थप्पड; घरेलु विचारसरणीला!

लेखन फेमिनिस्ट वाटण्याची शक्यता. स्वतःच्या समजदारीवर वाचणे!

मानवी आयुष्यात एक मर्यादा संपली की तो दुसरी गाठू लागतो. कारण मर्यादा लांघणे म्हणजे अडवेंचर!
कसं?
तर अशा पद्धतीने बघा, माणसाला प्रेम होतं तेव्हा सुरुवातीला खूप वेगवेगळ्या भावना निर्माण होतात, प्रेमाला मिळवण्याचा प्रयत्न होतो, मग हळूहळू स्पर्श, मग अलगद स्पर्श, मोक्याच्या क्षणी मिठी, यापुढच्या गोष्टी अवघड असतात पण हव्या असतात. मग मिठी रोजची होऊन जाते, मग किस, फोरप्ले, संभोग आणि मग तेच ते रूटीन…
हेच चक्र हिंसेबाबतही असते.
कसे?
तर आधी समोरच्या व्यक्तीचा साधारण राग येणं, त्या साधारण रागाला समजावून सांगणं, मग पुढच्या वेळी अधिक राग येणं, तेव्हा अंगावर धावून जाणं, तिसऱ्या वेळी समोरच्याबरोबर तुमचा आवाज वाढणं, मग रागात दात ओठ खाऊन रागाला पुढच्या पायरीवर नेणं, त्यामुळे पुढच्या वेळेपासून आदळआपट, बदल्याचा सूड आणि नातं तोडण्याचा प्रयत्न. पण या तुटण्यात मन, इमोशन आणि समाजाच्या अडचणी पुढे येणार, त्यामुळे एक दिवस आधीच्या सगळ्या रागाचं विष म्हणून थप्पड…!

समोरचा हादरून जाणार, किन्न होणार, डोकं सुन्न, आपल्या घरात हा वाद कसा? कशामुळे? पहिल्या थप्पडला असंख्य प्रश्न, या प्रश्नांना सामोरं जाऊन त्याचा स्वीकार होऊ लागणार, पुन्हा एक दिवस भांडण होणार, यावेळी एक थप्पड नसणार, ती होऊन गेली. जेव्हा ती थप्पड लगावली तेव्हाच डोक्यात येणार पुढच्या वेळी यापेक्षा वेगळं करायचं, त्यामुळे यावेळी जोरजोरात आवाज करणार, आवाजात एक नाही सातत्याने मारत राहणार, खूप आवाज खूप रडगाग, ज्या दोघांत हे घडणार त्यांना एकमेकांच काहीच पडलेलं नसणार.
कारण मर्यादांचे बांध तुटत जाणार…
रागाचा/ अहंकाराचा आत्मा थंड विसावत जाणार, तात्पुरता. त्याचा नशा कधीच उतरणार नाही. हिंसा जन्म घेऊ लागणार.
त्यामुळे तिच्या स्वाधीन जाण्याआधी थांबा! स्वतःला तिच्या परिणामांची जाणीव करून द्या! समोरच्यासोबत आपलं नातं काय आहे याची जाणीव करून द्या स्वतःला.

एव्हाना कळलं असेलच, ही पार्श्वभूमी अनुभव सिंहाच्या ‘थप्पड’ या सिनेमासाठी आहे.
सिनेमाची सुरुवात अगदी सुटसुटीत आहे. चित्रपटाच्या नावात कसलाच सस्पेन्स नाही. त्यामुळे लेखकाला नावापेक्षा चित्रपट म्हणून दर्शविणाऱ्या समाजावर फोकस करायचा असल्याचे स्पष्ट आहे. असा विषय प्रेक्षकांसमोर आणून मोठ्या प्रश्नाचं खोड कुठे लपले आहे, हे दर्शवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला आहे.

चित्रपटातला वावर किती सहज असावा, याचं उदाहरण म्हणजे तापसी पन्नु. सिनेमात तिचे नाव अम्रिता उर्फ अमु.
‘अमु हे, अमू ते … अमु फुल टाईम आहे. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात घरात आणलेली परस्त्री बायको असते, नंतर अमु म्हणजे कर्तव्य.’
अमुने लग्नानंतर जॉब करण्यापेक्षा गृहिणी म्हणून घर सांभाळणं पसंत केलं, तेही तिच्या मर्जीने. ती म्हणते, खुश होते मी त्याच्या स्वप्नात आणि त्याच्या आयुष्यात सहभागी होऊन. पण या सगळ्यात कदाचित मी स्वतःला असं बनवून घेतलं ज्याला तो थप्पड मारू शकतो.’
बाईने घरासाठी करण्यात काहीच गैर नाही. बाईला जेव्हा स्वतंत्रपण जाणवत नाही तेव्हा ती इतरांच्या आनंदात खुश राहू शकते, गैर काही नाही पण आवडीच्या गोष्टी कुणाची गुलामी केल्यासारख्या करू नये. हो गुलामी! आपल्या माणसाची गुलामी. नवऱ्याची गुलामी! जिथे त्याने न मागता त्याच्या पुढ्यात सगळचं नजरेच्या अंतरावर असेल तर त्याने तिला बायकोचा दर्जा आणि प्रेम द्यावं. सन्मान! एकमेकांचा आदर नसणं इथूनच नातं विस्कळीत होत जातं.
ती गृहिणी असेल, त्याने ऑफिसच पहावं. पण घरी आल्यानंतर किमान नवरा बायको बनावं.

गृहिणी स्त्री आणि घर सांभाळून नोकरी करणारी स्त्री या दोघींत फरक हाच असतो, नोकरी करणाऱ्या स्त्रीला स्वतःच्या असण्याची किंमत असते, गृहिणी ही दुसऱ्यांच्या असण्याला जपत राहते. 

चित्रपटात खूप बायका आहे आणि त्यांची असंख्य मतं आहेत. ती मतं स्त्री प्रेक्षकांना खिळवून ठेवतील, पुरुष प्रेक्षक त्याचं अनालीसिस करतील, तर्क वितर्क आणि वास्तवाच्या घटनांशी संदर्भ जोडतील, काही त्याचा ट्रेण्ड म्हणून चर्चेत येण्यासाठी दिखावा करून खोटा मुखवटा लावून ‘फेमिनिस्ट’च्या गर्दीत घुसत स्त्रियांच्या जवळ जातील, काही टक्के पुरुष पुन्हा त्यांच्या आयुष्यात अशा सिनेमांचा जिक्र पण करणार नाहीत.

पुरुषांच्या वागणुकीला दर्शवणारा विक्रम (पवेल गुलाटी)  हा चांगला व्यक्ती आहे. अभिनयही उत्तम केला आहे. नॉर्मली, उच्च घराण्यातील नवरे ज्याप्रकारे स्वातंत्र्य देतात, त्याच प्रकारातील विक्रम. हे विक्रमसारखे पुरुष आपल्याकडून स्वीकारले गेले आहेत, याची जाणीव करून देणारं विक्रमच पात्र आणि संवाद आहेत. ‘थप्पड’ चित्रपट आहे, त्यामुळे थप्पड लगावणे हा मुख्य सिन आहे. या सिनचा अभिनयही तितका सहज आणि पितृसत्ताक मार्गाने झाला आहे. विक्रमने हात उगारला आणि त्याला स्वतःला कळलं सुद्धा नाही, इतका सहज. त्यामुळे सिनेमाची मध्यवर्ती कल्पना म्हणून त्याला ठोठोठो करत, डार्क म्युजिक देऊन ओव्हर ड्रामाटिक करण्याचे टाळले ते बरेच! कारण हे सिन तितके महत्त्वपूर्ण नसल्याची दृष्टी समाजाने आपल्याला दिली आहे.
तर्र, विक्रमला त्याची बायको खूप आवडते. दोघे एकमेकांचा आधार आहेत. दोघांना लंडनला शिफ्ट होण्याची संधी चालून येते, त्यानिमित्ताने सगळ्यांसाठी पार्टी ठेवली जाते. परंतु विक्रमच्या ऑफिसमधील राजकारणामुळे अचानक पार्टीमध्ये बॉसच्या फोन कॉलमुळे त्याला समजते की त्याच्याऐवजी ती संधी दुसरं कुणाला मिळणार आहे. या गोष्टीमुळे विक्रमचा मानसिक तोल जावून त्याला मोठा सदमा, धक्का बसून त्याचा अपेक्षाभंग होऊन स्वप्नांचा चुरा होतो, तिथे थप्पड सिनेमा सुरू होतो.
सासूला आईचा दर्जा देऊनही सासूने सतत, विक्रम ठीक से सोया? हे विचारणं. हाच प्रश्न त्या रात्रीच्या घटनेनंतर विचारणं म्हणजे आईच्या हातून कुरवाळला जाणारा आणि या वृत्तीला दुजोरा देणारा हा पुरुषिपणा आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी अमुजवळ येऊन तिला सॉरी म्हणताना विक्रम म्हणतो, क्या सोचेंगे लोग मेरे बारें में। वो सब कंपनी का गुस्सा तुम पर… मैं ऐसी कंपनी में रहना ही नहीं चाहता जहां मेरी वैल्यू नहीं। मैंने हर बार सोचा कंपनी पराई नहीं, अपनी हैं।’ या विक्रमच्या ओळी अमुसारख्या कित्येक बायकांना लागू होतं. जिथे किंमत नाही तिथे कशाला राहायचं? ते परक्याच नाही माझं घर समजलं होतं. पण तिथे त्यांना सोयीने कसंही वागवलं जातं म्हणून त्या त्यांच्या नवर्यांवर हात नाही उचलत.
एकदा कल्पना तरी करून पाहा, कधी कानावर आलंच की तुमच्या मुलीवर जावई हात उचलतो. काय वाटत असेल पालक म्हणून मनाला? ही भावना कोणत्या आई मानलेल्या सासूला आणि माहेर मानलेल्या सासरला समजणार आहे.
ही घटना घडल्यानंतर नेमकं समाजाचं रूप गळून पडतं.
तो प्रवास कठीण आहे, सांगून त्यातील बघण्याची दृष्टी घालवणार नाही.

चित्रपटाचे संगीत फेमस होण्यासारखे नाही परंतु सायलेंट मोडवर परिस्थितीची कथा मांडणारे आहे. शेवटाला एक लिरिक्स माझा पिच्छा सोडत नाही, ‘तेरा भी एक आसमान हो और मेरा भी एक आसमान हो।’
दोघांपैकी एकाने जरी सोडलं तरी तुटणार असतं, हे जाहीर आहे. त्यामुळे तडजोड बाईनेच करायची ही शिकवणी बंद करा. तिला तुमच्या या अशा शिकवणुकीमुळे आयुष्य बरबाद करावं लागतं याचं भान येऊद्या!

तुम्हाला चित्रपट चिल्लर वाटण्याची शक्यता आहे.. कारण चित्रपटात दाखवलेल्या अमृता नावाच्या बाईवर रोज अन्याय होत नव्हता. तुम्हाला तिची कामवाली (गितिका ओएल्यान) जास्त पीडित वाटेल कारण तिच्यावर रोजच तिचा नवरा हात उचलतो. ती त्याच्या या हिंसेला पुरुषी सवय आणि हक्क मानते. हिंसेची तुलनाच होऊ शकत नाही. हिंसा ही चुकीची गोष्ट आहे तर आहेच! त्याचे समर्थन अशक्य आहे. त्यामुळे जर कोणी म्हणत असेल की, चित्रपटात अमूच्या नवऱ्याने त्याच्या कामाचा राग म्हणून तिला थप्पड लगावली, “एकच तर थप्पड मारली”
हे आविर्भाव मनात जरी उमटले तर स्वत:ला विचारायचं, ‘जर मी तिच्याजागी असतो/ असते तर?’
त्यामुळे तुमच्या या प्रश्नासाठी संपूर्ण चित्रपट बनवला आहे. तरीही तुम्हाला त्याचा मूळ विषयच कळत नसेल तर तुम्ही आजही हिंसेला समर्थन देत आहात लक्षात असू द्या. थप्पड ही गळ्यापर्यंत आलेली हिंसा असते. पुढे घरेलु हिंसा, जाळपोळ, अत्याचार, चटके असे असंख्य थप्पड घरून जीव जायला  कारणीभूत असतात.
चित्रपट संपताना स्वतःच्या सन्मानासाठी आणि आनंदासाठी उभी राहिलेली अमु, अमुच्या मागे खंबीर असलेला पुरुष म्हणजे तिचे वडील डोळ्यासमोर राहतात. चित्रपटात असंख्य वाक्य ही आपलीही असू शकतात, किंवा बऱ्याच कुटुंबात रोजची असतात. पण ती चुकीची असतात, हे आपल्याला जाणवतच नाही. यावर विचार करायला हवा.

हा रिव्ह्यू लिहिण्याचा अट्टाहास यासाठी की बऱ्याच जणांकडे डोळे आहे, ते चित्रपट पाहतात पण दृष्टी आणि दृष्टिकोन याची समज नाही. या अशा सिनेमांसाठी रिव्ह्यू लिहून त्यांना समजावणे गरजेचे वाटते.  जितका पुरुषांना संदेश देणारा चित्रपट तितकाच स्त्रियांना डोळे उघडा हे सांगणारा पट आहे.
एकदा पुनर्विचाराने तयार करूया का ही स्त्री पुरुषांची विचारसरणी?
घर सांभाळून ठेवायला स्त्रीला मन मारावं लागतं. जर तिने मन नाही मारलं तर नवरा तग धरून संसार टिकवेल? संसार तुटत असेल तर तो शक्य ते करून संसार जोडून ठेवेल??
का नेहमी भांडणं होताना तो त्याच्या बळाच्या जोरावर म्हणत राहतो, मी सहजासहजी सोडणार नाही, मी पाहून घेईल तुला, काहीही झालं तरी मी ते करूनच दाखवेल, त्यासाठी कोणत्याही थराला जाईल… फॅमिली या बाहेरच्या जगाच्या स्पर्धेत येत नाही, एवढं सिंपल आहे.

घरकामवाल्या स्त्रीचे पात्र डोळ्यात पाणी आणते. पुरुष आहात म्हणून तिच्या आझादीला, आयुष्याला कसे दबून टाकतात ? काय अधिकार असतो? हे प्रश्न पुरुष म्हणून पडू शकतात.
स्त्री कुटुंबाला जोडून ठेवते पण नकळत ती कुटुंबाला तिच्यावर अवलंबून राहणे शिकवते, घरातल्यांना कंफर्टची सवय लावते. एका अर्थी कमजोर बनवते, तिने थोडं बदलायला हवं.जर अमु घराच्याबाहेर गेली नसती तर विक्रमने घर, ऑफिस आणि घरातली आई यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला नसता. आई शुगरच्या त्रासातून बाहेर येऊन चालायला लागली नसती, आजूबाजूच्या बायकांना भान आले नसते. त्यामुळे स्त्रीने आपल्या वर्तणुकीतून आपण भविष्यासाठी काय निर्माण करत आहोत, याकडे लक्ष द्यावे.

Stop violence
Be happy, be good!

Please follow and like us:
error

1 thought on “थप्पड; घरेलु विचारसरणीला!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *