मित्र येईल भेटायला?

  • by

तुझ्या आठवणींचा क्षितिज डोकावत आहे.
होय, क्षितिजच! तो यासाठी कि आपली भेट हि ‘पुढच्या महिन्यात नक्की भेटायचं’ म्हणत साडेतीन वर्षांपासून खोटा आभास देतेय. पण आज ओढ पूरान्या भेटीची वाढत आहे. म्हणून सांगतेय, तू हा सूर्य मावळतीला जाताना वाट परतीची घेऊन ये, रातच्याला!

कुठे थोड्याशा गप्पांना पूर्वीसारखं उधाण आणू,
थोडी कुजबुज दिल्ली, मुंबई, पुण्याची करू. नोकरी गेली खड्ड्यात,
गच्चीवर बिनधास्त बसून फेसाळल्या चहाला थंडीचा प्रियकर बनवून तू आणलेल्या चाफ्याचा गंध शिंपडू.
कुडकुडणाऱ्या थंडीला चहाचा स्पर्श देत, चहा नि थंडीची लव्ह स्टोरी सुरु करू.
नाही म्हणत म्हणत “मुलगा नि मुलगी बेशरम दोस्त असता” याचे जुने किस्से उघडून हसू.

सूर्याची मावळण सरताना रात्रीला अंधाराच्या कुशीत निजवून चंद्राला कपल्सकडे रवाना करून आपण आधीसारखा लॉन्ग नाईट गप्पांचा फडशा पाडू! तुझ्यातले बेसूर गीतकार, थोडेसे छुपे गुलजार, अमृता इमरोज, काहीशा जुन्या एक्सच्या टिंगल टवाळ्या नि माझ्या फिलॉसॉफिकल प्रेमाचे बोरिंग शेर वाचू!
जुन्या टेन्शनफ्री आठवणी, एक घोट चहाचा! करत थंडीला अंगाशी लपेटून चहाचे तीनेक कप सहज पिऊन घेऊ. मध्येच तुटक तुटक बोलताना हळव्या विषयाचं बोट धरून गप्पांच्या आजोळी जाऊन आठवणींच्या गुजगोष्टी आठवून त्याच गच्चीवर पुन्हा नवं आजोळ फुलवून, वेळेचा टोलमापक ध्यानी मनी नसताना एक रात्र आपल्याला घेऊ! रात्रीची ड्युटी त्या दिवसापुरती आपण करू!
या रात्रीच्या गप्पांतून मनाला मिळणारा कुडकुडीत थंडावा, रात्रीच्या काळोखात लुप्त झालेल्या शरीराशी न बोलता भावनांची मैफल बसवायचीय. चीsss चीsss म्हणत बऱ्याच रातकिड्यांची साक्ष ठेऊन तुझ्याशी गप्पा मारायच्याय.
मला तर अजूनही खरं वाटत नाहीये,
मला तुझी आठवण येतेय हे.
कॉलेजमध्ये असताना आपल्याला कधी एकमेकांची इतकी सवय होईल वाटलंही नाही, तू माझा हक्काचा जिगर होऊन गेला. लोक आपल्यात मैत्री कि प्रेम एवढ्यातच गुंतून राहिले आपण मैत्रीला नवं अस्तित्व देत गेलो. विसरलोय आपण आपल्याला?

थंडी बरीच वाढलीय, येताना टोपीचं स्वेटर घेऊन ये,
थोडी हुशीयारी कमीच दाखवून मला कळवूनच गाडीत बस.
म्हणजे कस तू यायच्या आधी मला सगळा सेटअप माझ्या हाताने करायचाय. गच्चीवर चाफ्याच्या झाडाच्या फुलांची मोहर आलेल्या कड्याच्या अगदी जवळ आपल्या नेहमीच्या जागेवर दोन खुर्च्या, मध्ये टेबल, त्यावर तू यायच्या मिनिटभर आधी केलेले दोन कप कडक चहा, सिगारेट केस, तुझं ते सिगारेटचं ऍश पाडण्यासाठी प्रॉपर ऍशट्रे आणि पाणी. मला माहित नाही हट्ट कि ओढ आहे हि, पण तू यावं आणि आपली आयुष्य जिवंत असल्याचं प्रॅक्टिकल एकमेकांच्या सोबत असण्याने स्वतःला गदगदा हलवून दाखवावं, इतकं गरजेचं वाटतंय हे भेटणं!

ही भेट वाट पाहत आहे…

फक्त थोडा दिवस उधार घेऊन ये, तुझी वाट पाहत आहे… तू वाट परतीची घेऊन ये!
तू जुने दिवस आठव, थोडा तुझा पगार आटव,
एक रात्र उसनी घ्यायला खरंच का जमणार नाही?
मी वाट पाहील त्याच तुझ्या गाडीच्या मागच्या सिटावरची धूळ पुन्हा फुंकून टाकायची!
मी तुझ्या सिंगलतेची गावभर चर्चा ऐकली नाही, तरीही तुझ्या गाडीच मागचं सीट सांगतं ‘फोटोतून’. तू आजही सिंगल आहेस.
तरीही तुझी खुशाली विचारणार नाही, रिलेशनशिप स्टेटस विचारणार नाही, तुझं रडगाण ऐकणार नाही,
खूप दिवस झाले आपण भेटलो नाही, वाटत नाही??
तू म्हणणार कामं आहे, मीटिंग आहे. तरी सिगारेट ओढायचं चुकणार नाही ना?.
त्या आठवड्याभराच्या सिगारेटीला आत ओढताना जितका वेळ देतो तितकासा वेळ दे.
थोडा गंध मागचा आठव. का कधी कोरड्या पडलेल्या आठवणींच्या भूतकाळातील आयुष्यावर तुला भेटीचा सडा टाकताच येत नाही?
पण तरीही यावेळी जमव!
तू येऊ शकत नाही याची केसभर कारणं घेऊन चिडून सांगण्यासाठी का होईना तिकीट परतीचं काढून ये,
तुझी वाट पाहत उभी राहील तू भेटीचा नकार घेऊन ‘स्वतः’ ये!

चेहऱ्याला थोडा रुमाल बांध, गळ्यात बॅग अडकवून ऑफिसची सुट्टी टाक.
तू डोक्यावरच्या टेंशनला जुन्या आठवणींच्या टेपा लाव…
मी आजचा सूर्यास्त रोखून धरते, क्षितिजाची ओढ संपवते!
तू वाट परतीची घेऊन ये!

“खूप काळ लोटून गेलाय, मित्राची भेट झाली नाहीये. मोठ्या जॉबला लागलाय तो. त्याच्या कधी काळच्या हक्काच्या मैत्रिणीपासून कोसो दूर. मनात त्याची आठवण दाटून आलीय, त्याला साद द्यावी, आवाज देऊन हक्काने बोलवावं इतका तो आता फ्री राहिलेला नाहीये. तरी मला आठवून द्यायचाय त्याच्यातला जुना तो. माझ्या या ओळींनी त्याला आजच्या सायंकाळी बोलावून घेऊन रात्र त्याच्याकडून उधार घ्यायचीय, एका दिवसाचा पगार बुडेल तरीही ती पगारी सुट्टी मैत्राच्या आठवणीला देऊन टाकायची. एक दिवस आठवण आली म्हणून एका पत्राने मला त्याची संध्याकाळ उसनी घ्यायचीय.”
लोकांना हे आणि असच सांगितलंय मी.
“तू येशील ना? आयएम डेडली मीसिंग यू!
.
वाट पाहते!”

तुझी सखी,
…………..

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *