तुम्ही पण फिरायला निघायचं डोक्यात जरी आलं तरी म्हणता का की, सेटल झाल्यावर, लग्न झाल्यावर, पैसे कमावल्यावर, मुलं मोठी झाल्यावर, चाळिशी नंतर फिरायला जाऊ?
म्हणजे आज तिशीत पुढच्या १५-२० वर्षाचे स्वप्न पाहता.
शिमला, मनाली, काश्मीर, हंपी, केरळ, मालदिव्ज, पॅरिस मिस करताय का?
ज्यावेळी तुमच्या डोक्यात येतं ना फिरायला जायला हवं तो विचार तिथेच थांबवून पुढे अनेक प्रॉब्लेम्स डोक्यात येण्याआधी बुकिंग स्टार्ट करावं. कारण ज्यावेळी तुमच्या आयुष्यात ट्रॅवलिंगचा विचार येतो, तोच टाईम तुमच्यासाठी योग्य असतो.
आयुष्याचा एक नियम आहे,
“आता या क्षणाला जे आहे तेच, नाही तर कधीच नाही!”
जे काही दुःख, सुख, मायाळू, कनवाळू, दर्दी, मायुस होणं हे सगळंच खरं आहे जर ते त्या त्या क्षणाला जगलं तर…
नाहीतर कशाचंच काही खरं नाही.
भविष्य हा शब्द फक्त काळासाठी राखीव आहे.
माणूस त्यात अडकला की तो वर्तमानातून वजा झालाच समजायचं. याचा प्रत्यय आणि याचा रिॲलिटी चेक उंचाई या अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अनुपम खेर, सारिका ठाकूर, डॅनी देंझोंगपा, नीना गुप्ता, परिणीती चोप्रा यांचा ताजाताजा आलेला कमाल थीमवर आधारित चित्रपट पाहताना येतो.
म्हातारपणात फिरताना काय काय होऊ शकतं, कोणत्या अडचणी येतात, ज्येष्ठ नागरिक म्हटल्यावर जे आयुष्य समोर येतं हे डिटेल डोळ्यासमोर दिसत असतं. वयाला पर्याय नसतो.
पण या चित्रपटात एवढ्या मोठ्या वयात ते या आव्हानाला कसे घेतात आणि या वयातही जो उत्साह आहे तो कौतुकास्पद आहे.
फक्त मित्राच्या खातर एव्हरेस्ट बेस कँपपर्यंत जाणे हा विचार येताच, कशा प्रतिक्रिया येतील हे अतिशय नैसर्गिकरित्या दाखवलं आहे. तसेच एव्हरेस्टला जाणे कसे अवघड आहे आणि सोपे करता येईल हे सुद्धा खूप चौकसपणे दाखवले.
सिनेमात प्रत्येक कलाकाराने भूमिकेला आपलंसं केलय, याचं मुख्य कारण म्हणजे चित्रपटाची कथा ज्या वयातल्या पात्रांसाठी लिहिली, त्याच वयातले अभिनेते, अभिनेत्री त्या भूमिका करत आहे किंवा कदाचित त्यांचं खरं वय जगत आहे.
त्यामुळे हा अभिनय करणं सोप्पं काम नव्हतं, हे लक्षात घ्या !
वेरी रिफ्रेशिंग आणि हॅपी – सॅड कंटेंट असल्यामुळे अनपेक्षित आणि त्याचवेळी मनाला सुखावणारा आहे. कारण ट्रॅवलिंग माझ्या हृदयाच्या खूप जवळचा विषय आहे. कारण प्रवास प्रत्येकाला त्याचा भूतकाळ विसरून वर्तमानात जगायला लावतो. भूतकाळातला कठीण, संघर्षाचा काळ विसरायला लावतो.
एकटं असूनही आपण किती पूर्ण असतो हे सांगतो. आपल्या श्वासांची आपल्याला सोबत तेवढंच काय ते खरं!
चित्रपटात प्रत्येक अभिनेत्याचे प्रोफेशन वेगवेगळे दाखवले आहे आणि त्यानुसारच त्यांचे स्वभाव सुद्धा. यातले अभिनेते प्रत्येक त्या ज्येष्ठांचे प्रतिनिधित्व करतो, ज्याच्या आयुष्यात म्हातारपणात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे, निर्माण होणार आहेत, तो त्या कथेशी जुळवून घेईल.
मोठं झाल्यावर, म्हातारं झाल्यावर जबाबदाऱ्या, काम, पैसा, खर्च, हिशेब आधी मांडला जातो आणि मग उरलच तर प्रेम! आणि या वयात सतत डोळ्यासमोर, डोक्यात येणारे मृत्यूचे, धक्कादायक प्रसंगांचे वावटळ सामोरं येत राहतं.
चित्रपटात अनेक असे प्रसंग आहे जे नॉस्टॅल्जिक (ओढ लावणारे) आहे. डोळ्यात पाणी येऊन जातं पण तितक्याच ओघात मुव्ह ऑन होऊन सुखद, सकारात्मक प्रसंग येतात.
तुम्हाला वाटेल यात सगळच ज्येष्ठ नागरिकांबद्दल असेल तर बघायला किती बोअर होईल. पण जर तुम्ही हा चित्रपट मिस केला तर खरंच काहीतरी फ्रेश आणि ओरिजनल मिस कराल.
स्वप्न पुढे ढकलले तरीही ती पुढेच जातात. पूर्ण नाही होत.
“ये जीवन हैं, इस जीवन का यहीं हैं यहीं हैं यहीं हैं रंग रूप” हेच भूपेन साठी आवडीचं गाणं का होतं याचा अर्थ उमगतो. भूपेन असं पात्र आहे जे जन्म तर स्वतः घेतं पण दुसऱ्यांना जूनच आयुष्य नव्याने देऊन जातो.
या सगळ्यात आपल्या आयुष्यात एखाद्या माणसाचं आयुष्य आपण किती गृहीत धरतो, त्याच्या वागण्यामुळे आपल्याला वाटतं की तो नेहमीच आपल्या सोबत असणार आहे, अमिताभचं पात्र याबद्दल खूप काही सांगून जातं. कसं दुसऱ्यांना पुढे नेण्याच्या हसवण्याच्या नादात एक माणूस असाच अनपेक्षित सुटून जातो. तो नेहमी एकटाच असतो, त्याचं स्ट्रगल एकटं असतं. पण तरी त्याचा जजबा लाजवाब असतो, तो आयुष्याला मिठीत घेऊन जगणारा असतो.
एका प्रसंगात तर अमिताभ जेव्हा पुलावरून जात असतो तेव्हा या आव्हानांची खूप जाणीव होते. त्यावेळी एका ठिकाणी अमिताभ खूप शांत, स्थिर बसलेले असतात, तो अभिनय जीवात घालमेल करून जातो. असे अनेक छोटे मोठे प्रसंग जीव टाकतात सिनेमात.
तसं पाहिलं तर आपल्या आयुष्यात रोज सूर्य उगवतो, कामं सुरू होतात, नोकरीवर जातो, नोकरीवरून घरी परत येताना सूर्यास्त पाहायला मिळतो. पण अचानक एक दिवस सूर्योदय पाहणं, घरी येणं, सूर्यास्त पाहणं होणार नाही. हे रोजचं कधीतरी शेवटचं होणारे. पण त्याआधी जे जगू त्यासाठी माणसाचा जन्म असावा कदाचित!
चित्रपटात सगळं शेवटी छान होतं, न सुटणारे प्रॉब्लेम्स सुटतात. पण खऱ्या आयुष्यात ते होईलच असं नाही. पण ट्रॅव्हलिंगने तुमचा त्या प्रॉब्लेम्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल, ही खात्री आहे.
आपल्या स्वप्नांची उंची आपण ठरवायची, त्यासाठी ऊंचाई पहावा!
मी अजिबात म्हणणार नाही की हा बेस्टेस्ट मूव्ही आहे, ज्यांना इमोशनल सिनेमे आवडत नाही, त्यांनी नाही पाहिला तरी चालेल. पण ज्यांना वेगळा कंटेंट पाहायला आवडतो, त्यांनी हा मिस करू नाही.
-पूजा ढेरिंगे