गच्चीवरची रोडट्रीप

कधीकधी वाटतं या त्याच त्या आयुष्यात खूप अडकलेय मी.

तशी खास कम्प्लेंट नाहीये पण इथे सगळं काही आहे … पण नको असेल हे सगळं काही तर …?
माणूस म्हटलं की सगळ्यात आधी काय येते तर त्याची इमेज … आह ! गैरसमज नको … इमेज म्हणजे माणसाची विशिष्ट व्याख्या…
पण माणसाला नाहीये या सगळ्याची गरज …
“कधी या सगळ्यापलीकडे गेलियेस…?” आज मीच स्वतःला प्रश्न केला …
“नाही….” हे माझं मला उत्तर स्वाभाविकच होतं .
“कारण तू विनाकारण नकळत अडकत गेलीये या विश्वाच्या भावना आणि इमोशनल बॉन्डिंगमध्ये …
फक्त एकदा स्वतःला विसर… या जगातल्या सगळ्या मोहमायेला, इथल्या तुझ्या नात्यांना, तुझ्या गरजेला विसर … आणि मग बघ तुझ्या डोळ्यांना काय दिसतंय … जे स्पष्ट दिसेल त्या गोष्टीसाठी तु बनली आहेस…” इतकं सरळ माझ्या मनाने सांगितले.
तेव्हा मी बोलायला लागले स्वतःशी … छे ! हे फक्त सिनेमातच दिखाव्यासाठी होतं असं नाही… आपलं मन खरच बोलतं आपल्याशी.

विषय फक्त त्याच्या फेवरमध्ये असावा…
मला म्हणे,
“तुला माहिते, आइ ऑल्वेज ड्रिम्ट ऑफ अ रोड ट्रिप……. मला पण असं बाइक काढून कुठल्याच काळजी नात्याविना फिरायला जायचंय, एक रोडट्रीप स्वतःसाठी करायची आहे …

 पण या गोष्टींमधून बाहेरच नाही पडता येत गं…
आता तूच बघ ना, काल घरी यायला थोडासा काय उशीर झाला म्हणजे जास्तीत जास्त १२ वाजले असतील पण घरचे किती चिडले त्यावर… त्यात मग एक्स फॅक्टर म्हणजे मी मुलगी …
तिच ती टिपिकल भारतीय मानसिकता… मग कशी पडणार यासगळ्यातुन बाहेर…?
तुझी उत्तरं तुझ्याकडे चोख तयार आहेत गं… म्हणजे तुला माहिते घरचे काळजीने म्हणतात वगैरे (घरच्यांचा आदर कुठेच झुकू देत नाही असं हे भारतीय संस्कृतीच वैशिष्ट्य)
तर्र … त्यांची काळजी बरोबरच आहे … त्यांनी तुला मुलगा म्हणून वाढवलं. पण विशीपासून समाजासाठी तू मुलगी झाली म्हणून त्यांनी तुला तुझ्या मुलगी असल्याची जाणीव करून द्यायला सुरुवात केली…
श्या! यार पूजा….. तु पुन्हा ते फेमिनिज्मकडे वळतेय … “

“काय खोट आहे मग त्यात ….?” माझं मलाच प्रश्न केला मी.
“आता तूच बघ ना, स्वप्न आहे पण मुलगी आहे आणि मुलगी आहे म्हणून काही स्वप्न स्वप्नच आहेत …
सहीच बोलला होता कुणीतरी, ‘मुलगी होणं सोप्प थोडीच आहे, कित्येक स्वप्न तर जन्म घेतानाच मारून टाकावे लागतात …’  आणि मी तर काही स्वप्न झोपेतच पांघरुणाआडच मारते…

त्याच काय असतं ना, एकतर तुम्ही स्वप्नच जगू शकता, नाहीतर लोकांची मन सांभाळू शकता.
आता माझ्यासारखीने विचार केला, करू कि दोन्ही एकाच वेळी. दुनियेला नाही जमलं तुला जमणार बग्ग…

साल्ला असं म्हणत म्हणत आवरायला काढली बॅग …
गूगलला जाऊन सर्च केलं ‘जगप्रवासावरील प्रसिद्ध पुस्तके (बेस्ट ट्रॅव्हल बुक्स ऑफ ऑल टाइम).’ कित्ती पुस्तकं आहेत बाब्वा!
कित्ति वाचतात लोकं आणि कित्ति लिहितात लोकं म्हणजे कित्ति फिरत असणार ही लोकं …. आणि आपण अडकलोय सटवाईच्या संसारात…

ए सर्च तर करत होते पण पुस्तक घरी पोहोचायला एखाद दोनचार दिवस गेलेच असते … त्यापेक्षा सॅमकडुनच एखाद पुस्तक मागवून घ्यावं म्हटलं (सॅम; आमची शेजारी) टिप्पिकल शेजारीये…
चांभारचौकश्या नुसत्या …”

अय्या म्हणजे तुला आई हो म्हणाली जायला … माझी आई तर दळण घ्यायला पण पाठवत नाही, तुला डायरेक्ट रोडट्रीपला. ? माझ्या आईला सांगावं म्हणतेय… “
“पुस्तक मिळेल ? “
सो अशाप्रकारे फायनली पुस्तक हातात पडलं. ‘एपिक ड्राईव्ह्ज ऑफ दि वर्ल्ड’ …
या जर्नीवाल्या पुस्तकांची कव्हरं भलतीच आकर्षित असतात नाही? … एक सुगंध होता त्या पुस्तकात ‘स्मेल्ल ऑफ माय फ्रीडम’ (माझ्या आझादीचा सुगंध)

तर्र अस करत करत ठरवलं आणि मी निघाले, छान आवरायला सुरुवात केली…
पुस्तक टाकलं, पाण्याची बॉटल टाकली, एक जॅकेट टाकलं, पैसे होते जमा केलेले ते घेतले, स्वतःची बाईक होतीच ती काढली … आणि निघताना फक्त आईच्या पाया पडले…
आईने मस्तपैकी आशीर्वाद दिला…

चक्क! हो सेम ऱिॲक्शन …. म्हटलं सगळं कस छान होतंय … आता मागे वळून पहायलाच नको म्हणून चालत राहिले … तो घराचा कोपराये ना दूर पार, तिथ्थे जाऊन मागे वळून पाहिलं. पाहते तर काय, आईच्या डोळ्यात पाणी आणि एक हात हृद्यावर ..
तिथून मागे फिरावंच लागतं गो, तिथे कुठलाच पर्याय नसतो… ते असंच असतं इलाज नसतो काहीच…

अशाप्रकारे आपण आपलं स्वप्न चोखंदळपणे एका इमोशनल झर्यात वाळत घालून येतो … माझ्या स्वप्नाचा एव्हाना पापड झाला असेल … ते घेतलेलं पुस्तक पण धूळ खात पडलंय…

हाश्हह! आज गच्चीवर जाऊन वाचावं म्हणतेय …

सॅम बरोबरच म्हटली होती, ही पुस्तकं गच्चीत वाचायलाच मज्जा येते …तिथे आकाश मोकळं असतं.. हवी ती रोडट्रीप काढायची, हवा तो रस्ता शोधायचा, हवी ती बाईक घ्यायची, हवी तशी चालवायची… आकाशाला आझादी आहे म्हणून कसं देखणं दिसतं नाही?  

माझ्या मनाची रोडट्रीप “गच्चीवरची रोडट्रिप” अशा काहीतरी नावाने फेमस करावी म्हणतेय… तिथे कुणाची लुडबूड तरी नसेल, ना उगाचच असलेला नात्यांचा गुंता असेल आणि मुळात म्हणजे ‘मी’ म्हणून जन्माला आले आहे ना तो ‘मी’ तिथे असेल… जन्म ‘मी’ म्हणूनच घेतला पण त्याला जपायचं सोडून सगळं करतो आपण… “
असं करत करत माझं स्वतःशी बोलणं थांबलं खरं, पण स्वप्न वाढली…. स्वप्न वृद्धिंगतच होत असतात.

हे स्वप्न स्वप्न नाही राहणार याची काळजी मात्र मी घेईल. एवढं प्रॉमिस करून बारसो बाद ची रोडट्रिप मी आजच रजिस्टर केली. सुकूनभरी उमेद होती त्या चेहऱ्यावर उद्याच्या खऱ्याखुऱ्या रोडट्रीपसाठी…

Please follow and like us:
error

2 thoughts on “गच्चीवरची रोडट्रीप”

  1. खूप सुंदर मांडलय..अगदी साधं आणि सोप्या पध्दतीने, मनाची घालमेल कळून येते वाचताना… jug jug jiyo khup sarya shubhechcha… 👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *