तुम्ही भांडताना काही मर्यादा घालायला हव्या. या मर्यादा म्हणजे नेमकं काय? याचा विचारच काही नात्यात केला जात नाही. बोलताना फटकळपणे काहीही बोलून जावून समोरच्या कडून आदराची अपेक्षा करणं चुकीचं आहे. नात्यात आदर पाहिजे म्हणता तो आदर म्हणजे नेमकं काय ?
तर दोघांमध्ये काहीही होवो काही मर्यादा तुटल्या नाही पाहिजे. प्रेम अमर्यादित असू द्या, त्याला कधीच थांबवू नका. पण नात्यात काही छोटीशी लढाई झाली की मग पारा चढला म्हणून काहीही बोलायचं म्हणजे अवघड आहे.
आमच्या बिल्डिंगखाली एक कपल रोज भेटायचं. पण काल तो मुलगा तिला मारत होता. त्या मारण्याला काहीच अर्थ नव्हता. तो मजा म्हणून मारत असावा असा अंदाज लावला, कारण ती मुलगी त्याला म्हणत होती, मारू नकोस ना, जे काही असेल ते लांबून बोल. पण तो ऐकत नव्हता. त्यांचं वय वीसेक वर्ष असावं. मुलगी शाळकरी वयातली होती. मुलगा तिच्या शाळेतला, कॉलेजातला नसावा. पण सांगायचं हेच आहे की, कशाला ना त्याने मस्ती म्हणून हात उचलावा, आणि तिने पहिल्यांदाच त्याने अस केलं तेव्हा का विरोध नाही करावा? कारण हीच मुलगी थप्पड मूव्ही पाहून तापसी पन्नुच्या भूमिकेला हसली असेल. काय फालतू चित्रपट पाहून तीन तास वाया घालवले असं म्हणत कुल बनली असेल.
तुमच्या जोडीदाराला मुभा द्यावी ना पण प्रेम करण्याची द्या. तो तुमच्यावर हावी होणार असेल तर कसलं आलंय प्रेम?
हे झालं मारण्याबाबत. पण बऱ्याचदा मी मैत्रिणींना बोलताना ऐकते, थोडी काही चूक झाली की या मुलाबरोबर नातं तोडण्याची भाषा करतात. तोही तिकडून म्हणतो, माझंच चुकलं तुझ्यावर प्रेम केलं. मग दोघांची भांडणं होतात. मुलगी माघार घेते, त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. पण आता तो ऐकायला तयार नसतो. आता तो आवाज चढवून बोलतो, कुठल्याही थरापर्यंत!
या अशा नात्यात एकतर सारखं सारखं नातं तोडण्याच्या गोष्टी करणाऱ्या मुली खूप अस्थिर असतात आणि अशा मुलींवर आवाज चढवणारे मुलं हक्काच्या नावाखाली पातळी सोडून बोलू लागतात.
अशावेळी थोडा वेळ काढून विचार करायचा, नेमकं आपलं नातं आपल्याला कसं हवे आहे? आपल्यावर हात उचलणारं? आवाज चढवणारं की दर मिनिटाला सोडून जाण्याची भाषा करणारं?
– पूजा ढेरिंगे
नाहीतर याहून चांगले पर्याय आहेत, प्रेम करताना कोणतीच मर्यादा न ठेवणारं आणि प्रेम आहे म्हणून प्रेमाचा आदर करून या अशा गोष्टींना विरोध करणारं!
प्रेम म्हणजे काय…ऐकमेंकाचा आदर…सन्मान…ऐकमेंकाच्या मनाला समजून घेऊन…ऐकमेंकाला जपणं… हल्ली हे दुर्मिळ झालंय..