शाळेतल्या बहुतेकांची एव्हाना लग्न झालीत. माझ्या एवढीच होती वयाने, पण परिस्थितीने याहीवेळी खूपशा जीवांना हतबल करून निर्णय घ्यायला भाग पाडलं. प्रत्येक लग्नाचा सिजन हा लहानग्या वयाला मोठं स्वप्न चिरडण्याचा शाप घेऊन येतो, नि त्यात शाळेत जाणाऱ्या कित्येक निष्पापांना जिवंत जाळतो, स्वप्नांसहित…
ते कोवळे बारा पंधरा वर्षाचे जीव, इतक्या निरागस जीवांवर कुठल्यातरी अनामिक आपल्या नसलेल्या ओझ्याचं आभाळ सांभाळायची जबाबदारी टाकली जाते. किती सहजपणे आयुष्याचा काळवंडलेला प्रवास आपुलकीने म्हणत घरचे या लहानग्यांवर टाकतात.
आजही सोबतीला असलेल्या आठवणींमध्ये हे नंदनवन सदाबहार आहे. त्या दोन वेण्या, गणवेश, मधल्या सुट्टीचा डबा, पहिला नंबर मिळवायची स्पर्धा, भांडण, रागावणं, चिडणं, रुसणं, कट्टी घेणं, मॉनिटर बनून आक्ख्या वर्गावर राज्य करणं.
ग्रूप,मैत्रिणी म्हणत दोन चार नाही पूर्ण वर्गच एक ग्रुप असायचा, एक वेगळी मजा होती… आणि सगळ्यात इंट्रेस्टिंग म्हणजे पीटीच्या तासाची पार जीव तोडून वाट बघणं आणि तोच तास जर एखाद्या आगाऊ मॅडमनी घेतला तर तितक्याच जीव तोडून शिव्या देणं आणि मग या सगळ्यात मोठं होऊन कोणीतरी बनण्याचं बेभरवशाच स्वप्न पाहणं. तेव्हा जो तो इन्स्पेक्शनला म्हणून येऊन एकच प्रश्न विचारायचा “तुम्हाला मोठं होऊन काय बनायचंय? …” तसा सगळा वर्ग डॉक्टर इंजिनियरच्या वर्गात जाऊन बसायचा आणि मी माझ्या शेजारच्याने नंबरवारी डॉक्टर सांगितलं, मग त्याचं न माझं सारखं नको व्हायला, म्हणून इंजिनियर सांगून मोकळी व्हायचे… त्यात मग “माझा आवडता विषय” निबंध आला रे आला की चांगले मार्क मिळावे, म्हणून की काय पण त्या शिक्षकाला त्याच्याच विषयाची गोडी सांगून रिश्वत सूपुर्द करायचो…आणि असं करत करत कधी एकदाचं मोठे होऊन कॉलेजची लाईफ जगू त्याच्या हव्यासात सेंडऑफची, वाट पहायचो…. कित्ति बिनडोकपणे ‘शाळा सोडल्यावर मी कॉलेजात जाणार मोठी होणार वगैरे गोष्टी करायचो ….’ पण आता तो शाळेतला वावर, तो सगळ्यांशी निस्वार्थ असलेला अनोळखी संवाद पण केवढा जीव लावणारा होता जाणवतंय. शाळा सुटली ती आयुष्यभरासाठी आज नाही म्हणत म्हणत एकमेकांशी कधी कॉन्टॅक्ट तुटला कळलही नाही.
आज ‘तिच्या’ लग्नाबद्दल ऐकून सुन्न झाल्यासारख वाटतंय, तिच्याच आयुष्यासारखं. घट्ट मैत्री होती आमची, होय, ‘होती’च.
कारण शाळेनंतर ना माझी तिच्याशी भेट झाली ना आम्ही एका शहरात राहिलो. शाळेच्या नाळेसारखी आमची एकमेकींशी असलेली नाळही तुटत गेली.
पण म्हणजे जेव्हा मी दुसऱ्या शहरात गेले ते शिक्षणासाठी. पण तिने शाळेचं शहर सोडलं कारण तिला सासरचं शहर स्वीकारावं लागलं. हे सगळं ऐकताना मला अचानक सेंड ऑफच्या दिवशी ती म्हणाली त्याची आठवण झाली, सेंड ऑफच्या धांगडधिंगामध्ये ती अलगद म्हटली होती, मला ना शिक्षिका व्हायचंय, आता इथून बाहेर पडून मन लाऊन शिकणारे…
पण मला कुठे माहिती होतं, माझं मन जेव्हा कॉलेजच्या कट्टावर होतं, तेव्हा तिचं मन “लग्न की शिक्षण.? आई, वडील की स्वतः? ” या दुहेरित अडकलं होतं.
जेव्हा मी स्कूटी नाही म्हणून रडत होते, तेव्हा ती अग्निला साक्षी मानून कोणातरी अनोळखीला अक्ख्या आयुष्यभर साथ देईन अशा तकलादू आणाभाका देत होती.
जेव्हा मी पुस्तकांना कंटाळून मित्रांसोबत गप्पा मारत होते, तेव्हा ती उंबरठ्यावर नजर खिळवून पदराची श्वास कोंडवणारी बंधने घेऊन उपाशीपोटी तिच्या ‘अहो’ची वाट पाहत होती.
एकीकडे माझा हात लेखनीच्या शाईने माखला होता, तेव्हा तिचा कमकुवत हात सौभाग्याच्या लाल करांड्यात अडकला होता. गुदमरून एखाद्यावेळी रडूनही मोकळी होत होती तरी तेवढ्या करांड्यापुरतं ते राहायचं नि बंदिस्त व्हायचं!
आज माझ्या वाढदिवशी मी रडत होते. काय तर म्हणे, नवा ड्रेस घेतला नाही म्हणून ,पण तेव्हा ती बिचारी कुणीतरी येऊन तिची विचारपूस करून प्रेमाच्या शुभेच्छा देईल या भरवशावर डोळे ठेवून होती.
तेव्हा एकत्र मिळून डबा खायचो, रागवायचो, भांडायचो, खेळायचो, चिडायचो पण कधी एकटे नाही पडलो. पण आज तिचा वाढदिवस मनातच साजरा करुन ‘जेवण अवरासावर करत तिचा एकटेपणा धुनी-भांडी करत मनातच वाटून घेत होती. सगळं ती एकटीच करते म्हणे.
हे सगळं अमूर्त असूर सत्य ऐकुन काल न राहवून मी फोनच केला तिला. अशा वेळा नेमक्या कशा साधाव्या कळत नाही. पण मी तिच्या लग्नाचं ऐकून खचलेले होते हे नक्की. तेव्हा बरच काही मी कल्पना केल्यासारखे घडलं होतं, पण एका घटनेने मन हेलकावे घेऊन छोट्याशा जीवाचा गळफास घ्यावा एवढं लवचिक झालं. जेव्हा विषय त्या दोघांच्या सुहागरातचा झाला ती म्हणाली, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पासून हे काहीतरी करतात, मला ते आधी माहितीच नव्हतं. आपण नाही का शाळेत हसायचो अशा गोष्टींवर. ते काहीतरी… पण मला खूप खूप त्रास व्हायचा, ती जागा ना संवेदनशील होत स्वतःच्याच मांड्या घासायच्या, शेतातल्या कामात लक्षात यायचं नाही पण पुन्हा रात्री थोडी उसंत मिळेल वाटायचं पुन्हा ते येऊन तसं करायचे. तरी सासू विचारते, नातवंड कधी दाखवणार आम्हाला ? आम्ही गेल्यावर का.? नवर्याला पण विचारायची. शेवटी वांझ ठरवायला लागून दुसऱ्या लग्नावर गोष्ट आलीय…
सोळाव्या वर्षी लग्न होऊन सतराव्या वर्षी नातवंड होणं काही स्त्रियांच्या शरिरामुळे आणि पुरुषातील कमतरतेमुळे अशक्य असते. पण त्यासाठी या टोकाला जाणं, कितपत माणूसपणाचं आहे? लग्न ही गोष्ट चुकीची नाहीचे मुळी. उलट तो एक वेगळा लय असतो आपल्या आयुष्याचा. एका आयुष्यात दोन वेगळे जग अनुभवण्याचा. पण किमान तिची स्वप्न तरी पूर्ण होऊ द्या.? तिला तिच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचं छोटंसं स्वातंत्र्य द्या. ती तुमच्या मर्यादेच्या बाहेर जात नाही हा कमकुवतपणा नाही, तुमचा मान आहे.
‘आमच्यात लवकर लग्न करतात, समाज नाव ठेवतो, आमच्यात मुली जास्त शिकवत नाही …’ अरे काय ? शिक्षणाला पण तुम्हीच तुमच्या हाताने जातीच्या बंधनात जखडतात.? तिची मनाची तयारी असेल तर नक्कीच ती समोरच्याला आपलंसं करेल, त्या झोपडीला घर बनवेल , पण तिच्या आयुष्याचा तो सुंदर निर्णय, ती सुरेल गाठ तिच्या मर्जीने बांधू द्या. किती दिवस अजुन ती ‘आपल्या सारख्या लोकांनी बनलेल्या समाजाला घाबरून’ स्वतःला विचारांच्या काडतुसांनी पेटवून घेणार आहे.? घरच्यांचं ऐकून, निर्णय घेऊन ते खुश असतीलही आणि ही…? जिवंत… पण सोळाव्या वर्षांपासून पुढच्या पन्नास वर्षापर्यंत तिला तिच्या आयुष्याशी नजर मिळवणं निव्वळ अशक्य होऊन बसले आहे तिला. “योग्यवेळी पाणी घातलं तर झाड बहरतं, खुलतं आणि महत्त्वाचं म्हणजे वाढतं” पण इकडे अयोग्य वेळी केलेलं चुकीचं खत-पाणी यामुळे झाड तग धरून तर राहतं पण कुजुन समाजाशी, आईवडलांशी, सासरच्यांशी आणि स्वतःशीही जुळवून घेता घेता अक्षरशः थकून जातं.
‘आपल्या माणसांचा विचार करून, परिस्थितीसमोर हात टेकून किंवा समाज काय म्हणेल.?’ यामुळे घेतलेले अयोग्य निर्णय सुंदर आयुष्याची माती करतात. त्यामुळे आज एकीचं आयुष्य सुन्न झालंय, उद्या अजुन एक होईल, असं रोज होत राहील. पण जर आपण शिक्षण हे जाती धर्म आणि परिस्थीतिपेक्षा मोठं केलं तर परिस्थिती कोणतीही असली तरी जीत तिची असेल, फक्त उशीर असेल तिने खंबीरपणे निर्णय घेण्याचा आणि समाजाचे पोकळ विचार तिच्या बंदुकीच्या निर्णयाने गळून पाडण्याचा.!
You r unstoppable .
हा लेख वाचून अगदी मन सुन्न झालं…
मुलींनी प्रत्येक क्षेत्रात यशाची शिखरे गाठल्याच्या बातम्या जेव्हा ऐकतो तेव्हा खूप अभिमान वाटतो, पण जेव्हा बालविवाहाच्या ब्यातम्या ऐकीवात येतात तेव्हा खरंच खूप खूप वाईट वाटतं…
मग मनात विचार येतो, की या तंत्रज्ञानाच्या एकविसाव्या शतकात आपण नेमकी प्रगती करतोय की अधोगती…?
तुम्ही म्हटल्याप्रमाणे शिक्षण हे खरंच जाती-धर्मांपेक्षा मोठंच असायला हवं…💯
असं म्हणतात, की शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं… आणि ते प्रत्येकाला मिळायलाच हवं… तरच अशा वाईट, अर्थहीन पद्धती आणि चुकीच्या प्रथा समाजातून नष्ट होऊ शकतात..