खूप दिवसांनी बाहेर पडल्यानंतर सिग्नलला थांबलेली लोकं पाहून डोळे सैरभैर होत होते. प्रत्येकाच्या नजरेत पोटापाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामाची भूक दिसत होती. कदाचित कोरोनामुळे आपल्याला आपल्या प्रायोरिटी सेट करणं सोप्प झालं असेल. पुन्हा सगळं नॉर्मल होऊन आपण कोरोनाची तीव्रता एक दिवस विसरणार आहोत.
याच सिग्नलवर दोन तृतीयपंथी आले. त्यांच्या टाळ्यांनी अजाणत्या वयात कसतरी व्हायचं, नकळत मैत्रिणींसोबत नजरानजर होऊन हसूही यायचं. पण जोपर्यंत समाजाचं वास्तव बघण्याची नजर आणि जाणीव होत नाही तोपर्यंत समाजावर हसणं सोप्प जातं. प्रत्येकाला त्याच्या वाट्याला आलेले आयुष्य स्विकारण्याशिवाय पर्याय नसतो. आणि मी म्हणेल जो तो ज्याच्या त्याच्या परीने खूप मुश्किलीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो. आपण का जज करायचं?
त्या टाळ्यांच्या आवाजाने माझं लक्ष पुन्हा वेधलं गेलं. त्या दोघींपैकी एकीने कारची काच वाजवली. आत एक पस्तिशितला तरुण बसलेला होता. तरुण कदाचित यासाठी म्हणेल कारण शेजारी हार्ट शेपने सजवलेला फुलांचा गुच्छ होता. काच वाजवण्याआधी कार चालकाने एकदा त्यावरून हातही फिरवला होता. वाजवल्या काचेकडे बघून त्याने बटव्यात हात घातला. पण त्याच्या मनात असलेले पाच दहा रुपयाचे सुट्टे त्यात नव्हते. ती तोपर्यंत त्याला न्याहाळत होती. त्याने इशाऱ्याने सांगितलं, ‘आज नाहीये, उद्या देतो.’ त्याच्या उद्या म्हणण्यावर मी तिच्याकडून काहीतरी प्रतिक्रिया येईल या आशेने तिच्याकडे पाहिलं. तिने एक हात वर करून अच्छा …. म्हणत बायकोने त्याला घरातून विदा करावं तसा त्याचा निरोप घेतला. जणू त्यांची ती रोजची भेट होती, आज त्याच्याकडे नसले म्हणून काय उद्या तो नक्की माझ्यासाठी येईल, या विश्वासाने ती टाळ्या वाजवत पुढे गेली. ज्यांचं हातावर पोट त्यांचं आयुष्य नेहमी विश्वास आणि आशेवर टिकून राहतं.
ती निघून गेली तरी माझ्या मनात घुमत राहिलं, ‘”हिजडा/ छक्काय का तू? मर्द नाय तू हिजडा हाय, काय छक्क्यासारख वागतोय? काही छक्क्यागत लोकांना हे कळत नसतं… अँड सो ऑन” हे समाजात तुच्छ लेखून एखाद्याला हिनवण्यासाठी वापरले जाणारे पर्यायवाची. शिवी द्यावी तसेच!
छक्का/ हिजडा ही शिवी नसू शकते. जर ती शिवी असेल तर स्त्री आणि पुरुष या सुद्धा शिव्याच ठरतील. तृतीयपंथींचा काहींना रेल्वे किंवा रस्त्यांवर खूप त्रास होतो, काहीजण तीव्र मनस्तापात त्यांच्याबद्दल बोलतात. पण पुरुष आणि स्त्री कडून तुम्हाला मनस्ताप नाही होत का? मग त्यांचं अस्तित्व जसं स्वीकारलं गेलंय, तसं यांचं का नाही? जस्ट बिकॉज त्यांचा ‘जन्म नैसर्गिकरीत्या’ हे तुम्ही ठरवल म्हणून ते योग्य हा समज का?. समाज म्हणून आपण त्यांना देत असलेल्या वागणुकीतून त्यांचं हे रूप तयार झालं आहे. समाजाकडून जर ते स्वीकारले गेले तर या अशा पद्धतीने ना तुम्ही त्यांना सामोरे जाल ना ते तुम्हाला! ते सुद्धा या समाजरचनेचा भाग असूनही त्यांना अशा पद्धतीने बघणं, वागवणे, हसणं हे माणसाचं लक्षण वाटते का? एखाद्याला हिनवल्यामुळे आपला जन्म किती महान अशा भ्रमात जगणारे जीव केविलवाणे वाटतात. निसर्गतः जे वाट्याला आले त्याला हसण्याचा, त्याची खिल्ली उडवण्याचा कोणता अधिकार घेऊन जन्माला आलेले असतात तुम्ही? त्यांचं अस्तित्व ते सरपंच, न्यायाधीश, एच आर, राजकारणात, समाजसेविका, मोटिवेशनल स्पीकर बनून सिद्ध करत आहेत. शिवाय कायद्याने त्यांचं अस्तित्व मान्य झालेलं असताना आपल्या नजरेत पूर्वीच्याच व्याख्या का? सध्याची परिस्थिती बिकट आहे, प्रत्येकाला आधाराची गरज असते. समाज म्हणून थोडं समृध्द होण्याच्या दिशेने जाऊया का?
~ पूजा ढेरिंगे