वेड सिनेमाने हाईलाईट केलेली गोष्ट म्हणजे माणसाच्या आयुष्यात व्यक्तीवरच्या प्रेमाव्यतिरिक्त अजून एक प्रेम म्हणजेच वेड असावं, ते म्हणजे आपल्या छंदावरच प्रेम! जसं मुख्य अभिनेता सत्याच्या आयुष्यात क्रिकेट आहे तसचं!
तो छंद आपलं अस्तित्व असतो.
चित्रपटाचा रात्रीचा शो हाऊसफुल्ल होतो, कारण आमच्या सारखा सगळ्यांचा अचानक प्लॅन बनतो. थिएटरला इतर सिनेमे असतानाही आपल्या माणसासाठी सिनेमा पाहायचा म्हणून वेड काहीतरी करून बघायचाच, हा हट्टच करून पुण्यातले सगळे थिएटर चेक केले. कारण प्रत्येक १० मिनिटांनी मेन मेन सीट बुक होत होते.
पण इतक्या अडथळ्यांमध्ये इच्छाशक्ती जिंकली आणि आम्ही वेड पाहिला.
वेडच्या पहिल्याच फ्रेमने वेड लागतं.
आपल्या मनातलं खरं प्रेम आणि आपल्या मनातल्या कल्पनेतलं प्रेम खूप वेगळं असतं.
आपण प्रेमात काय काय करू आणि आपण त्या एका व्यक्तीसाठी कोणत्या लेव्हलला जाऊ याची कल्पना खूप आकर्षक असते. जीव लावावी इतकी प्रायव्हेट असते.
त्यामुळे वेड सुरू होताच पहिल्याच फ्रेमने वॉव व्हायला होतं. त्या फ्रेममध्ये रितेश देशमुख दारू पिऊन समुद्र किनारी बेफाम होऊन पडलाय. प्रेम म्हटलं की समुद्र आणि पाऊस जिवलग होतात आणि तिच्या / त्याच्या सोबत समुद्र किनारी अन् पावसात वेळ घालवणं याच्या फक्त कल्पनेने त्या प्रेम करणाऱ्याच्या अंगावर शहारे येतात.
प्रत्येकजण मनात म्हणत असावा,
प्रत्येकाचं प्रेम वेगळं,
प्रत्येकासाठी ते स्पेशल असतं!
प्रत्येकाचं वेड वेगळच असतं,
असंच नाही ना सोडून देता येत !
या सोडून न देण्यामुळे अनेक लव्ह स्टोरी यशस्वी होतात. कारण प्रेमात फायनल परीक्षा येते, तिथे जिंकणारे जगतात.
चित्रपट पाहताना “एक साद मी, जी ऐकुही नाही आली” वेड चित्रपटातल्या गाण्यातली ही एक ओळ खूप वेळ मनात घुमत राहिली. म्हणजे असं कुणीतरी आपल्याही आयुष्याच्या बॅकग्राऊडला असतं ना, जे असतं पण ऐकूही येत नाही. ज्याच्या असण्याकडे, ज्याच्या प्रेमाकडे आपलं लक्षही जात नाही.
माणूस पण भयाण समीकरण असतो, म्हणजे दुसऱ्याच्या आधाराने जगत असणारे आपण तिसऱ्या कोणाला तरी आधार देत असतो. जेवायचे कुठेतरी आणि माया लावायची तिसऱ्याच कोणालातरी!
पण खूप काळ दुर्लक्ष नाही करता येत. आपण ठरवलं तरी आयुष्य आपल्याला ते करूच देत नाही. आयुष्य आपल्या पुढ्यात वेगळाच डाव मांडतो ज्यात आपले खेळाडूच बदललेले असतात. तसेच काहीसं त्रिकोण ट्रायअँगल प्रेम या सिनेमात आहे.
यामध्ये अशोक मामाने आजही त्यांच्या कॉमिक टायमिंगने स्पेशल चव आणली आहे. जितकी विनोदी हावभावाने गंमत आणली, तितकीच त्यांच्या दुःखी प्रसंगाने त्रास झाला. त्यांच्यातल्या आजपर्यंतच्या कामाच्या मेहनतीतून रंगलेला अभिनयातील समंजसपणा प्रेक्षक म्हणून खूप आश्वस्थ करतो. हा माणूस आहे म्हणजे चित्रपट रंगणारच असं वाटू लागतं.
चित्रपटात दाखवलेलं त्यांचं आणि सूनेच म्हणजे जिनेलियाचे नातं हळूहळू खूप आवडीच वाटू लागतं. कारण हे नातं वेगळं आहे, बऱ्याच मुलींचे सासरे हे अबोल असतात किंवा कठोर असतात. सुनेच्या दुखापर्यंत पोहोचून विचार करतील असे सासरे खूप कमी मुलींच्या नशिबी असतात. त्यातला एक सीन तर चेरी ऑन द केक आहे. ज्यात जिनेलिया आणि अशोक मामा तुळशीच्या रोपट्यासमोर बसून समदुःखी होऊन एकमेकांशी सत्या बद्दल बोलताय, व्यक्त होताय, तो सीन अनबिटेबल आहे. त्यावेळी आपण त्यांचे होऊन जातो. तो सीन यापूर्वी कधी झालाय किंवा न झालंय माहीत नाही पण तेवढ्या एका सीनसाठी सून आणि सासरा, कसे दुःखाच्या वेदनेतून वडील आणि मुलगी होतात हे सांगण्याची गरज वाटत नाही.
जेनेलियाच्या एन्ट्रीपासून ते शेवटपर्यंत ती जी मेहनत घेते ती लाजवाब आहे. भाषेचा अस्खलितपणा जमला नसला तरीही तिच्या अभिनयातून ती आपल्याला स्वीकारायला भाग पाडते. तिच्या बरोबरच चिमुरड्या मुलीचा अभिनय खूप नॅचरल असल्यामुळे ती खूप जवळची वाटून जाते.
एखाद्याच्या प्रेमात आपण इतके बुडून जातो का? तो व्यक्ती आपलं पूर्ण आयुष्य व्हावं इतके ? या प्रश्नाचं उत्तर कुठल्याही अटींशिवाय “हो” एवढंच असू शकतं.
या दरम्यान काही इमोशनल सीन वेगळा अनुभव आहे. मॉडर्न आणि ट्रॅडिशनल रुढींचे कॉम्बिनेशन म्हणजे हा सिनेमा! एके ठिकाणी सत्या म्हणतो,
“पॉईंटलेस अग्रेशन म्हणजेच दिशाहीन राग काय कामाचा” हे चित्रपटातील आवडलेल वाक्य!
प्रेम शहाणं झालं की ते प्रेम नाही उरत.
प्रेमाचं वेड असण्यातच प्रेम आयुष्यभर टिकणं आहे.
वेड हा सुपरहिट चित्रपट म्हणणार नाही, पण वन टाईम वॉच नक्की आहे.
- पूजा ढेरिंगे