तुम्ही अडकून पडले अस एक ठिकाण आठवा…
तुम्हाला ठिकाण आठवेल, पण त्याला तिचं मन आठवलं. तो पुरता अडकून गेलाय तिच्यात. त्याने त्याच्या लग्नापर्यंत जपून ठेवलेलं प्रेम त्याला उधळायच आहे एकुलत्या एका तिच्यावर!
त्याची स्वप्न आहेत, तीही तिच्याबरोबर,
त्याची अपेक्षा आहे, तिच्याकडून,
त्याला प्रेम हवय तिच्याकडूनच…
वपूंच्या भाषेत सांगायचं तर, आपल्याला इच्छित व्यक्तीकडून प्रेम न मिळणं हा खरा नरक असतो. कारण प्रेम मागुन मिळत नाही. त्याला मनाच्या लाखो बुडबुड्या फुटाव्या लागतात, मनातल्या भावनांना उंचंबळून यावं लागतं. त्या बाहेरच्या व्यक्तीच्या काठाला आपल्या मनाची नाव लागली की आपला शोध संपतो.
पण नेमकं तिचं मन गुंतलेलं असतं आधीच्या तिसऱ्या व्यक्तीत. तिच्या बाजूने विचार करावा तर तिने आई वडिलांच्या इच्छे खातर लग्न केलं असेल तर तिच्या मनात आधीच्या व्यक्ती सोबत आयुष्य काढण्याची स्वप्न सुरू असतात. पण अचानक स्वप्न तुटतात, ती वास्तवात येते, गांगरून जाते. तिला वाटतं आपण त्याला धोका दिलाय, त्यामुळे आपल्याला आता नवर्यावर प्रेम करायचा हक्कच नाही उरलाय. तिचं गील्ट जास्त आहे, त्याच्याबद्दल दरदिवशी तिच्या मनात केवळ दया, सिंपथी निर्माण होतेय. अशी सिंपथी जी या लग्न केलेल्या नवऱ्याच्या प्रेमापेक्षा दुप्पट आहे.
आणि या सगळ्यात त्या नव्याने नवरदेव झालेल्या मुलाची, ज्याने प्रेम लग्नासाठी राखून ठेवलं त्याची साधी अपेक्षा असते, तिच्या प्रेमाची! पण…
त्याचा आर्थिक लॉस झालाय लग्नात असा विचार कधी त्याच्या मनात येत नाही. कारण त्याचा जो मानसिक लॉस होतोय तो न भरून निघणारा आहे. तो त्याच्या शरीराला पोखरतोय. प्रेम तर कधीच आटलय, पण तरीही मन अडकून बसलय.
अशावेळी काय करावं? हा सहज येणारा प्रश्न डोकं पोखरून टाकतो. अशावेळी भेट घडवून आणावी दोघांची. जेव्हा त्या दोघांना उत्तरं मिळतील तेव्हा लग्नात अडकलेल्या या व्यक्तीचं आयुष्य सुटेल. कारण दोघात येणारा कोणताही तिसरा व्यक्ती त्या दोघांना एकमेकांच्या जवळ येऊ देत नाही आणि तिसरा व्यक्ती गेल्याशिवाय या दोघांचं आयुष्य सुटत नाही. ही गाठ खूप घट्ट होऊन त्याचे शिकार होण्याआधी त्यातून पर्याय काढायचा आपापल्या आयुष्याच्या अडगळींचा. पर्याय निघाला की मग त्या अडगळीत बांधता येतात आपलीच नवीन घरं, दोघे मिळून नाहीतर एकट्यानेही!
– पूजा ढेरिंगे