नातं नवीन असतं, तेव्हा आपणही नव्या सारखे त्या नात्यात मुरत असतो. आपल्याला त्या व्यक्तीशी खूप बोलायचं असतं. खूप एक्स्प्रेस व्हायचं असतं, सगळचं, एकूण एक गोष्ट व्यक्त करायची असते. खुप हसायचं असतं, आयुष्यातलं सगळचं त्याच्याच बरोबर शेअर करायचं असतं, जगण्याला चव येऊ लागते. एखाद्या झाडावर नवं पाखरू येऊन बसावं, ते झाड रंगबेरंगी दिसावं तसे आपण तो व्यक्ती आल्याने दिसू लागतो. या जगातलं सगळ्यात देखणं झाड म्हणून आपण स्वतःला मिरवू लागतो. नुकत्याच जन्मलेल्या बाळाने पहिल्यांदाच पावसात भिजावं, तेवढी त्या नात्याची नवखी मजा!
पण हळूहळू तो व्यक्ती ओळखीचा होत जातो. त्याच्या सवयी, त्याचा रिस्पॉन्स कसा येईल कळू लागतं. तो कसा प्रतिसाद देईल याचे अंदाज येऊ लागतात… हळूहळू नाविन्य संपून जातं. नव्याचे नऊ दिवस अन् नवलाईचा असर कमी होत जातो.
उचंबळून आलेल्या भावना पुन्हा आधीसारख्या सामान्य आणि धूळ खात पडू लागतात. यामुळे सुरुवातीचे खूप व्यक्त होणारे दोघे आता हळूहळू एकमेकांना बदलल्यासारखे वाटू लागतात. एकमेकांत काहीतरी स्पार्क सापडला म्हणून भेटलेले दोघे आता गर्दीतले दोघे बनून राहतात.
जुनं होत जातं तसं त्याची किंमत नगण्य होते.
या सगळ्यात एकच शाश्वत असतं, आपलं नवपण टिकवणं. जे आपल्याला व्यक्ती म्हणून वेगळं बनवत असतं.
आपलं नवं असणं, आपण टिकवावं लागतं. त्याने आपण या गर्दीतून कुणीतरी वेगळे आणि उठून दिसत असतो.
ते दुसऱ्या कुणावर अवलंबून राहील तर त्याच्या सारखं तेही रोजचं आणि जुनं होऊन जाईल. त्याने नातं तर जुनं होईलच पण तुमचा उत्साहही नष्ट होईल.
– पूजा ढेरिंगे
सायंकाळचं_गूढ🌻