असते. त्यामुळे लहान वयात आपल्या अपत्याला विश्वासात घेऊन समज द्या. त्यांचा राहुल्या होण्यापासून वाचवा, नाहीतर खळखळत हसणारा तुमचा मुलगा उद्या तुमच्याशी अबोल होईल. आयुष्यावरचा विश्वास त्याच्या आजूबाजूच्या माणसामुळे कायम असतो. निस्वार्थी स्पर्शातून ओरबडणाऱ्या स्पर्शाची व्याख्या समजवा.
काय बोलावे काही समजेना.. अप्रतिमच लिखाण..