युपीएससी शर्यत उमेदीची…

एक वय तुमच्याही वाट्याला आलं असेल…
असं वय जिथे तुमचं बेसिक शिक्षण संपलं आहे, भविष्याच्या दृष्टीने करियरची दिशा निवडायची आहे, त्यावरून तुम्हाला जॉब कोणता, कसा मिळेल आणि महिन्याला हातात किती रोजगार ठेवेल याचा अंदाज येईल. त्या अंदाजवरून तुमच्या ऐपतीची मुलगी बायको म्हणून ठरणार असते. म्हणजे नोकरी हा तुमच्या भविष्याचा केंद्रबिंदू असतो. काहींचा व्यवसायही असतो. पण अल्टिमेटली महिन्याला मिळणारा पैसा तुमचं भविष्य ठरवणार असतो. तुमची नोकरी स्थिर असेल, तर तुम्हाला कसली चिंताच नाही ना… आणि अशी स्थिर, निवांत, कामचुकार नोकरी म्हटलं की सरकारी नोकऱ्या आठवतात. पण या नोकऱ्या आंबट द्राक्षांसारख्या असतात. खूप कमी लोकांच्या हाती येणाऱ्या… काही खूप पडाखु, बुद्धिवान असतात, अशांची निवड चुकवणाऱ्या या नोकऱ्या आणि यांच्या परीक्षा! युपीएसी, एमपीएससी स्पर्धापरीक्षा…

हो स्पर्धापरीक्षा…! ज्याच्यासाठी प्रत्येक राज्यात एकेक भाग राखून ठेवलेला असतो.
ही प्रस्तावना यासाठी की, काल युपीएसी अस्पिरंट्स सीरिज पाहायला बसले होते.
एक, दोन, तीन, चार, पाच करत करत मागे वळून पाहिल्यावर आयुष्याचे सहा वर्ष गायब? आणि आत्मविश्वास ? जमिनीच्या आत गाडला जातो.  या नोटवर सुरू होणारी टिव्हीएफची युपीएसी अस्पिरंट्स सीरिज… नावातून कळतं की ही सीरिज म्हणजे युपीएसी परीक्षेची तयारी करणाऱ्यांचे आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न आहे. प्रयोग नवीन आहे, याआधी अशा कॉन्सेप्टवर इतकी वास्तविक, विनोदी आणि रंजक सीरिज मी तरी पहिली नाही.

युपीएसीची तयारी करणाऱ्यांचा दिनक्रम, सकाळी सेल्फ मोटिवेट करून उठणं, टपरीवरचा कटिंग, (एकदा, दोनदा नाही जेव्हा जेव्हा झोप येईल तेव्हा), त्या टपरीवरून रोजच्या रस्त्याने जाणाऱ्या लोकांची आयुष्य न्याहाळणे, सोबतीला चार दोन मित्र, जेवायला तेच रोजच्या मेसचं नावडीच जेवण, अपडेटेड राहण्यासाठी प्रत्येक ट्रेण्ड पाहणं, पुस्तकं, वर्तमानपत्र यांची प्रत्येक बारीक काठ तपासणे, जुने पेपर सोडवणे, प्री मेन्सच्या वर्तुळात एकेका मार्कासाठी दिवसरात्र अभ्यासाचा विचार करणं, होऊन गेलेल्या अनेक बड्या अधिकाऱ्यांचे मोटिवेशनल भाषणं ऐकणे, त्यानुसार मुलाखतीची तयारी करणं आणि या प्रेशरमध्ये एखादी मुलगी पटली तर प्रेम करून त्याचवेळी अभ्यासावरही फोकस करणं. पण मुलीमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल, म्हणून प्रेम करून पुढे जावं की नाही या द्विधा मनस्थितीत असणं.

हाताला काम असलं की माणसाचा मेंदू जितका हेल्दी असतो, तितकाच दसपट नकारात्मक तो रिकामं असताना असतो. या नाजूक वयात ही नकारात्मकता घालवण्यासाठी अनेक मुलं प्रेम, पोर्न, फेक अकाउंट्सचा वापर करतात. त्यातून लवकर सावरलं नाही तर नैराश्य निश्चित असतच. पण या व्यतिरिक्त काही मुलं सिरीजमधल्या अभिलाषसारखी असतात. स्वतःच्या स्वप्नासाठी सगळं सुरळीत असताना प्रेमापासून दूर जाणारे. ज्याचं ध्येय स्पष्ट असतं, तिथे अचानक घडणारे चांगले बदल मागे ठेवता यायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी अभिलाष चुकीचा वाटतो आणि एसके पटत जातो. या दोघांना सोबत करणारा गूरी, सगळ्यात रिलॅक्स माणूस आहे. त्याच्यासारखे प्लॅन बी प्रत्येकाच्या आयुष्यात असावा. युपीएसी नाही क्लिअर झाली तर काय?… या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे होतं, त्यामुळे तो रिलॅक्स, तो सुखी!

तुम्हाला हेही आवडेल; http://manmarziyaan.in/family-man-2-review-really-worth-to-watch/

आपल्या ओळखीत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे अनेक असतात. सदाशिव पेठ, नवी पेठेत ढिगाने पडलेत. तिथे स्वप्न बघणारे अनेक डोळे अहोरात्र उमेदीच्या जोरावर साल दरसाल हा भला मोठा अभ्यास करतात. लाखोंच्या संख्येने सहभागी होऊन मूठभर यातून पास होऊन बाहेर पडतात. देशाची सेवा, सरकारी नोकरी, नोकरीनंतर हवी तशी बायको आणि आयुष्याचं गणित सेट! या क्रमाने स्वप्न पाहणारे अनेक डोके फक्त स्वप्नांच्या हिमतीवर अभ्यास करत राहतात अन् वर्षांमागून वर्ष जातात तसं परीक्षा क्लिअर न होण्यात अनुभवी होत जातात. दे मौका जिंदगी म्हणत अनेक वर्ष हरवलेल्या आत्मविश्वासात घालवतात. हिंमत हरत नाही, आईवडील मोठ्या आशेने त्यांच्याकडे आस लावून असतात. वयाच्या पंचविशीत सुद्धा ही आस लावून बसलेले तरुण पाहीले की मग मात्र त्यांच्या हिमतीची दाद द्यावी की त्यांना त्यांच्या स्वप्नातून जागं करावं हे कळत नाही.

कधी कधी त्यांच्या जागी राहून विचार केला तर चिडही येते.  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी पार्ट टाईम नोकरी करून पार्ट टाईम अभ्यास करावा असही वाटतं. त्याने आई वडिलांवर खर्चाचा भार येणार नाही. तुमची स्वप्न शाबूत राहतील. अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो, पण या सीरिजमध्ये जितक्या पोटतिडकीने अशा अस्पीरंट्सची व्यथा चित्रित केली आहे, त्याने नकळत विचारांचा प्रवाह सुरू होतो. त्यांची जिद्द, मेहनत, चिकाटी, प्रयत्नांचे परमोच्च टोक आणि विशेषतः या कोरोना काळात हरलेली उमेद… यावेळी पुण्यात गेल्या दिवसांत स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्यामुळे घडलेल्या विद्रोहाची, संतापाची कारणं समजत जातात.


तसं पाहिलं तर वीस ते तीस वयात आपण सगळेच थोडेफार हतबल, असुरक्षित असतो. स्पेशली नोकरी, व्यवसायाच्या बाबतीत. पण एका सुरक्षित नोकरीसाठी आयुष्याची एवढी वर्ष दावणीला लावणे म्हणजे काय याचा अंदाज ही सीरिज पाहिल्यावर येतो. हलकेच या सीरिजमधले मुख्य पात्र, एसके, अभिलाष आणि गुरी एका वेगळ्या जिद्दीने स्वप्न बघण्याच्या दुनियेत घेऊन जातात. त्यांना या युपीएसीच्या जगात ट्रायपॉड म्हणून ओळखायचे. या तिघांची पात्र इतकी कॉमन आहेत, पण त्यामुळेच आपलीशी करणारी आहेत. सिरिजच्या सुरुवातीपासून एक ओळ सतत म्हटली जाते, ‘राजेंद्र नगर के रिश्ते यहीं राजेंद्र नगर में ही छुट जाते हैं, चाहे दोस्ती के हो या प्यार के’|
दोस्ती, प्रेम आणि युपीएससी या तिन्हीं भोवती फिरणारी ही गोष्ट आहे. या पात्रांना काही टप्प्यांवर पडणारे प्रश्न इतके प्रॅक्टिकल वाटतात, जे आपल्या वैयक्तिक प्रश्नांची उत्तरं देऊन जातात. वेगळी सीरिज आहे, मसालेदार तडक्यापेक्षा जास्त रंजक बनवली आहे, माहोल वेगळा आहे, कथा कॉमन आहे, पण पद्धत वेगळी आहे. नक्की पहा!

-पूजा ढेरिंगे

Please follow and like us:
error

1 thought on “युपीएससी शर्यत उमेदीची…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *