काही दिवसांपासून मनाला स्थैर्य मिळत नव्हतं.
बऱ्याच जुन्या गोष्टी करून पाहिल्या. जुन्या व्यक्तींशी बोलून पाहिलं. मान मागच्या दिशेला उभ्या रेषेत नेऊन ध्यान एकाग्र करण्याचा प्रयत्न केला. पण अशांत, अस्थिरता आणि चंचलपणा सापडत होता.
मग हे स्थैर्य मिळवण्यासाठी मी पुस्तक वाचणं जमत नाही म्हणून Storytel पॉडकास्टचे सबस्क्रिप्शन घ्यायचं ठरवलं. यापूर्वी हा प्लॅन बऱ्याचदा माझ्या मनानेच कॅन्सल केलेला. कारणं असायची की पुस्तक आता ऑडिओ माध्यमात ऐकायची? हा पुस्तकांचा अपमान का? मग पुस्तकांचा तो आपुलकीचा वास, फील आणि शब्दांतून चित्र कल्पित करणं हे सगळंच मिस होईल. तसेच जे लेखक- लेखिका लिहिता त्यांच्या प्रती विकत घेऊन त्यांना प्रोत्साहन आपण नाही तर कोण देणार?
पण मनाच्या अस्थिर मानसिकतेत शेवटी ऑडिओ बुक किमान ऐकून पाहू, असा चान्स स्वतःला द्यायचा ठरवला आणि ४ दिवसापूर्वी स्टोरीटेलवर महिन्याचं १४९ रुपयांचा फक्त मराठी भाषेचं सबस्क्रिप्शन घेतलं. ३ दिवस फ्री असून पुढे पैसे ऑटो डीडक्ट होतात.
आधी स्वतःच स्वतःला तपासावे म्हणून महिन्या भराचा पर्याय निवडला. पण पहिल्याच दिवशी मला खूप शांत वाटलं. ज्यावेळी मला स्क्रीन बघावी वाटायची नाही तेव्हा ऑडिओ लावून देऊन डोळे बंद करून हे पुस्तक ऐकू लागले. सुरुवातच Sharad Tandale यांच्या ‘द औंत्रप्रेनर’ या महा वास्तविक पुस्तकाने केली. प्रामाणिकपणे सांगायचं तर इतके दिवस या पुस्तकाचे कव्हर न आवडल्यामुळे हे पुस्तक मी टाळत होते. पण मित्रांच्या, बॅचमेटच्या माउथ पब्लिसिटीतून या पुस्तकाचे कौतुक अनेकदा ऐकले. शेवटी सुरुवात केलीच आणि माझी मलाच खात्री पटू लागली की सगळे उगाच कौतुक करत नाही.
“प्रत्येक सर्व सामान्य माणसात बिझिनेसमन – बिझिनेसविमन व्हायची सुप्त, छुपी इच्छा असते. पण बिझिनेस करावे तर गुजराती, मारवाडी, जैनांनी… या मानसिकतेत असलेल्या आपल्या सर्व सामान्य लोकांना जळजळीत उत्तर देणारं हे कमाल पुस्तक आहे. शुण्यापासून सुरुवात करून पुन्हा शून्य व्हायची भीती न उरणाऱ्या खऱ्या खुऱ्या माणसाची ही खरी कथा… उनाड वयात काहीच स्वप्न नसलेला व्यक्ती कसा अंधारातल्या चौकटीत उभा असतो तसा या लेखकाचा प्रवास आपला वाटत जातो. पुस्तक लिहिताना कदाचित त्यांनी त्यांच्या सगळ्या चुकांचे पितळ उघडे पाडले. त्यामुळेच कदाचित ते सगळ्यांना जास्त आवडले.
बिझिनेस सुरू करण्याच्या छोटछोट्या चुका, कागदपत्र, अज्ञान आणि चुकांमधून शिकणे आणि शेवटी लंडनला अवॉर्ड घ्यायला जाणे हे सर्व डोळ्यांसमोर उभं राहतं. खऱ्या आयुष्यात काही गोष्टी हाताळताना नकळत शहाणपण देऊन जातं. या पुस्तकातला बीएमडब्ल्यू विकत घेताना बार्गेनींग करतानाचा किस्सा तर माझ्यातल्या व्यावहारिक व्यक्तीला प्रचंड आवडून गेलाय. लेखक तिथे लिहितो की, छोट्या मोठ्या वस्तूत बार्गेनींग करण्यात वेळ घालवण्यापेक्षा अशा लाखांच्या वस्तूत बार्गेनींग करायला जमलं पाहिजे.
वस्तूंच्या सांगितलेल्या किमतीत ५ रुपये तरी बार्गेनींग करता आली तर ती वस्तू विकत घेतल्याचं सुख लाभतं. त्यामुळे बार्गेनींग हा बहुतांश स्त्रियांचा जन्मसिद्ध हक्क असतो. म्हणून हा किस्सा आणि त्याचा आशय मनात छापला गेला. असे अनेक किस्से लेखकाने खूप प्रामाणिकपणे मांडले आहे. कसलाही अहंपणा न ठेवता हे पुस्तक लिहिल्यामुळे ते वाचकाला खिळवून ठेवत.
हे अजिबात ना storytel ॲपचे प्रमोशन आहे ना लेखकाच्या पुस्तकाचे… आज योगायोगाने हा प्रसंग घडला आणि जागतिक पुस्तक दिनामुळे तो शेअर करावासा वाटला.
माणसाला स्थैर्य द्यायला पुस्तकं पुरता की नाही माहीत नाही. पण पुस्तकं माणसाला दुसऱ्याची अस्थिरता दाखवून आपण स्थिर का होऊ शकत नाही ही समज देतात. त्यामुळे ज्या प्रकारे शक्य आहे त्या प्रकारे पुस्तकांच्या संपर्कात रहा, शांत आणि स्थिर आणि समाधानी व्हाल!
– पूजा ढेरिंगे
#जागतिकपुस्तकदिन