विक्रम गोखले ; पॉज किंग

  • by

विक्रमजींना समोरून पाहण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा योग एकदा आलेला. त्यावेळी मी नुकतीच बारावी पास झालेले. तेव्हा एका कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून आलेले. तेव्हा प्रत्येक अभिनेत्याला ज्याप्रमाणे आपण “बिग फॅन” म्हणतो त्या उथळ आवेषात मी त्यांच्या सोबत फोटो काढण्यासाठी काहीतरी म्हणावं तसं मनातल्या मनात वाक्यांची जुळवाजुळव करत म्हटलं,” मी तुमच्या चित्रपटांची मोठी फॅन आहे” आता या वाक्याला माझी मीच काँट्राडीक्ट करू शकते. ते म्हणजे चित्रपटापेक्षा मी त्यांच्या अभिनयाची फॅन आहे. पण तेवढ्या गर्दीत सुद्धा त्यांनी मला प्रतिप्रश्न केला, “कोणकोणते चित्रपट पाहिले माझे?” मी बिनधास्त म्हटले, हम दिल दे चुके सनम, नटसम्राट… आणि मोठ्ठा पॉज. शांतता पसरली. त्यांनी त्याच त्यांच्या गंभीर शैलीत म्हटलं, “बस्स एवढेच?”

त्यांच्या त्या प्रश्नाने माहीत नाही का पण मी एक पाऊल मागे गेले. फोटो कॅन्सल करून नेमकं जे चुकलं त्याबद्दल विचार सुरू झाले. त्यांना माझ्या थ्रू हे कळणार होतं की आजची तरुण पिढी त्यांच्या बद्दल कित्ती जाणते. त्यामुळे त्यांचा माझ्या उत्तरावर असा स्वर निघणं जायज होतं. त्यात त्यांना आणि मला दोघांना जे वाईट वाटलं ते नातं प्रेक्षक आणि कलाकारातील होतं. त्या प्रसंगानंतर मी ज्या कलाकाराबद्दल आपल्याला जास्त माहीत नाही त्यांना पर्सनली जाऊन भेटायचं नाही ठरवलं. या प्रसंगात विक्रमजींनी माझा अपमान केला का असे प्रश्न सुद्धा नंतर पडले. पण माझ्या त्या प्रश्नाला नेहमीच त्यांच्या अभिनयाने उत्तर दिलं, कधी कधी अनुत्तरित केले. नटसम्राट मधल्या गोखलेंनी मला खरंच आजही निशब्द ठेवले आहे. त्यांचा तो खऱ्या आयुष्यातला धीर गंभीर अंदाज त्यांच्या अभिनयाला धार देत होता. मध्यंतरीच्या काळात त्यांचे वैचारिक दृष्टिकोन मतभेद निर्माण करणारे होते. पण पुन्हा तेच माणूस म्हटल्यावर मतभेद असणार, पण त्यांच्या अभिनयाबद्दल कधीही संदेह निर्माण झाला नाही, होणार नाही. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेला गदारोळ आणि जाण्याची नेमकी तारीख तिथल्या साक्षीदारांना ठाऊक! पण सामान्य माणसाच्या मनात त्यांचा ठसा नेहमीच त्यांच्या अभिनयाने अढळ राहणार आहे. वैचारिक मतभेदांमुळे कलेला मुकणे हे प्रेक्षकाचे नुकसान असते! त्यामुळेच वैयक्तिक अनुभव काहीही शिकवून गेला असला तरी लेख लिहिण्याची सुरुवात करताना विक्रमजी म्हणणं टाळलं नाही. ती त्या ग्रेट नटाला एका सामान्य प्रेक्षकाने दिलेला आदर आणि त्याच्या कलाकृतीला वाहिलेली आदरांजली असते. – पूजा ढेरिंगे #vikramgokhle #विक्रमगोखले #HumDilDeChukeSanam #Natsamrat #नटसम्राट

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *