ओढ, कुतूहल यामुळे माणसाचे जेवढे फायदे, तेवढेच तोटे! जर चुकीच्या व्यक्तीकडून, चुकीच्या गोष्टीबाबत मनाला चुटुक लावून घेतली तर आयुष्याला पुरेल अशा घटना घडतात. हेच उदाहरणासह सांगायचे तर, भारतात सेक्स हा विषय खूप हाईप केलेला, लपवून ठेवलेला. माणसाला झाकलेल्या गोष्टी पाहायला अतिशय आवडतं. तसा मानवी स्वभावच आहे.
पण या स्वभावामुळे सेक्स करण्याची इच्छा निर्माण झालेले अनेक व्यक्ती समोरच्या व्यक्तीला ‘प्रेम’ या भावनेत अनेक वर्षे गुंडाळून स्वतःची आणि समोरच्याची फसवणूक करतात. त्यामुळे ज्या गोष्टीला लपवले जाते अशा गोष्टींचा प्रचार आणि वापर चुकीच्या पद्धतीने होऊ लागतो. लपवलेल्या गोष्टीचा नकारात्मक फायदा घेणारे अधिक लोक असतात. “गोष्ट लपवलेली आहे म्हणजे चूक आहे” असे गणितच आपल्या समाजात प्रचलित आहे. त्यामुळे समाजात आपण चुकीचे दिसू ही एकच भावना अनेक चुकीची पावलं उचलायला प्रवृत्त करते.
काही लोकं माणसाच्या मनाचा बारकाईने अभ्यास करतात. त्यातल्या त्यात काही लोक यातही स्पेशलायजेशन करून फक्त माणसातल्या पॉवरफुल गोष्टींचा अभ्यास करतात आणि काही त्यांच्या कमकुवत बाजूंचा! कमकुवत बाजूंचा अभ्यास करणाऱ्यांच्या लक्षात येते की, या प्रकारातले लोक त्यांची चूक नसली तरी त्यांच्या विक पॉइंटवर बोट ठेवले तर शरण जातात. ही लोकं पैसा कमावण्यासाठी सॉफ्ट टार्गेट असतात आणि यातून उगम होतो अनेक लोकांची फसवणूक करून ब्लॅकमेल करण्याचा! यातलाच एक प्रकार म्हणजे सेक्स्टॉर्शन, म्हणजेच सेक्सचे लालच दाखवून समोरच्याला आपल्या जाळ्यात ओढून त्याला ब्लॅकमेल करणं. इन शॉर्ट, लैंगिक खंडणी!
आताच्या काळात लैंगिकतेबद्दल ओपन होण्याचे प्रमुख व्यासपीठ म्हणजे सोशल मीडिया आहे. ही खूप उत्तम गोष्ट आहे, पण या सगळ्यात खऱ्या आयुष्यात विलन असलेली लोकही इथे वावरतात त्यामुळे इथेही सावध राहणं गरजेचं आहे.
इथे लोक एकमेकांच्या संमतीने सेक्स चॅट करतात, आपल्या आवडी निवडी शेअर करतात, विविध ग्रुप क्रिएट करतात. बऱ्याचदा एकाला इंटरेस्ट असतो, समोरच्याला नसतो. अशावेळी एकमेकांचा आदर करतात. या सगळ्या वातावरणात “दोघांचीही संमती आणि त्यांच्या मताचा आदर” या दोन क्लिअर गोष्टी मच्युअर अडल्ट म्हणून पाळल्या जातात. मग या सेक्स नावाच्या लालसेचा तोटा केव्हा होऊ लागतो, जेव्हा आपल्या विक पॉइंटचा कुणी गैरफायदा घ्यायला सुरुवात करतो, आपल्याला टार्गेट करतो.
उदाहरणार्थ, ज्यावेळी एखाद्या पुरुषाला एखादी परस्त्री कुठलाही आडपडदा न ठेवता “तुम्हाला माझ्या’सोबत’ बोलायला आवडेल? किंवा तुम्ही फ्री आहात?” असं विचारते, याने पुरुष मंडळी भारावून जातात. लगेच मोबाईल नंबर शेअर करून व्हिडिओ कॉलिंग पर्यंत गोष्टी नेतात. मग शरिरापर्यंत येतात. गुन्हेगाराकडून लैंगिक भावना उत्तेजीत करणारे व्हिडिओ, ऑडियो पाठवले जातात आणि त्या पुरुषाच्या संयमाचा बांध फुटतो आणि शेवटी लैंगिक भावना व्यक्त करून मोकळं होऊ या स्तराला त्याला आणलं जातं. त्याच नाजूक क्षणी समोरचा गुन्हेगार अशा व्यक्तींचा खात्मा करतो. त्यांनी केलेली चॅट, व्हिडिओ क्लिप आणि त्यातील नग्नता जगजाहीर करू म्हणत ब्लॅकमेलिंग करून खंडणी उकळली जाते. अनेक पुरुष बदनामी होऊ नये म्हणून पैसेही देतात. पण त्या रकमेवर याचा शेवट होत नाही.
याचे कारण म्हणजे आजही पुरुषाच्या आयुष्यात स्त्री आणि सेक्स या दोन्ही गोष्टींची उकल अनाकलनीय आहे. त्यामुळे स्त्री हा बऱ्याच पुरुषांचा विक पॉइंट आणि अशातच स्त्रीकडून सेक्ससाठी विचारणा होणं म्हणजे स्वर्गमय अनुभूती! या एका लालसेच्या जाळ्यात पुरुष ओढला जातो आणि बरबाद होण्याचा प्रवास सुरू करतो. यात स्त्रीने तिचा आर्थिक स्वार्थ साधला, पुरुष शारिरीक इच्छेच्या लालसेला बळी पडला. या सगळ्यात महत्त्वाची चूक ही घडते की सेक्स एज्युकेशन कमी पडते. कामसूत्राचा उगम असलेला हा आपला भारत आज यानेच आत्महत्या करायला भाग पाडून अनेकांचा जीव घेतोय.
फेसबुक, इंस्टाग्राम ही तात्पुरती साधने आणि त्यावरची नकारात्मकता माणसाला आयुष्यातून उठवतात.
पण तरीही असे घडल्यास तुमच्या जवळच्या विश्वासू माणसाबरोबर हे शेअर करा आणि तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भीतीपोटी त्यांनी ब्लॅकमेल केलेले पुरावे नष्ट करण्याची घाई करू नका!
हे लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसात सेक्सटॉर्शनमुळे पुण्यात सुरू असलेले आत्महत्या सत्र!
जे आपल्याला माहिती ते समोरच्याला सांगू, सगळ्यांनाच अशा गुन्ह्यांपासून दूर ठेवू!
– पूजा ढेरिंगे
#Sextortion
💯खरंय गुन्हेगारी वाढत चाललीय