द शौशैंक रिडेम्पशन

  • by


वेड्यांच्या इस्पितळात जाऊन मी वेडा नाहीये म्हणणं आणि तुरुंगात जाऊन मी निर्दोष आहे असं म्हणणं हास्यास्पद आहे. कारण हे तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्लोगन असतं. त्यामुळे कोणालाच त्यावर विश्वास बसत नाही. पण अचानक हा विषय का? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. पण जस्ट इमॅजिन, आपल्यासारख्या सरळ साध्या निर्दोष व्यक्तीला अचानक कुठल्यातरी खऱ्या खुर्या गुन्ह्याखाली तुरुंगात टाकलं तर… ? अशा गुन्ह्याशी तुम्ही नकळत योगायोगाने जोडले गेले असाल तर…? तेव्हा आपली साधारण रिअँक्शन कशी असेल?
तुमच्या हातून न घडलेल्या एखाद्या गुन्ह्याखाली याएका क्षणात तुम्हाला अटक होऊन कोर्ट तुम्हालाजन्मठेपेची वगैरे शिक्षा सुनावेल, त्यावेळी तुम्ही कसे रिॲक्ट व्हाल?
फारफार तर रडून, गयावया करून कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न करून. पण बॉस, कानून सबूत मांगता हैं।  त्यामुळे तिथे भावनिक आकांडतांडव करूनही कुणाला पाझर फुटणार नसणारे. तेव्हा आपण अस्ताव्यस्त होऊन जाऊ. कारण कोर्टाने शिक्कामोर्तब केलाय म्हणजे संपूर्ण जगासाठी आपल्या आयुष्यावर ‘गुन्हेगाराचा’ शिक्का लागणार असतो. आपल्याला कोणत्या बेसवर सावरायचं हेच कळणार नाही. अशावेळी काय सांगून मनाला आधार देणार ? त्यामुळे सगळ्या गोष्टी नियंत्रणापलीकडे जातील. कारण त्या एका घटनेनंतर आपल्याला आपण न केलेल्या चुकीमुळे वाया जाणारी कित्येक वर्षे झरझर डोळ्यासमोरून जातील आणि एवढं करूनही शेवटचा निष्कर्ष असेल की काहीही केलं तरी घडलेली गोष्ट स्वीकारायचं सोडून आपल्या हातात काहीच नसणार. त्यातून बाहेर निघायचा मार्ग नसणारे. त्यावेळी परिस्थिती स्वीकारून पुढे आपण काय करू?

माझ्या या प्रश्नांना उत्तरं देणारा ‘द शौशैंक रिडेम्पशन’ हा सिनेमा काल पहिला. आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे १९९४ मध्ये प्रदर्शित झालेला आणि त्यावेळी फ्लॉप झालेला हा सिनेमा चक्क या काही महिन्यात ट्रेंडींगमध्ये आला आहे. या मागचं कारण हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रत्येकाला कळतंच. काहींनी याआधीच पाहिला असेल पण काहीजण या विकेंडला अजून शानदार करू शकतात.
तर… मी म्हटलं तसं आपल्यासारख्या सरळमार्गी माणसाला जन्मठेप सुनावली तर… ? तर आपण नक्कीच शांत, बिनघोर, चिंतामुक्त होऊच शकणार नाही.
पण आता एंडी डुफ्रेस म्हणजेच मुव्हीचा नायक जो पेशाने बँकर असतो, त्याला गत्यंतर नाहीये. त्याला त्याच्या पत्नीच्या आणि तिच्या प्रियकराच्या हत्येसाठी गुन्हेगार ठरवलं गेलं आहे. तो अशा व्यक्तींचा गुन्हेगार सिद्ध झालाय जे या जगातच नाहीये. त्याची बाजू मांडण्यासाठी किंवा त्याला यातून सोडवण्यासाठी कोणीच मागे नाहीये.
मग काय, करतो तो तुरुंगाच्या बळकट तटबंदीत फ्रेश फिश म्हणून प्रवेश. तुरुंगातले जीवन कसे असतं याची साधारण कल्पना सगळ्यांनाच असते.
पण एंडी वेगळ्या आवेशात तिथे वावरत आहे. तो तिथलं वातावरण न्याहाळत आहे. तो पेशाने बँकर आहे. तिथले लोकं मनाला विरंगुळा म्हणून नव्या कैदीवर बेट लावून सिगारेटची पाकीटं जिंकत आहे. हे वातावरण वेगळं आहे, हेल्दी आहे.
सगळे पुरुष असलेल्या तुरुंगात किंवा सगळ्याच स्त्रिया असलेल्या तुरुंगात आणि सगळे मुलं असलेल्या शाळेत किंवा सगळ्या मुली असलेल्या शाळेत बऱ्याचदा समलैंगिक संबंधांच्या कैक कथा चार भिंतींच्या आत बंदिस्त असतात. तिथे होणाऱ्या गोष्टी काहींच्या मनाविरुद्ध काहींच्या ताकदीच्या जोरावर होत राहतात. शौशैंक यावरही भाष्य करतोय.
शिवाय आपल्याला वाटत असतं आपल्या आयुष्यात कोणीच आपले दुश्मन नाहीत, यावर शौशैंकमध्ये एक सीन दाखवला आहे. त्यात कळतं की, आपल्याही नकळत या जगात आपले दुश्मन बनत असतात. कारण आपण त्यांच्या मनाप्रमाणे वागलेलो नसतो.
चित्रपट पुढे सरकतो, तुरुंगात अडकलेला हा आपला सोज्वळ शांत बँकर स्वतःमध्ये अनेक दिवस राहतो. एक दिवस तो रेड नावाच्या जुन्या कैद्याशी ओळख वाढवतो. ही ओळख व्यावसायिक जास्त असते. एंडी रेडकडे हातोड्याची मागणी करतो. याची जुळवणुक रेड कशा पद्धतीने करत असतो याची मजा पाहण्यासारखी आहे.
या एवढ्या कडेकोट बंदोबस्तात आणि कड्या पहाऱ्यात असलेले हे कैदी कसे जगतात हे पाहण्यासारख आहे. अशाच चार भिंतीत आयुष्याची उजळणी करताना त्या तुरुंगात “बुक? … बुक?” म्हणत ब्रुक्सी एक म्हातारे गृहस्थ एका ट्रोलित पुस्तके घेऊन येतात.
तुरुंगाची फारशी ओळख नसलेल्या माझ्यासारख्या व्यक्तींसाठी हा सुखद धक्का असतो. पण रेड नावाचा कैदी म्हणतो तसं तुरुंग ही काही परीकथा नाही. त्यामुळे इथे घडणाऱ्या कुठल्याच गोष्टी मऊशार अलगद नसतात.
म्हातारा कैदी कम लायब्ररीयन बृक्सी ज्याने आयुष्यातले पन्नास वर्षे त्या तुरुंगात काढले त्याच्या आयुष्याची कल्पना करणं म्हणजे दुःख देणारं आहे. यातही तो खूप सभ्य आणि मवाळ आहे. त्यामुळे तो त्याच्यासोबत एक कावळ्याची काळजी घेत असतो. चित्रपटाच्या मध्यावर त्याच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होतो तोपर्यंत तो कावळाही आकाशात झेप घेण्यासाठी सक्षम झालेला असतो तेव्हा तो त्याला तुरुंगाबाहेर सोडतो, ते दृश्य त्याच्या आयुष्याचं वर्णन करणारं असतं. फरक फक्त एवढाच की, कावळ्याचा तो तारुण्याचा काळ असतो आणि बृक्सीचा म्हातारपणीचा. या वयात बाहेर पडणाऱ्या माणसाला तुरुंगातल्या संथ गतीची सवय होते. मग जेव्हा तो म्हातारपणात तुरुंगातून मुक्त होतो तेव्हा तो सैरभैर होतो, समाजाच्या घाईत आणि स्पर्धेत बसत नाही. तो आत्महत्या करतो. ते पाहिल्यावर वाटतं, कधीच माणसाच्या सुखाचा अंदाज लावता येत नाही. तो एखाद्या अनपेक्षित ठिकाणी सुखाने जगेल नाहीतर स्वर्गमय ठिकाणी सुद्धा मृत्यूला जवळ करेल.

मध्यांतरात सहज प्रश्न पडतो की,
जेलचं आयुष्य आणि आपलं आयुष्य यात कुठला फरक आहे ? एकच की तिथे आलेले लोक हे कुठल्यातरी गुन्ह्याच्या अपराधाखाली असतात. पण शेवटी आयुष्याचं डिजाइन असच आहे, एखादी गोष्ट सातत्याने तुमच्या सोबत होऊ लागली की त्याची सवय तरी होते नाहीतर तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधण्यात एकेक पाऊल पुढे जात राहतात. इतर कैद्यांना त्या आयुष्याची सवय होत आहे मात्र एंडी…
अपवाद आहे!
काही लोकांचा जन्म सहन केलेल्या अन्यायावर मात करण्यासाठी आणि त्याला न्यायात बदलण्यासाठी झालेला असतो.
आणि अशी एक वेळ येते जेव्हा एंडी त्याच्या स्किल्सचा वापर करून तिथल्या कडक शिस्तीच्या कठोर ऑफिसरची टॅक्स वाचवण्यात मदत करू लागतो, जेल वार्डन सैमुअलच्या सांगण्यावरून मनी-लॉन्ड्रिंग ऑपरेशनमध्ये मदत करतो. तो सगळ्यांच्या नजरेत युनिक बनतो. पण तो एक दिवस त्या सगळ्यांच्या मर्जी विरुद्ध जावून त्या तुरुंगात म्युजिक सिडी लावतो, सगळेजण चकित होऊन जातात. त्याची मोठी शिक्षा त्याला भोगावी लागते. पण त्या शिक्षेचा त्याच्यावर परिणाम होत नाही. कारण आपल्याला आयुष्यात करणाऱ्या एखाद्या असामान्य कामाचे परिणाम माहिती असून सुद्धा आपण ते काम करतो. कारण त्या कामाचं सार्थक झाल्यानंतर वाट्याला आलेले परिणाम शून्य वाटू लागतात. त्यावेळी त्याच्या मित्रांबरोबर बोलताना तो म्हणतो की, काळानुसार बऱ्याच गोष्टी बदलू शकतात. हे तुरुंग तुमच्यातून अनेक गोष्टी काढून घेऊ शकतं. पण होप, म्हणजेच उमेद अशी गोष्ट आहे ज्याला कोणीच स्पर्शही करू शकत नाही. ती उमेद एंडी शेवटापर्यंत टिकवत आहे. तुरुंगातल्या एकाकी जगात तो त्याचे अनेक छंद जपून ही आशा टिकविण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळेच तो सगळ्यांपेक्षा वेगळा वाटतोय. त्याने घडलेfली घटना स्वीकारली आहे पण येणारा भविष्यकाळ काय असेल हे तो त्याच्या हाताने घडवत आहे.
काही लोक स्वतःचं आयुष्य घडवण्यात असमर्थ असतात. ते दुसऱ्याचं बिघडवण्यात जास्त आनंद मानतात. पण एंडी इथल्या कैद्यांसाठी बनवलेल्या वाचनालयात सुधारणा करतो, तिथल्या कैद्यांना शिकवू लागली. असं ठिकाण ज्यातून अनेक कैदी घडू लागतात.
एंडी म्हटलेला तसं त्याची उमेद बनून टॉमी नावाचा देवदूत कम कैदी जो ज्या गुन्ह्याखाली एंडीला अटक होते त्यात सामील असतो. त्याचं तिथे येणं आणि गोष्टींचा उलगडा होणं अनपेक्षित असतं.
ज्या गुन्ह्याखाली त्याला तुरुंगवास भोगावा लागत होता त्याबद्दल बोलताना तो म्हणतो, मी माझ्या बायकोवर खूप प्रेम केलं. ती खूप सुंदर होती. पण ते प्रेम कस व्यक्त करायचं हेच मला कळलं नाही. त्यामुळे ती माझ्यापासुन दुर गेली आणि तिचा मर्डर करण्यात आला. गोळी माझ्या बंदुकीतून सुटली नसली तरीही तिला त्या परिस्थितीत टाकणारा मीच होतो. प्रेम व्यक्त न केल्याची एवढी मोठी शिक्षा भोगणारा हा पहिला प्रियकर असावा !

रेड, हा चाळिशी पन्नाशीत आलेला कैदी असा व्यक्ती आहे जो आपल्या आजूबाजूलाही असतो. आधार देणारी माणसं असतात ना, त्यातला हा रेड. ज्याला त्याच्या आयुष्यापेक्षा इतरांना आधार देणं, त्यांच्या गरजा पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. तो स्वतःला नेहमीच कमी लेखत आहे. तुरुंगात चाळीस वर्षे काढल्यानंतर त्याची सुटका होते. त्या सुटेकनंतर त्याची एकंदरीत अवस्था अनेक सैरभैर झालेल्या तरुणांची आहे. तो निराशेच्या खाईत जाता जाता वाचतो. एक मित्र तुम्हाला जगवू शकतो… कारण मित्राच्या सोबत असण्याने तुमचं आयुष्य आत्महत्येच्या विचाराला शिवतही नाही. रेड यातून कसा वाचतो आणि दोस्ती, यारी खरंच काय जादू करते हे पाहण्यासारख आहे.


शेवटी कोणाच्याही “सुटकेचा क्षण” उत्कंठा वाढवणारा असतो. कारण सुटका हा त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट असतो. तो सुटतो, त्याला जोडले गेलेले माणसं मात्र उगाच हळहळ करत राहतात. या चित्रपटात होणारी एंडीची सुटका ही सगळ्यात मोठी जादू आहे. इथे प्रेक्षक थेटरात उठून टाळ्या वाजवतील असा हा सीन असतो. हतोड्याची, हिरोइनच्या पोस्टरची आणि अशा बऱ्याच गोष्टींची खरी मेख इथे कळते. पण एंडीची सुटका होते आणि तो ज्या ठिकाणाहून बाहेर पडतो इथे आपल्या तोंडून आपसूक निघतं की, आयुष्य आहे यारा हे, इथे मोकळा श्वास घ्यायला काहीही करावं लागतं. शोशौंक त्याचं इन्स्पिरेशन आहे. पावसात एण्डी ज्यावेळी पळून जातो तेव्हाचा सीन डोळ्यात पाणी आणतो. आपण मोकळे झाल्यासारखं सुस्कारा टाकतो. हा सिनेमा प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देतो. कुठल्याच शंकेला जागा उरत नाही, इतका फुल्ल पॅकेज मूव्ही आहे हा. आठवड्याभराचं इंस्पिरेशन देणारं टॉनिक आहे हे!

-पूजा ढेरिंगे

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *