रेडिओ आला, रेडिओ काळाच्या पडद्याआड जाऊन वृत्तपत्रे आली म्हणत वृत्तपत्रांना टक्कर देत टीव्ही आला. टीव्हीला तोड देत इंटरनेट आले. हे प्रत्येक माध्यम कालवश होऊन त्याची जागा कुणीतरी घेतली असा तर्क लावण्याचे प्रयत्न झाले पण कोणतेच माध्यम कालवश झाले नाही. त्यातच मिड २०१८- २०१९ हा काळ वेबसिरिजचा काळ म्हणून उदयास आला. मोठा पडदा, छोटा पडदा या सन्मानाच्या संकल्पना कचऱ्यात टाकत मोठ मोठे दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री, ज्येष्ठ- दिग्गज कलाकार मंडळी वेबसिरिजला सिरीयसली घेऊ लागले. प्रेक्षकवर्ग नाही म्हणत म्हणत एखाद्या खराब चित्रपटाची तुलना वेबसीरिज बरोबर करू लागले. “थिएटरात पैसे देऊन तीन तास घालवून इतका फ्लॉप चित्रपट पाहण्यापेक्षा महिन्याभराच्या सबस्क्रिप्शन मधून दहा बारा टॉप क्लास सिरीज पाहिल्या असत्या.” हा रिग्रेटचा सूर जन्माला आला. त्यातून पाच लोकांमध्ये एक नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन गाजू लागले. चर्चेत आले.
नेटफ्लिक्सची साक्रेड गेम्स ही वेबसिरीजच्या आयुष्यातील महत्त्वाचा माईलस्टोन ठरली. त्यानंतर अल्ट्ट बालाजी, टीव्हीएफ, उल्लू, अमेझॉन प्राईम, ओझीसारख्या प्रीमियम अॅपने वेबसिरिजला वाढवले. परंतु या काळातही बॅचलर आणि बेरोजगार मुलांना स्वतंत्र अॅप, वेबसाईट याचे सबस्क्रिप्शन आणि नेटसाठी पैसे मिळणे अशक्य होते. यामध्ये युट्यूब आणि एमेक्स प्लेअर यांचे फ्री कंटेंट आकर्षणाचा विषय ठरले.
या वेबसिरीजचा महत्त्वाचा मुद्दा हा ही होता की, इथे भाषेच्या मर्यादा तोडून हिंदी, इंग्लिश, मराठी, तेलुगू, साऊथ इंडियन, फ्रेंच, जर्मन सिरिजचा भांडार एकाच ठिकाणी उपलब्ध झाला. या सगळ्या खजिण्याकडे उत्तेजीत करणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर सेन्सॉर बोर्डाचे बंधन नसणं. अनसेन्सॉरमुळे अनेक दिग्गजांनी आक्षेपही घेतले पण नाण्याची दुसरी बाजू अधोरेखित करत तरुणाईने सेन्सॉर नसल्याच्या सकारात्मक बाजू आत्मविश्वासाने मांडल्या. कंडोम, प्रेम, शारीरिक प्रेम, सेक्स, ड्रग, हवस, लग्नानंतर प्रेम, अँक्शन सिरीज, हॉलिवुड अडवेंचरस तडका या सगळ्यांचा रोजच्या आयुष्यातला पूर्वापार चालत आलेला मर्यादांचा भोपळा फुटला. एखाद्या पांढऱ्या चादरीवर लागला काळा डाग जितका जास्त झाकायचा प्रयत्न करणार तितकं लोकं त्याचा बाऊ करणार. सेक्स, शारीरिक प्रेम, कंडोम, पाळी या सगळ्याचं तसच काहीसं आहे. त्यामुळे वेबसिरिज हा या सगळ्या मर्यादांना भेदून पुढे गेलेला तीर ठरला. सुरुवातीला सॅक्शुअल कंटेंटकडे आकर्षित झालेली पिढी हळूहळू अशा कंटेंटशी जुळवून घेऊन रोजचच म्हणून आता सिरीजचा आशय लक्षात घेऊ लागली. मुलींचे लहान कपडे, त्यातून दाखविले जाणारे क्लिवेज याला अमर्याद करणाऱ्या एकता कपूरच्या सॉफ्ट पोर्न सिरीज या सगळ्या, आधी मास्टरबेट आणि डोळे शेकण्यासाठी बघणारा भारत आता त्यामागची कन्सेप्ट आणि भूमिका बघू लागला. त्यातील दृश्यांपासून, संकल्पना आणि भूमिका यांवर ‘चार चौघात होणारी चर्चा’ ही पुढारलेल्या भारताच्या मानसिकतेला ब्रॉड करू लागली. ही चर्चा अनेक छुप्या विषयांची कोंडी फोडू लागली.
या सगळ्यात आजवर अनेक सिरीज बघितल्या. असंख्य सिरीज अविश्वसनीय, इंप्रेसिव्ह, यक, वाऊ, हॉरर, कॉमेडी, असंही असतं?, आपण असा विचार केलाच नाही आणि निशब्द करणाऱ्या सिरीज होत्या.
सद्य परिस्थितीला अनुरूप असणारी नवी ‘पवन अँड पूजा’ नावाची सिरीज पाहिली. एमएक्स प्लेअरवर फ्री मध्ये उपलब्ध असलेली ही सिरीज नावावरून अट्रॅक्टीव वाटली नाही. पण तिचा टिजर पाहिल्यानंतर मोठ्या उत्सुकतेने बघण्यास सुरुवात केली.

पूजा आणि पवन प्रत्येकाच्या आयुष्याची कहाणी आहे. ही सिरीज आपण जगत असणाऱ्या, आपल्याला जगावं वाटणाऱ्या आणि जर आपण आपल्याला हवी असलेली लाईफ जगत असतो तर? या तिन्ही फेज अनुक्रमे दाखवत जाते.
पूजा आणि पवन या सेम नावाचे तीन कपल्स असतात. डिजिटल इंडियाच्या युगातील यंग नताशा भारद्वाज आणि तारुक रैना हे कपल, शारीरिक प्रेमाचा अभाव वाटणारे चाळिशीच्या आसपास असलेलं शर्मण जोशी आणि लोकसभेच्या सदस्य राहिलेल्या गुलकिरत कौर हे दुसरं कपल, तिसरं महेश मांजरेकर आणि दीप्ती नवल हे कपल अशी कास्ट आहे.
या कपल्सपेक्षा त्यांच्यातील वृत्ती सगळ्यांमध्ये असते हे दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाचा आहे. पूजा, पवन प्रत्येकात असतात, वाढतात, त्यांच्या आयुष्यात येणारे प्रसंग आपल्याशी रीलेट होत जातात. त्यामुळे पहिला एपिसोड संपताना आपल्या आयुष्यातील नात्यांविषयीचे विचारचक्र मनात सुरू होते.
यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात असणारी नाती आणि नात्यातल्या अडचणी त्रासदायक पण मनोरंजक पद्धतीने मांडल्या आहेत. त्याची उत्तरं सीरिजमध्येच कोण कशी शोधतं, त्याचे परिणाम काय होतात हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. जे सध्या आयुष्यात नाहीये पण जर असलं असतं तर पुढे जाऊन काय होईल, ही वास्तविकता सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. वेगळ फिलिंग आहे. काही शक्यता आपल्याला जाणवू लागतात, वाटतं एखादं नातं टिकणार नाही, तेव्हा अवेलेबल असलेल्या सगळ्या शक्यता आपण ट्राय करत जातो तेव्हा काय घडतं, काय घडणार असतं हे खरंच रिऍलिटी चेकसारखं पाहायला मिळतं.
प्रत्येक पिढीमधला भावनांचा गुंता दाखवण्याचा न्याय्य प्रयत्न सीरिजमध्ये करण्यात आला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असणारी नवी उत्सुकता, ते जगण्याची इच्छा त्यातून मिळणारा आनंद, बहुदा क्षणिक आनंद पाहण्यासारखा आहे.
“हर रिश्तें में बहुत मेहनत करनी पडती हैं|
हम दोनों किसी और के साथ ?” या दोन ओळी नात्याला कसं एकमेकांत गुंतवून ठेवतात, याचा गोड प्रयत्न आहे.
सीरिजमध्ये दाखवलेली नात्यातील प्रश्नांची सरबत्ती आपल्या रियल आयुष्यातील कोडी सोडवत जातात.
सेल्फ अनालिसिस! नकळत केलं जातं.
काही प्रसंग खूप आपलेसे वाटतात. एके ठिकाणी जेव्हा म्हातारपणातील पूजा बोलते, “हर रिश्तें में बहुत मेहनत करनी पडती हैं|” तेव्हा म्हातारपणापर्यंत जपलेलं नातं आणि ते का टिकलं ते दाखवण्याचा प्रयत्न लाजवाब आहे. नातं टिकत नाही, ते टिकवायचं असतं, हा विश्वास हळूहळू आपल्यात निर्माण होतो.
दुसरीकडे लग्न आणि मुल झाल्यानंतर बोअरिंग झालेलं पूजा, पवन यांचं आयुष्य स्पार्क शोधू लागतं. तेव्हा ते हा स्पार्क बाहेरच्या जगात शोधू लागतात. तेव्हा टींडर, हॅप्पनचा उपयोग आणि त्यातील क्षणिक समाधान. पण त्यातून प्रेक्षक म्हणून आपल्याला समजत जाणं की, एकमेकांना कंटाळून एक दोन म्हणत म्हणत बोर झालं म्हणून कित्ती लोकांमागे पळणार आणि, प्रेम शोधणारे?
एखाद्या नात्यात जे आपण देतो तेच आपल्याला मिळतं. नातं एखाद्या प्रतिबिंबासारखं असतं, त्याला गढूळ केलं तर त्याचा चिखल नात्यावर साचतो. जे आपलं ना ते सुरेख आहे ट्रस्ट मी …त्याला नटवावे, सजवावे आणि त्याच्या सोबत जगावं.
आपल्या जवळील नात्याची किंमत, आयुष्यातील प्रत्येक फेज मधल्या नात्याचं महत्त्व आणि मोल शेवटच्या एपिसोडपर्यंत दिग्दर्शक उलगडून दाखवतो. स्पर्धेच्या फिलींगलेस जगात भौतिक गोष्टीभोवती फिरणारं जग एका बाजूला थांबवून नात्याची एहमियत जपणारी ही सिरीज, त्याची कन्सेप्ट, दिग्दर्शन, कास्टिंग आणि शेवटी आशयातून मिळणारा बोध
मनाला समज देणारा ठरतो.