त्याला बाहेरच्या बाईचं भारी आकर्षण…
बाहेरच्या आणि स्वतंत्र-इंडिपेंडंट बाईचं!
तिच्या सौंदर्याचं नाही,
तिच्या असण्याचं, अस्तित्वाचं!
तो पदोपदी तिला प्रेरित करतो,
त्याला तिच्या मादकपणापेक्षा तिच्या कर्तृत्वाचा ठसठशीतपणा जास्त भाळतो.
शिवबा जन्मावा पण शेजारी,
तसं स्वतंत्र स्त्री घडावी ती शेजारी! अशा मनाचा तो आहे…
तो खूप प्रेरित करतो तिला, कौतुकाच्या लाखोल्या वाहून तिचं हसू मिळवतो…
पण ते उंबऱ्याबाहेर हं!
ती उंबर्याच्या आत आली तर झेपणार नाही तिची भरारी!
अशा भराऱ्या पाहण्याची सवय नाही त्याला, त्याच्या पिढ्यांना!
तो बाटेल, तिच्या मुक्त श्वासांनी,
त्याला भीती वाटेल, तिच्या मतांची!
तो आधीच घरात असलेल्या त्याच्या बाईला आता पूर्वीसारखा विचारत नाही,
पण त्या शेजारच्या बाईला तो भारी मोटिवेट करतो,
चुकूनही तो तिच्याशी अफेअरची स्वप्न पाहत नाही…
उलट तिच्या पंखांना बळ देतो,
ती शेजारीण गैरसमज करते,
म्हणते तुमची बायको भाग्यवान आहे तुमच्यासारखा नवरा मिळाला!
तिला त्याच्या मनाच्या भिंतींपलिकडे पाहता येत नाही,
तो तितकी काळजी घेतो…
तो तिच्यासमोर वागतो, आनंदी बाईंच्या गोपाळ सारखा,
ते पाहून तिचा तोल जाऊ लागतो…
हळूहळू तिला लागते त्याच्या कौतुकाची सवय आणि गरज..
पण तिला माहित नाही, त्याला स्वतंत्र स्त्रिया दुरून बघायला आवडतात,
तिने याच्या आयुष्याच्या उंबरठ्यावर येऊ नाही,
एक स्वतंत्र आयुष्य वाचेल!
कारण इतिहास सांगतो, बाईच्या आयुष्याला तिच्या आपल्याच माणसांनी बरबाद केलंय.
जसं पुरुष तिसऱ्या बाईच्या नादाला लागून आयुष्याला मुकतो,
तसं स्वतंत्र स्त्री मुखवटा रंगवून बसलेल्या पुरुषाच्या वागणुकीवर विश्वास ठेवून स्वत:चं आयुष्य हरवून बसते.
ही स्त्री वाचायला हवी!

अशा स्त्रीने योग्य पुरुषाच्या प्रेमात पडावं, नाहीतर प्रेमात पडूच नाही…
नाहीतर अशा स्त्रिया प्रेमात पडून प्रेम जपण्याच्या ओघात अस्तित्व विसरायला तयार होतात.स्त्रियांना प्रेम वाटण्याचं वरदान आहे, ते प्रेम योग्य व्यक्तीला समर्पित व्हावं.
– पूजा ढेरिंगे
पुरुषांना ते प्रेम सेलिब्रेट करण्याचं वरदान असतं. ते चिरकाल टिकावं…
–