लहानपणी मामाचं गाव म्हटलं की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची शब्दशः ओढ लागायची. कारण शहरी मध्यमवर्गीय कुटुंबासाठी गावाचं जीवनमान म्हणजे भावनिक समाधानाचा झरा वाटतो. तिथे सगळ्या प्रकारचे इमोशन्स आहे. पण त्या सगळ्यात एक शुद्धता आहे. तेढ, द्वेष, राग, चीड, बांदावरची भांडणं, जावाजावांची किरकिर आहे पण त्या सगळ्यांना माहिती आहे, एकत्र आहोत तरच सौख्य आहे. भांडा, सौख्यभरे! याची जाणीव गावाला जाताना नेहमी व्हायची.
ग्रामजीवन पाहिलेल्या आणि त्यानंतर शहराकडे स्थलांतरित झालेल्या असंख्य पिढ्या आहेत. या पिढ्या आयुष्यात मनाच्या एका कोपऱ्यात एकदातरी विचार करतात, चला सगळं सोडून गावी राहायला जाऊ! आपलं आपलं पिकवू आणि स्वतःसाठी खाऊ! तीन वेळेचं जेवण मिळेल, कधी काही कमी पडलच तर गावचा तुक्या, रम्या, सुऱ्या त्याच्या ताटातलं देईल.
अशी लोकं दिवसभर काम करून रात्रीच्या अंधारात गावाचा जिव्हाळा खूप मिस करतात, मीही!
हे सगळं ‘तार’सारख्या सिनेमांमधून आठवून जातं…
तार बघताना, ‘खेड्यातला भारत’ हा या भारताचा आत्मा वाटतो. त्या आत्म्याचं अस्तित्व इतकं मुक्तपणे पडद्यावर उमटवणे या लघुपटाला जमलय. केवळ वीस मिनिटाच्या वेळात आपण त्या काळात जाऊन येतो. तसा भारत आज असता तर…? याचे नानाविध खेळ खेळू लागतो. तंत्रज्ञान, स्मार्टफोनचे असंख्य फायदे वापरून सुद्धा त्याचे तोटे आयुष्याचं सुख कसं हिरावून घेताय, ते स्वतःच स्वतःला सांगू लागतो.
या लघुपटात पाकिस्तान-भारत सीमेवरील तप्त वातावरणात शहीद जवानांच्या कुटुंबियांवर लक्ष केंद्रित केले आहे. फाळणीच्या काळातली जवानांच्या कुटुंबियांची भावनिक उलथापालथ नेमकेपणाने पकडून त्यात टेलेग्रामचे म्हणजेच तारेचं महत्त्व पुरकपणे अधोरेखित केले आहे… कुठल्याच क्षणी वाटत नाही की लघुपट तार विषयाला अनुसरून असून तो कुठेतरी भटकतो आहे…
त्या एका टेलिग्राममध्ये दडलेल्या मजकुरात त्या कुटुंबाचं सुख नाहीतर दुःख अवलंबून असतं. असच काहीसं होतं जेव्हा पोस्ट मास्तराच्या वेशात नागराज मंजुळे फौजीच्या घरी टेलिग्राम घेऊन जातात. कारण सीमेवर भारत पाकिस्तान युद्धाचा प्रसंग चालू आहे. त्यामुळे लांबून पोस्टमनला बघणं आणि तो नेमकं पत्र घेऊन आला की टेलिग्राम यावरून प्रसंगाचा अंदाज घेणं हे अंगावर काटा आणणारं होतं. पण यामुळे झालेल्या गैरसमजातून दुःखाचं वैश्विक आनंदात झालेलं रूपांतर बघण्यासारखं आहे.
या दरम्यान “आपण अशी नोकरी करावीच का ज्यामुळे लोकांचे शिव्याशाप लागतील… ज्यामुळे आपल्याला मुल बाळ होणार नाही. तुम्हालाच मुल बाळ नकोय” असा तगादा पोस्ट मास्तरची बायको लावते. लोकांच्या शिव्या शापांवर विश्वास ठेवून ती पोस्टमास्तरला नोकरी सोडाच म्हणून मागे लागते. .
नोकरी सोडण्याचा विचार करत असताना त्याच्या वाट्याला आलेला तो प्रसंग त्याला त्याच्या नोकरीवर प्रेम करायला शिकवून जातो. त्या प्रसंगात एका रुपयाच्या नोटित तो म्हातारा त्याच्या कठीण प्रश्नाचं उत्तर देऊन जातो. म्हाताऱ्याचे थरथरणारे हात त्याला ठाम निर्णय घेण्याची ताकद देऊन जातात. शिवाय आपली नोकरी का चांगली आणि का चांगली नसते याच स्पष्टीकरण देऊन जातात. तरीही नोकरी करावी लागते, हे सत्य मांडून जातात.
पत्रकारिता करताना एकदा मी विचारलं होतं, आताच्या स्मार्टफोन, तंत्रज्ञानाच्या काळात आपण दुःखद निधन वार्ता का छापतो? त्यावेळी माझे सिनियर म्हणाले, पूर्वी मोबाईल सेवा नव्हती, त्यामुळे एकमेकांपासून दूर राहणाऱ्या लोकांना एकमेकांची खबरबात सांगण्यासाठी वृत्तपत्र सगळ्यात महत्त्वाचं माध्यम होतं. त्यावेळी निधन वार्ता, वाढदिवस शुभेच्छा, हे कॉलम सुरू झाले. ते आजही कायम आहे कारण आजही या जगात काही वर्ग असा आहे ज्यांच्याकडे मोबाईल फोन नाही, काहींची घेण्याची ऐपत असूनही त्यांना ते व्यसन वाटतं, त्याने आपल्या पिढ्या वाया जातील याची भीती वाटते. अशा लोकांसाठी गावाच्या पारावर आणि अपवादात्मक घरांमध्ये वृत्तपत्र ही आजही ‘तार’ आहे. असे भावनिक प्रसंग आपल्या कामाला वेगळा दर्जा आणि प्रतिष्ठा प्रदान करतात.
मध्यावर आलेल्या चित्रपटात एक गोष्ट जाणवते,
एवढा सगळ्यांना आपलासा असणारा गावचा फौजी जेव्हा सीमेवर जातो. तेव्हा काय काय घडतं याचं चित्रण करूनही शेवटाला एक लहान मूल म्हणतं, “म्हणलं होतं की नाय, आमचा हरिभाऊ लय खत्र्याय त्याला कायच होत नाय! मी बी मोठा झाला की त्याच्यासारखं लढायला जानारय”
त्या इवल्याशा जिवाचं हे स्वप्न ऐकून पोस्ट मास्टर त्याच्या नोकरीवर खऱ्या अर्थाने रुजू होतो… पोस्ट मास्तराची नोकरी खऱ्या अर्थानं उमेदीची नोकरी आहे!
शेवटच्या संध्याकाळच्या संगीताने हळूहळू तो प्रसंग मावळत जातो, पण दर्शकाच्या डोळ्यांना मायेचा ओलावा देऊन जातो.
~ पूजा ढेरिंगे
तुझा review वाचला ज्यामुळे तो लघुपट पाहायची ओढ लागली आणि मग लागलीच त्यानंतर लघुपट पाहिला….आणि पुन्हा तुझा review वाचला….मस्त वर्णन केलं आहेस as usual….लघुपट तर खूपच छान…Thanks for recommending…🙂
हे असे लघुपट फार काही सांगून जातात जे 150 मिनिटांच्या सिनेमा देखील सांगू शकत नाही..
हे वाचून सगळ डोळ्यासमोर उभ राहिल 👌👌👌