काहीतरी व्हावं नि आपलं आणि एका अनोळखीचे आयुष्यभरासाठी प्रेम जुळावे एवढा योगायोग घडतो का? योगायोगावर माझा विश्वास नाही. कारण आपण नाही, प्रेम” आपल्याला निवडतं!” असं मला वाटतं.
आज अचानक कुठलीतरी तंद्री लागली आणि आम्ही बोलू लागलो. व्हॅलेंटाईनचा अरोमा असावा बहुदा! पण मला जे त्या क्षणी आतून वाटत होतं मी त्याला बोलत होते सहजच…. कपड्यांच्या घड्या घालत मी त्याच्याशी बोलत होते. तो आज अगदी निवांत, पायावर पाय मारून शून्यात बघत शांत होता. मला शांत बसवत नाही, त्याला शांत बसूनही न विचार करता राहता येतं. मी माझ्या मनात चाललेल्या प्रेमाचा विचार त्याला बोलून दाखवत होते.
प्रेमाला एक सजीव मानावं ना, इतका जिव्हाळा जाणवतो मला आपल्या प्रेमातल्या नात्यात…
हो, कारण निर्जीव वस्तूत तू रमत नाही. तो चटकन म्हणाला.
अरे वाह! एवढ्या चटकन मनातलं ओळखलस… पण हो, त्यामुळेच! प्रेम मला जिवंत ठेवायचंय, म्हणून त्याला सजीव म्हटलं तर मला त्याच्याशी लगेच जुळवून घेता येईल. कारण जर प्रेमाला सजीव म्हटलं तर, जगातल्या सगळ्या उन्हाने तापलेल्या उष्ण माणसांमध्ये, मला तू म्हणजे माझा जोडीदार “झाडासारखा” वाटतो. गार, निस्सीम सावलीने शहाळलेल झाड!
प्रेमाला सजीव म्हटलं तर, ते प्रेम कोणत्याही रूपात फिट होऊन जातं, अगदी पाण्यासारखं! झाडाने चोरपावलांनी यावं नि पाण्यात मिसळून जावं… आणि मी तरत राहावं पाण्याच्या ओंजळीवर! हे अन् एवढंच तर प्रेम आहे ना ?
पटतंय ना?
त्यालाही मान्य आहे. तेव्हा तो म्हणतो, “किती एकनिष्ठ अन् आयुष्यभरासाठी ओवाळून टाकावं असं, शहामृगासारखं प्रेम करतेस ग तू! स्त्रियांचा हा मूळ स्वभावच असतो जणू! जसं शहामृगाचं जोडपं आयुष्यभर केवळ एकमेकांसाठी जगतात… तुला माहितीये, दोघांपैकी एकजण मरण पावला तर, दुसरा सोबती अन्न पाण्याचा त्याग करून पंधरा ते वीस दिवसांत मरण पावतो. दोघेजण ताकदीचे असतील, ज्यांच्यात प्रेम निभावण्याची ‘लायकी’ असेल, त्यांनी खुशाल बेफाम, बेछूट जगत राहावं शहामृगासारख, दुनियेला झिडकारून…” तो बोलून पुन्हा शांत, निवांत बसला.
हा प्रेमाचा संवाद आम्ही बऱ्याचदा कुठून सुरू करून कुठेही नेऊन ठेवतो. प्रवासातल्या सोबत्या सारखे आम्ही फक्त संवादासोबत वाहवत जातो.
तेव्हा मला सहज वाटलं की, प्रेम माणसाच्या चेहऱ्यावर, आयुष्यावर आणि भविष्यावर परिणाम करत असतं. त्यामुळे प्रेमाची निवड आणि निवड केल्यानंतर जपणूक चिरकाल टिकवावी… नाहीच जमलं तर प्रेम करताना प्रेमामध्ये, प्रेमामुळे जगत असलेल्या अनेकांना पाहावं… बघावं दोन कबुतरांच्या जोडप्याला, नाहीतर दोन हातांना, फार नाहीतर बघावं स्वतःच प्रेमात पडलेल्या स्वतःला आणि त्याला! नि रमून जावं, झाडाच्या सावलीखाली पाण्याच्या प्रवाहात…
सूर्य आणि रोप … बघितलंय कधी ? रोप नेहमी सूर्याच्या दिशेने वळत असतं. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले जोडपं हे! ज्यांची भेट तर कुठल्याच जन्मी अशक्य! तरीही आपल्या प्रेमाच्या भेटीच्या उमेदीचा जन्म या दोघांतून होत असावा बहुदा…
प्रेमाला निसर्गाच्या जेवढ्या उपमा देऊ तेवढं कमी ठरेल! निसर्ग जसा स्वतःच्या गुणधर्माला चिकटून राहतो, तसचं प्रेम असावं! एकमेकांसाठी एकनिष्ठ! एकमेकांना धरून, कुरवाळुन घट्ट! त्यामुळे प्रेम करताना माणसाचा निसर्ग होऊ लागतो, होत नसेल तर निसर्ग व्हावा!
– पूजा ढेरिंगे
❤️❤️❤️❤️❤️
अप्रतिम लिहलंय